नगर जिल्ह्यातील बोंड अळीग्रस्तांसाठीचे ३८ कोटींचे अनुदान प्राप्त

नगर जिल्ह्यातील बोंड अळीग्रस्तांसाठीचे ३८ कोटींचे अनुदान प्राप्त
नगर जिल्ह्यातील बोंड अळीग्रस्तांसाठीचे ३८ कोटींचे अनुदान प्राप्त

नगर : बोंड अळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील एक लाख ४२ हजार ७३५ क्षेत्र बाधित झाले होते. दरम्यान, बाधित क्षेत्राचे पंचनामे करून सुमारे १२१ कोटी रुपये अनुदान आजवर प्राप्त झाले आहे. त्यापैकी दोन टप्प्यांत ८४ कोटी अनुदान जिल्ह्यास प्राप्त झाले होते. आता तिसऱ्या टप्प्यात ३८ कोटींच्या अनुदानासाठी गेल्या चार महिन्यांपासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. मात्र, आजअखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. शुक्रवारी (ता. २) शासनाकडून जिल्हा प्रशासनास अनुदान प्राप्त झाले असून, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग होणार आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारीबरोबर नगदी पीक म्हणून कपाशीची लागवड केली जाते. शेवगाव, नेवासे, पाथर्डी या तालुक्‍यांमध्ये तर कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. २०१७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील १ हजार ८५ गावांतील कपाशीचे एकूण १ लाख ४२ हजार ७३५ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यानुसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या निकषाप्रमाणे बाधित झालेल्या क्षेत्रासाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला ४१ कोटी ८६ लाख रुपये देण्यात येणार होते.

त्यापैकी ३३ कोटी ४९ लाख रुपये प्राप्त झाल्यानंतर त्यांचे तालुकानिहाय वाटप करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पुन्हा ४१ कोटी ८६ लाख रुपयांची रक्कम व पहिल्या हप्त्यातील उर्वरित ८ कोटी ३७ लाख रुपयांची रक्कम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली. ही अनुदानाची रक्कम तालुकानिहाय ९४ हजार ८५६ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आली. उर्वरित ५९ हजार ११६ शेतकऱ्यांसाठी आलेले ३८ कोटींचे अनुदान जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहे असे सांगण्यात आले.

शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या निकषानुसार अनुदानाची मदत बागायत क्षेत्रासाठी तेरा हजार पाचशे, तर जिरायत क्षेत्रासाठी हेक्‍टरी आठ हजार सहाशे रुपयेप्रमाणे मंजूर आहे. तिसऱ्या टप्प्यातील ३८ कोटींचे प्राप्त झालेले अनुदान ५९ हजार ११६ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा केले जाणार आहे. - राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com