रयत संस्था माझा श्‍वास, जीवनाचा ध्यास ः एन. डी. पाटील

रयत संस्था माझा श्‍वास, जीवनाचा ध्यास ः एन. डी. पाटील
रयत संस्था माझा श्‍वास, जीवनाचा ध्यास ः एन. डी. पाटील

कोल्हापूर ः ‘‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आष्टा येथे शाळा सुरू केली म्हणून माझे शिक्षण झाले. शिक्षक रामकृष्ण वेताळ खैरमोडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत शाळा चालवली. परीट मास्तरांच्या आग्रहामुळे कुटुंबाचा विरोध असताना मी मॅट्रिक पास झालो. यानंतर मी रयत शिक्षण संस्थेचा एक भाग बनलो. ‘रयत’मधील कालावधी हा जीवनातील सुवर्णकाळ आहे. रयत संस्था हाच माझ्या जीवनाचा श्‍वास आणि जगण्याचा ध्यास आहे,’’ असे भावोद्‌गार ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी काढले. 

श्री. पाटील यांना शिवाजी विद्यापीठातर्फे प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी डॉ. पाटील यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते श्री. पाटील यांना गौरविण्यात आले. 

श्री. पाटील म्हणाले, की माझ्या कुटुंबातील आई, वडील, आजोबा हे सर्वच निरक्षर होते. घरात शिक्षणाचे वातावरण नव्हते. सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे शाळा नव्हती. माझ्या लहानपणी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रयत्नांतून गावात शाळा सुरू झाली. विशेष म्हणजे रामकृष्ण खैरमोडे या दलित तरुणाने शाळेची जबाबदारी स्वीकारली. खैरमोडे यांनी त्या काळात मुंबई विद्यापीठातून इंग्रजी विषयात बी.ए. केले होते. परीट मास्तरांमुळे मी मॅट्रिक होऊ शकलो. खैरमोडे, परीट या शिक्षकांमुळेच माझे शिक्षण झाले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अतिशय कष्टाने या खेडोपाडीच्या शाळा चालविल्या. त्यामुळेच माझ्यासारखी बहुजनांची मुले शिकली. पुढे कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेची जबाबदारी माझ्याकडे दिली. आणि रयत संस्था जीवनाचा श्‍वास आणि ध्यास बनली. 

पुरस्काराबद्दल ते म्हणाले, की प्राचार्य कणबरकर हे मला वडीलभावासारखे होते. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांची ज्ञानसाधना सुरू होती. अखेरच्या टप्प्यात त्यांच्या हातांना कंप सुटला होता. त्यांनी त्याही परिस्थितीत ‘ग्लेमसेस ऑफ राजर्षी शाहू छत्रपती’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्याची विनंती त्यांनी मला केली. मीही ती लिहिली. त्यांनी जमवलेली सर्व पूंजी विद्यापीठाला दिली. त्यांच्यासारखा माणूस आता होणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com