सांगलीत महापुराचा नवा विक्रम

सांगली बस स्थानकातील पुराचे पाणी
सांगली बस स्थानकातील पुराचे पाणी

सांगली  : सांगलीत आलेल्या महापुराने बुधवारी सकाळी २००५ मधील सर्वोच्च पातळीचे विक्रम मोडले. येथील आयर्विन पुलाजवळ बुधवारी सकाळी ५४ फूट पाणीपातळीची नोंद झाली. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुराने निम्मे शहर पाण्याखाली असून, जिल्ह्यातील ७५ हजारहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ‘एनडीआरएफ’च्या दोन टीम पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी मदत करीत आहे.

महापुराने सांगली शहराला वेढा घातला आहे. रात्री पावसाचा जोर ओसरला असला तरी कोयना धरणातून सोडलेल्या एक लाख २१ हजार क्युसेक पाण्यामुळे कृष्णेच्या पाणीपातळीत मात्र वाढ होत आहे. त्यामुळे वेगाने पाणीपातळी वाढत आहे. रात्री दोन वाजता आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी ५३ फूट होती. ती सकाळी आठ वाजता ५४ फूट  झाली. शहरातील सराफ कट्टा, मेन रोड, हरभट रोड, एसटी स्टँड, महापालिका चौक, राजवाडा चौक, स्टेशन चौक, श्‍यामरावनगर, गावभाग, टिळक स्मारक मल्टिप्लेक्स या सर्व ठिकाणी पाणी साठले आहे. शहरातील सुमारे दहा हजार नागरिक या पुराने बाधित झाले असून, जनजीवन विस्कळित झाले आहे.  

निम्म्यापेक्षा जास्त वाळवा तालुका पुराच्या छायेत असताना इस्लामपूर शहरातील पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहेत. तालुक्याची यंत्रणा संपूर्ण इस्लामपूर शहरातून हाताळली जात असताना आता पेट्रोल मिळणे बंद झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. सकाळी फक्त एक लिटर इतके मर्यादित पेट्रोल मिळत होते, परंतु आता तेही देणे बंद केले आहे. वाळवा तालुक्यातील सुमारे पन्नासहून अधिक गावे महापुराने बाधित झाली आहेत. या गावातील लोकांना सध्या इस्लामपूर शहरातून मदतीचा ओघ सुरू आहे. 

अशी आहे स्थिती :  

  • कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग १३ हजार क्युसेकने कमी.  
  • एनडीआरएफचे २२१ जवान दाखल.  
  • जिल्ह्यातील सव्वा लाख लोकांचे स्थलांतर.  
  • जिल्ह्यातील २२ राज्य मार्ग, २९ प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली.
  • कोल्हापूर - मुंबई मार्ग बंद.
  • एसटी महामंडळाचे २० मार्ग बंद.  
  • जिल्ह्यातील ११७ गावे पूर बाधित.  
  • ३० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान.  
  • ८७ गावांतील वीजपुरवठा विस्कळित.  
  • १ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा बंद  
  • १२४ घरांची पडझड.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com