कापूस आयातीने मोडले विक्रम

देशातील कापसाला हवा तसा उठाव नाही. ज्या देशाला पाच-सात लाख गाठी हव्या असतात, ते चलन कमकुवत असलेल्या पाकिस्तान व इतर देशांना प्राधान्य देतात. पाकिस्तानचे चलन रुपया कमकुवत होतच असून, त्यांना १५२ रुपयांत एक डॉलर पडतो. यामुळे जे कापूस आयातदार देश आहेत, ते अशा कमकुवत चलन असलेल्या देशांमधून कापूस घेतात. भारताला एक डॉलर ६८ ते ६९ रुपयात पडतो. यामुळे भारतातून कापूस आयात इतर देशांना पाकिस्तानच्या तुलनेत महाग पडते. - अरविंद जैन, माजी अध्यक्ष,खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशन
सुतगिरणी
सुतगिरणी

जळगाव ः चीन-अमेरिकेतील व्यापार युद्धाचा परिणाम आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती बरी असल्याने इतर देशांच्या तुलनेत भारतीय कापसाची निर्यात या हंगामात जवळपास निम्म्याने घटली आहे. तर भारतीय कापूस देशांतर्गत मिलांना अमेरिका, ऑस्ट्रेलियाच्या कापसाच्या तुलनेत स्वस्त पडत असल्याने आयात तब्बल १७ ते २० लाख गाठींनी वाढण्याचा अंदाज आहे.  अमेरिका देशातील सर्वात मोठा कापूस निर्यातदार असून, तेथे मागील हंगामात २३८ लाख गाठींचे उत्पादन झाले. अमेरिकेत वस्त्रोद्योग नसल्याने तेथील ८५ टक्के कापसाची निर्यात केली जाते. अमेरिकेच्या कापसाचा सर्वात मोठा खरेदीदार म्हणून चीनची ओळख होती. परंतु व्यापार युद्धामुळे चीनशी संबंध ताणले गेले आणि चीनमधील कापूस निर्यात अमेरिकेतून कमी झाली. अमेरिकेला इतर खरेदीदारांचा शोध घ्यावा लागला. आफ्रिका, व्हिएतनाम व आखातात नवे खरेदीदार अमेरिकेने शोधले असून, एकूण निर्यातीमधील ७० टक्के कापसाची निर्यात चीनव्यतिरिक्त इतर देशांना अमेरिकेने केली.  दुसरीकडे भारतात सरत्या कापूस हंगामात कापसाचे दर वधारले. ते ६५०० रुपयांपर्यंत पोचले. रुईचे दरही प्रतिखंडी (३५६ किलो रुई) ४८ हजार रुपयांपर्यंत पोचले. सुविन या ३५ मिलिमीटर लांब धाग्याच्या रुईचे दर उच्चांकी स्थितीत असून, ते ६३ हजार रुपये खंडीपर्यंत पोचले. तर मध्य प्रदेशातील डीसीएचचे दरही ५५ ते ५८ हजार रुपये खंडीपर्यंत आहेत. गुजरातमधील शंकर-६ व इतर दर्जेदार रुईचे दर ४६ हजार रुपये खंडीपर्यंत आहेत. तर अमेरिका व ऑस्ट्रेलियातील २८ मिलिमीटर लांब धाग्याच्या रुईचे दर ४२ ते ४३ हजार रुपये दरात भारतीय मोठ्या मिलांना सध्या पडत आहेत. यामुळे कापसाची आयात देशात यंदा मागील पाच-सात वर्षांच्या तुलनेत तब्बल १७ ते २० लाख गाठींनी वाढेल, अशी स्थिती आहे.  जूनअखेरपर्यंत १८ लाख गाठींची आयात देशातील मिलांनी केली. तर आणखी १७ लाख गाठींचे सौदे झाले असून, त्यांचा पुरवठा येत्या महिनाभरात देशात होईल. मागील हंगामात देशात फक्त २० लाख गाठींची आयात झाली होती. परकी रुईला देशात मागणी वाढत असतानाच अडचणीत असलेल्या देशातील जिनिंग प्रेसिंग कारखानदारांनीदेखील रुईचे उत्पादन २४ टक्‍क्‍यांनी मागील दोन महिन्यात कमी केले आहेत.  देशात उत्पादन घटले, पण ताळेबंद बिघडला  देशात कापसाचे उत्पादन मागील हंगामाच्या तुलनेत सुमारे ३८ लाख गाठींनी (एक गाठ १७० किलो रुई) कमी झाले आहे. कॉटन असोसिएशनच्या अंदाजानुसार एकूण देशातील कापूस गाठींचे उत्पादन ३१२ लाख गाठी एवढे राहील. देशातून सरत्या कापूस हंगामात ५५ ते ६० लाख गाठींच्या निर्यातीचा अंदाज होता. परंतु निर्यात २५ लाख गाठींनी कमी झाली. तर आयात सुमारे २० लाख गाठींनी वाढणार आहे. दुसरीकडे जिनिंग प्रेसिंग कारखाने, सूतगिरण्यांनी उत्पादन कमी केल्याने शिल्लक गाठी वाढतील. मागील हंगामात ३१ लाख गाठी शिल्लक होत्या. सरत्या हंगामात शिल्लक गाठी ५५ लाख गाठींपर्यंत पोचतील. साठा अधिक राहणार असल्याने दरांवरील दबाव फारसा दूर होणार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com