केळीला विक्रमी १६०० रुपये दर

खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला रमजान महिन्याच्या पार्श्‍वभूमीवर चांगला उठाव उत्तर भारतातून आहे. दर्जेदार केळीची आवक बऱ्यापैकी असून, दर विक्रमी स्थितीत म्हणजेच १६११ ते १६२५ रुपये प्रतिक्विंटल, असे झाले आहेत.
Record price of Rs. 1600 for banana
Record price of Rs. 1600 for banana

जळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला रमजान महिन्याच्या पार्श्‍वभूमीवर चांगला उठाव उत्तर भारतातून आहे. दर्जेदार केळीची आवक बऱ्यापैकी असून, दर विक्रमी स्थितीत म्हणजेच १६११ ते १६२५ रुपये प्रतिक्विंटल, असे झाले आहेत. केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारात केळीला सरबोजा किंवा ऑनचे (जादा) दरही मिळत आहेत.

केळीची निर्यात परदेशात १३ कंपन्यांच्या माध्यमातून सुरू आहे. यामुळे मार्चमध्येच केळी दरात चांगली सुधारणा झाली. मार्चअखेरीस दर १५०० रुपये प्रतिक्विंटल, असे झाले. सध्या एकट्या रावेरातून (जि. जळगाव) रोज आठ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची आखातातील इराण, इराक, बहरीन, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान आदी भागांत निर्यात होत आहे. यातच मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त केळीला उत्तर भारतातील प्रमुख खरेदीदारांकडूनही मागणी आहे.  दिल्लीच्या आझादपूर येथील बाजारात केळीला चांगला उठाव आहे. परिणामी, केळीच्या दरात चांगली तेजी आली आहे.

सध्या खानदेशात जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर व नंदुरबारमधील अक्कलकुवा, तळोदा व शहादा तालुक्यांत केळीची काढणी सुरू आहे. रावेर, मुक्ताईनगर, शहादा, यावल भागांत निर्यातक्षम केळीचे उत्पादन अधिक होत आहे. २२ ते २५ च्या रासची केळी या भागात उपलब्ध आहे. या केळीला अधिकचे दर मिळत आहेत. रावेर, यावल व मुक्ताईनगरातून मध्य प्रदेशातील खरेदीदार देखील केळीचा पुरवठा करून घेत आहेत. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरात दर्जेदार केळीला या हंगामात प्रथमच ऑनचे दरही मिळत आहेत.

दररोज दोन कंटेनर केळीची निर्यात खानदेशातून सध्या रोज २६० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीचा पुरवठा होत आहे. यातील कमाल केळीची पाठवणूक उत्तर भारतात होत आहे. शहादा व तळोदा भागातून रोज दोन कंटेनर केळीची परदेशात निर्यात होत आहे, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com