तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल: प्रदीप पुरंदरे

प्रदीप पुरंदरे
प्रदीप पुरंदरे

औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी हस्तक्षेपामुळे वाढ होते आहे. त्यामुळे निर्माण झालेला वाढत्या तापमानाचा धोका वेळीच ओळखावा लागेल. तापमान वाढू नये यासाठी प्रयत्न हवे, असे मत जलअभ्यासक प्रदीप पुरंदरे यांनी व्यक्‍त केले. औरंगाबाद येथे गुरुवारी (ता. २१) आयोजीत पीक पाणी परिषदेत ‘हवामान बदल व वाळवंटीकरणाचा धोका’ याविषयावर ते बोलत होते.  टेरी आणि इस्त्रोच्या अहवालांचा दाखला देवून श्री. पुरंदरे म्हणाले, हवामान बदल आणि वाळवंटीकरणाचं संकट उभं ठाकलं आहे. हवामान बदल व वाळवंटीकरणाच्या संकटामुळे येत्या काळात पाऊसमान वाढेल मात्र कमी वेळात जास्त पाऊस, कमी पावसाच्या दिवसात वाढ, पावसाच्या खंडात वाढ, दुष्काळ व पुराचे चक्र वाढण्याचे धोके आहेत. परिस्थितीचा अभ्यास करता बदलत्या हवामानाचा व महाराष्ट्रात सर्वाधिक धोका नंदूरबार जिल्ह्याला तर सर्वात कमी धोका सातारा जिल्ह्याला दिसतो हे  गांभीर्याने घ्यायला हवं.  ‘‘वाळवंटीकरणा चे क्षेत्र वाढणाऱ्या राज्यात राजस्थाननंतर महाराष्‌ट्राचा क्रमांक लागतो. उत्पादकता व जैवविविधता गमावल्याने, हरित आच्छादन कमी झाल्याने व पाणी, वाऱ्यामुळे धुप झाल्याने वाळवंटीकरण वाढते आहे. २०११ ते २०१३ च्या अहवालानुसार राज्यात वाळवंटीकरणाकडे वळलेल्या क्षेत्राचे प्रमाण ४५ टक्‍क्‍यांवर गेलंय हा सर्वात मोठा धोका आहे. सरासरी २६.४६ डीग्री असणार तापमान २०३० साली दीड डिग्रीने , २०५० साली अडीच डिग्रीने तर २०७० साली साडेतीन डिग्रीने वाढण्याची शक्‍यता आहे. या संकटाचा सामना करताना परिणामकारक जलव्यवस्थापन व त्याला वॉटरेशडची जोड द्यावी लागेल,’’ असे ते म्हणाले.  ''पाण्याची न्यायालयीन लढाई जिंकली पुढे काय'' याविषयावर ॲड. प्रदीप देशमुख म्हणाले, की न्यायिक लढाई जिंकलो आता राजकीय लढाई लढावी लागणार आहे. यासाठी लवकरात लवकर रेखांकनाचे काम झाले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्य जलपरिषदेची उपसमिती नेमावी. या समितीने न्यायालयाच्या निर्देशाचा अभ्यास करून मुख्यमंत्री, जलसंपदामंत्र्यांनी वेळेत निर्णय घ्यावा. दमणगंगा, तापी नदीचे पाणी गुजरातला नेण्याचा प्रयत्न होत आहे. तो हाणून पाडावा.  ‘‘केवळ लागवडीपासून पिकाच्या खळ्यापर्यंत येऊन शेती थांबू नये तशी पीक व प्रक्रियेचे पद्धती असणारी शेती करावी लागेल.’’ असे मत कृषी पीक पद्धतीचे अभ्यासक उदय देवळाणकर यांनी अनुकूल पीक पद्धती व उपाययोजना'' याविषयी बोलताना मांडले. श्री. देवळानकर म्हणाले,  आपल्या भागाची पीक उत्पादनाची क्षमता लक्षात घेऊन पीक नियोजन केल्यास तेलबिया व डाळवर्गीय पिकांमध्ये मराठवाड्यात क्रांती करता येवू शकते. प्रोऍक्‍टीव्ह रिसर्चचा अंतर्भाव शेतीमध्ये करावा लागेल. पिकाचं नियोजन करताना रोजगाराचा विचार करून ते केल्यास खळ्यात शेती थांबणार नाही.  ‘कसा वाढेल विभागाचा जलसंचय’ याविषयी बोलताना मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य शंकरराव नागरे यांनी मराठवाड्यात उपलब्ध पाणी किती, हक्‍काचे किती, कमी पडते किती, आणायचे कुठून, मराठवाडा वॉटर ग्रीड काय, कृष्णेचा पाणी प्रश्न, अनुशेष वाल्मीक, शहरातील पाणी, उसाचे पाणी, रेखांकन पाण्याचे बाष्पीभवन आदी मुद्यांना हात घातला. श्री विजयअण्णा बोराडे म्हणाले, ‘‘आपले चित्त मोठ्या धरणात अडकले आहे. हक्‍काचं पाणी मिळालच पाहिजे परंतु तोवर आपल्या हातात असलेलं पाणलोट क्षेत्र वाढवून आपण पावसाचे पाणी अडवू, साठवू शकतो. जे प्रत्यक्ष खाता येत नाही परंतु उत्पन्न देतील असा पिकांत बदल करून गवत,  बांबू, डाळ, तेलबिया आदी पिकांची लागवड करता येईल.  परिषदेतील सर्व विषयांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार असल्याचे या पीक पाणी परिषदेचे  संयोजक माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केले. समारोपीय सत्राला महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रामुख्यांनी उपस्थिती होती.  श्री. पुरंदरेंनी असे सुचविले उपाय

  • कृषी विस्तार सेवा बळकट करणे
  • कृषी हवामानाविषयी अचूक व स्पेसीफीक माहिती देणे
  • बियाण्यांवर संशोधन, सुपीक जमिनीचे अकृषीकरण थांबविणे
  • पाऊस बाष्पीभवनाचे व्यस्त प्रमाण लक्षात घेऊन जलव्यवहार करणे
  • भूजल पुनर्भरणाला प्रोत्साहन देणे
  • भूजल कायदा २००९ चे नियम तयार करणे व अंमलबजावणी करणे
  • मृदसंधारणावर भर देणे, नदी पुनरुज्जीवनावर भर देणे
  • राज्यस्तरीय सिंचन प्रकल्पांची देखभाल दुरुस्ती व समन्यायी पाणी वाटप
  • कालवा सल्लागार समित्या बरखास्त करणे
  • एकात्मिक जलआराखड्याची अंमलबजावणी, वाल्मी जलसंपदा विभागाकडे देणे. शास्त्रीयदृष‌ट्या जलव्यवस्थापन करणे  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com