आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
अॅग्रो विशेष
देशात यंदा विक्रमी अन्नधान्य होणार
नवी दिल्ली ः देशात वर्ष २०१७-१८ मध्ये बहुतेक भागांमध्ये सरासरीइतका मॉन्सून झाल्याने पेरणीत वाढ झाली आहे. खरीप हंगामातही पेरणी वाढली होती. त्यानंतर रब्बी हंगामातही शेतकऱ्यांनी मागील वर्षापेक्षा जास्त पेरा केला. त्यामुळे यंदा देशात विक्रमी अन्नधान्य उत्पादन होणार आहे, असा अंदाज कृषी विभागाने जाहीर केलेल्या दुसऱ्या सुधारित अंदाजात म्हटले आहे.
नवी दिल्ली ः देशात वर्ष २०१७-१८ मध्ये बहुतेक भागांमध्ये सरासरीइतका मॉन्सून झाल्याने पेरणीत वाढ झाली आहे. खरीप हंगामातही पेरणी वाढली होती. त्यानंतर रब्बी हंगामातही शेतकऱ्यांनी मागील वर्षापेक्षा जास्त पेरा केला. त्यामुळे यंदा देशात विक्रमी अन्नधान्य उत्पादन होणार आहे, असा अंदाज कृषी विभागाने जाहीर केलेल्या दुसऱ्या सुधारित अंदाजात म्हटले आहे.
कृषी विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, यंदा देशात अन्नधान्य उत्पादनात ०.९ टक्के वाढ होणार असून, एकूण उत्पादन २७७.४९ दशलक्ष टन होईल. मागील वर्षी २०१६-१७ मध्ये देशात अन्नधान्य उत्पादन २७५.११ दशलक्ष टन झाले होते. यंदा बहुतेक ठिकाणी सरासरी मॉन्सून झाल्याने तांदूळ, कडधान्य, भरडधान्य, कापूस आणि ऊस या पिकांच्या उत्पादनात वाढ होणार आहे, तर पीकवाढीच्या काळात नैसर्गिक आपत्तींचा फटका बसल्याने गहू आणि तेलबिया उत्पादन घटण्याचा अंदाज आहे.
२०१७ च्या पावसाळ्यात देशातील अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त, तर बऱ्याच ठिकाणी सरासरी पाऊस पडला. तसेच, उत्पादनवाढीसाठी सरकारने केलेल्या वेगवेगळ्या प्रयत्नांमुळे यंदा पेरणीत वाढ झाली आहे. त्यामुळे देशात यंदा विक्रमी अन्नधान्य उत्पादन होणार आहे.
देशातील ऊस उत्पादन यंदा १५.४ टक्क्यांनी वाढून ३५३.२३ दशलक्ष टन होणार आहे. मागील वर्षी ऊस उत्पादन ३०६.०७ दशलक्ष टन झाले होते, असेही कृषी विभागाने जाहीर केले आहे. कृषी विभागाने पहिला अंदाज सप्टेंबर २०१७ मध्ये जाहीर केला होता, तर तिसरा सुधारित अंदाज मे मध्ये आणि चौथा अंदाज आॅगस्ट महिन्यात जाहीर करणार आहे.
सोयाबीनमध्ये १३ टक्के घट येणार
देशात यंदा तांदूळ उत्पादन १११.०१ दशलक्ष टन होणार आहे. मागील वर्षीच्या उत्पादनापेक्षा १.२ टक्के जास्त तांदूळ उत्पादन यंदा होणार आहे. गहू उत्पादनात यंदा १.४२ टक्के घट होऊन ९७.११ दशलक्ष टन होणार आहे. मागील वर्षी २०१६-१७ मध्ये विक्रमी ९८.५१ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. कडधान्य उत्पादनातही यंदा वाढ होऊन मागील वर्षीच्या २३.१३ दशलक्ष टन उत्पादनापेक्षा वाढून २३.९५ दशलक्ष टन उत्पादन होणार आहे. तसेच भुईमूग, एरंडेल, तीळ, मोहरी, जवस, करडई, सूर्यफूल आणि सोयबीन इ. तेलबिया उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत ४.४५ टक्के घट होणार आहे. यंदा तलेबियांचे २९.८२ दशलक्ष टन उत्पादन होणार आहे, तर सोयाबीनच्या उत्पादनात १३ टक्के घट येणार आहे. कापूस उत्पादन ४.११ टक्के वाढून ३३.९२ दशलक्ष टन होणार आहे. भरडधान्य उत्पादन ४५.४२ दशलक्ष टन होणार आहे, असे कृषी विभागाने म्हटले आहे.