आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना 'रयत'चा आधार...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाशी चर्चा करताना रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष  डॉ. अनिल पाटील.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाशी चर्चा करताना रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील.

नववर्ष २०१८ विशेष...   ------------------------------------------------------ शेतीतील कर्जबाजारीपणाला कंटाळून राज्याच्या अनेक भागांतील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यामुळे शेकडो शेतकरी कुटुंबे पोरकी झाली असून, या कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण झाला. शेतकऱ्यांच्या मुलांचा हा पोरकेपणा दूर करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेने आदर्श उपक्रम हाती घेत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मोफत निवासी शिक्षण सुरू केले आहे. या उपक्रमांतर्गत मुलांना शिक्षण, जेवण, गणवेश यांसारख्या सर्व गोष्टी मोफत दिल्या जात आहेत. यामध्ये सध्या ४१ मुले व मुली शिक्षण घेत असून, ते पूर्ण स्वावलंबी होईपर्यंत संस्थेने त्यांची जबाबदारी घेतली आहे.

रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अथक प्रयत्नांतून उभी राहिलेली संस्था आहे. संस्थेच्या बहुतांशी शाखा ग्रामीण भागात असल्याने या शाखांत शेतकऱ्यांची मुले शिकत असतात. शेतकरी आणि संस्थेचे नाते अतुट झाले आहे.

निसर्गाचा असमतोल तसेच शासकीय धोरणामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाले होते. कर्ज कसे फिटणार, कुटुंबं कशी चालवायची, मुलांचे शिक्षण कसे होणार या भीतीने हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. यामुळे अनेक कुटुंबांवर संकटे कोसळली. यामुळे मुलांना शिक्षण कसे द्यायचे ही भीती मुलांच्या मातांमध्ये निर्माण झाली होती. अनेक माता काबाडकष्ट करून मुलांना शिक्षण देत आहेत. मात्र यातील काही कुटुंबांची अार्थिक परिस्थिती नाजूक असल्याने मुलांना शिकवणे कठीण झाले होते.

या बाबतची माहिती संस्थेला समजताच या मुलांसाठी आपणही काहीतरी केले पाहिजे या भावनेतून संस्थेच्या व्यवस्थापनाने या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. गरिबांच्या मुलांसाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी साताऱ्यातील धनणीच्या बागेत संस्थेचे पहिले वसतिगृह सुरू केले. त्यामध्ये राज्याच्या विविध भागांतील गरीब, अनाथ, एक पालकत्व असलेली मुले शिक्षण घेत असत. त्यासाठी शासनाकडून अल्पसा निधी मिळत होता. मात्र, गेल्या वर्षी शासनाच्या एका अध्यादेशाच्या फटकाऱ्याने वसतिगृह बंद करावे लागले.

गरिबांच्या सर्व मुलांना शिक्षण सोडून घरी पाठवावे लागले. मात्र, कर्मवीरांचे हे ऐतिहासिक वसतिगृह स्वखर्चाने सुरू ठेवण्याचा निर्णय रयत शिक्षण संस्थेने घेतला. या वसतिगृहात विदर्भ, मराठवाडासह राज्यातील इतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या निराधार झालेल्या मुलांचा शोध संस्थेने घेतला. त्यांना तेथून आणले.

सध्या या वसतिगृहात राहून २० मुली आणि २१ मुले शिक्षण घेत आहेत. कित्येक वर्षे "भूक''ही पचवलेल्या या मुलांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी संस्थेने घेतली असून, ती आता भरल्या पोटी शिक्षण घेऊ लागली आहेत. या मुलांना राहणे, खाणे तसेच गणवेश असे सारे काही मोफत दिले जात आहे. या उपक्रमाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या उर्वरीत कुटुंबास दिलासा मिळाला आहे. आता साताऱ्यातील धनणीच्या बागेत आनंदाने राहून शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेऊ लागली आहेत.

रयतच्या २० विद्यालयांत कृषी शिक्षणाचे धडे

शेतकऱ्यांची मुले पुन्हा शेतीकडे वळावीत, त्यांना शेतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळावे, यासाठी रयत शिक्षण संस्था आता शाळांतून शेतीचे धडे देणार असून, संस्थेतील २० शाळांत त्याचा ऑगस्ट महिन्यापासून प्रारंभ करण्यात आला आहे. संस्थेच्या उपक्रमात जैन इरिगेशन, गोदरेज ॲग्रोव्हॅट, युनायटेड फॉस्फरस, बायर, अमूल, स्टार ॲग्री आणि जळगावच्या गांधी फाउंडेशन या उद्योजकीय संस्थांनी कृषी क्षेत्राच्या विकासास चालना देण्यासाठी "फली'' या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्था आपल्या नफ्यातून दर वर्षी लाखो रुपये एकत्र करतात आणि शेती तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी मदत करतात. त्यांच्या सहकार्यानेच हा प्रकल्प रयत शिक्षण संस्थेत राबविला जात आहे.

आधुनिक तंत्रासाठी शेडनेट उभारणी

शेतीतून कर्जबाजारीपणा आल्याने आपल्या बापाने आत्महत्या केली या घटनेचा मुलांच्या मनावर आघात होऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर मुलांचे शेतीवरील प्रेम कमी होऊ नये, त्यांची इच्छा झाल्यास त्यांनीही आधुनिक पद्धतीने शेती करावी यासाठी रयत शिक्षण संस्थेने दक्षता घेतली आहे. या मुलांना धनणीच्या बागेत शेतीच्या आधुनिक तंत्राज्ञानाचे धडे दिले जात आहे. यासाठी शेडनेटची उभारणी केली आहे.

‘रयत' ही संस्था कर्मवीरांच्या त्यागातून उभी राहिलेली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील इतर भागांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरक्‍या मुलांना वसतिगृहात प्रवेश दिला आहे. त्यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी संस्थेने घेतली आहे. संस्थेत शिक्षण घेत असलेल्या मुलांना बालवयातच शेतीची माहिती मिळावी यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या २० शाळांतून शेतीचे शिक्षण दिले जात आहे. तसेच माध्यमिक शाळांत आधुनिक शेतीविषयक कोर्सेस सुरू केले आहेत. - डॉ. अनिल पाटील,

कार्याध्यक्ष, रयत शिक्षण संस्था

शेतीतील कर्जबाजारीपणामुळे माझ्या वडिलांनी आत्महत्या केली. जैन इरिगेशनचे दीक्षित सरांनी मला इथे आणले. परिस्थितीमुळे जे मला मिळाले नाही ते इथे मिळत आहे. रयत संस्थेच्या माध्यमातून मी उच्च शिक्षण घेऊन माझ्या मायचे स्वप्न पूर्ण करणार आहे. - प्रथमेश पाटील,

विद्यार्थी, रा. उबरगा, जि. सोलापूर.

संपर्क ः सुनील पन्हाळकर, ९०२८८०२९४३ अधीक्षक, शाहू बोर्डिंग, सातारा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com