वाजवी मागण्यांसाठी आंदोलन सुरूच राहणार

कृषी कायदे रद्द झाल्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेनंतर संयुक्त किसान मोर्चाने मोदी सरकारवर दबाव वाढविण्याची रणनीती आखली आहे.
For reasonable demands The agitation will continue
For reasonable demands The agitation will continue

नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द झाल्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेनंतर संयुक्त किसान मोर्चाने मोदी सरकारवर दबाव वाढविण्याची रणनीती आखली आहे. 

कृषी कायदे मागे घेण्यासाठीच्या संसदेतील औपचारिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आणि शेतकऱ्यांच्या वाजवी मागण्या मान्य होईलपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे जाहीर करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने आता आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त मोर्चा आणि सभांच्या नियोजनात कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच २२ रोजी लखनौ येथे सभा, २६ रोजी देशव्यापी कार्यक्रम आणि २९ रोजी संसदेवर ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल, असा पुनरुच्चार शनिवारी (ता. २०) झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर केला.  कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवरून केंद्र सरकारला झुकविल्यानंतर शेतकरी संघटनांनी आता एमएसपीसाठी स्वतंत्र कायदा करणे, वादग्रस्त वीज विधेयक मागे घेणे यांसारख्या मागण्यांवरून आता सरकारशी दोन हात करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या कालच्या बहुचर्चित घोषणेनंतरही लगेच आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी शेतकरी आंदोलनाची पुढील रणनीती ठरविण्यासाठी शनिवारी कोअर कमिटीची बैठक घेऊन चर्चा केली. उद्या पुन्हा एक बैठक होणार आहे.

तत्पूर्वी या बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चाचे नेते डॉ. दर्शन पाल यांनी पत्रकारांना सांगितले, की शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त संयुक्त किसान मोर्चाने ज्या सभा आणि मोर्चांचे नियोजन केले होते त्या नियोजनामध्ये काहीही बदल होणार नाही. २२, २६ आणि २९ नोव्हेंबरचे कार्यक्रम ठरल्याप्रमाणेच होतील. २६ नोव्हेंबरला आंदोलनाला एक पूर्ष पूर्ण होत आहे. देशभरात आंदोलनाचा वर्धापन दिन साजरा केला जाईल. तर २९ नोव्हेंबरला संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून, या दिवशी संसदेवर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येईल. 

कृषी कायदे रद्द झाले आहेत. आता एमएसपीसाठी स्वतंत्र कायदा असावा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. याशिवाय वीज विधेयक २०२० मागे घेतले जावे, हवेच्या गुणवत्तेसाठीचा वटहुकूम आणला जावा आणि आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर नोंदविलेले गुन्हे मागे घेतले जावेत, तसेच ज्या शेतकऱ्यांना आंदोलनामध्ये मृत्यू झाला त्यांच्या स्मारकासाठी जागा मिळावी यांसारख्या मुद्यांवर ठाम राहण्याचेही बैठकीत ठरल्याचे डॉ. दर्शनपाल यांनी सांगितले. यामुद्द्यांवर चर्चेसाठी सरकार लवकर बैठक बोलावेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com