‘टेंभू’ योजनेचे पाणी सांगोल्यापर्यंत दाखल

‘टेंभू’ योजनेचे पाणी सांगोल्यापर्यंत दाखल
‘टेंभू’ योजनेचे पाणी सांगोल्यापर्यंत दाखल

सांगली : आटपाडी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. तालुकावासियांनी वारंवार मागणी करूनही टेंभूचे पाणी उशिरा तालुक्यात दाखल झाले. पण सध्या टेंभूचे पाणी वेगाने सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यात सोडले जात आहे. आटपाडीपासून ५० कि.मी.पर्यंत सांगोला तालुक्यात पाणी गेले, पण आटपाडी तालुक्यातील तलाव कोरडे आहेत. त्यामुळे आटपाडी तालुका उपाशी, तर सांगोला तालुका तुपाशी, अशी स्थिती आहे.

गेली २ वर्षे आटपाडी तालुका भीषण दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. यंदाही पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील सर्व ओढे, माणगंगा नदी कोरडी आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची टंचाई आहे. त्यामुळे टेंभू योजनेचे पाणी सोडून तालुक्यातील सर्व ओढे, बंधारे, तलाव भरावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

तालुक्यात १८ सप्टेंबर रोजी टेंभूचे पाणी आले. तीनच दिवसांत ३०८.९७ द.ल.घ.फू. एवढा पाणीसाठा होऊन पाणी सांडव्यावरून वाहू लागले. तेव्हापासून आजअखेर आटपाडीच्या शुक्र ओढ्यातून सांगोला तालुक्यात पाणी सुरू आहे. आटपाडीपासून लोणारवाडी, बलवडी, नाझरे, वाटंबरे ते कडलासच्या पुढे ५० कि.मी.पर्यंत माणगंगा नदीतून बंधारे भरत पाणी सोडले जात आहे. तरीही आटपाडी तालुक्यातील माणगंगा नदी कोरडी आहे. गवळेवाडी, आवळाई, विठलापूर, कौठुळी या गावांना ओढ्यातून पाणी सोडून वर्ष झाले. 

या परिसरात पिण्याच्या पाण्याचे टॅँकर सुरू आहेत. तिथे खरिपाची पेरणीही झाली नाही. तसेच रब्बी हंगामाची पेरणी पावसाअभावी होणार नाही. दिघंची परिसर कोरडा आहे. त्यामुळे टेंभूचे पाणी येऊनही केवळ नियोजन नसल्याने तालुकावासीयांना दुष्काळावर मात करण्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे.

सांगोल्याला ४००, तर आटपाडीला १०० क्युसेक

सांगोला तालुक्यात सध्या ३०० क्युसेक वेगाने आटपाडी तलावातून आणि घाणंद-हिवतड कालव्यातून जुनोनी, कोळे या सांगोला तालुक्यातील गावांना १०० क्युसेक, असे एकूण ४०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. आटपाडी तालुक्यात निंबवडे तलावात फक्त १०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. हा अन्याय संतापजनक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com