कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
अॅग्रोमनी
देशात तांदळाचे विक्रमी उत्पादन
देशात यंदा तांदळाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. यंदा १२ कोटी टन तांदूळ पिकवत भारताने जगात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
कोल्हापूर : देशात यंदा तांदळाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. यंदा १२ कोटी टन तांदूळ पिकवत भारताने जगात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. देशात पावसाळा चांगला झाल्याने भाताच्या उत्पादनाने उच्चांक स्थापन केल्याची माहिती तांदूळ उद्योगातील सूत्रांनी दिली.
संपूर्ण जगात तांदळाचे उत्पादन २०२०-२१ मध्ये ५०.३१ कोटी टन झाले. २०१८-१९ या वर्षी ४९.६३ कोटी टन झाले होते तर २०१९-२० मध्ये ५०.१२ कोटी टन तांदूळ जगभरात पिकला होता. यंदा जगाचे तांदळाचे उत्पादनसुद्धा विक्रमी आहे. त्याचे मुख्य कारण भारतात उत्पादन वाढले आहे.
निर्यातीवर नजर टाकल्यास २०२०-२१ मध्ये भारताकडून जगात साधारण १.४० कोटी टन ते १.४५ कोटी टन निर्यात होणे अपेक्षित आहे. ती जगात सर्वाधिक असेल. संपूर्ण जगाला भारतातून बासमती व नॉन बासमती तांदूळ मोठ्या प्रमाणावर निर्यात होतो. या वर्षी कोरोनाची परिस्थिती असताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर भारताकडून निर्यात झाली आहे.
जगातील बऱ्याच देशांनी या वर्षी तांदूळ आयात केला आहे. युरोपियन देशांनी जगात सर्वांत जास्त तांदूळ मागविला. युरोपियन देशांनी २५ लाख टन तांदूळ आयात केला आहे. युरोपियन देशांच्या पाठोपाठ फिलिपिन्स २३ लाख टन, चीन २२ लाख टन, सौदी अरब देशांनी १५ लाख टन, इराण १२ लाख टन, मलेशिया ११ लाख टन, बांगलादेश १० लाख टन, बेनिन ६ लाख टन, ह्याप्रमाणे देशांनी तांदूळ आयात केला आहे.
यंदा चीन ने तांदळाची कणी खूप मोठ्या प्रमाणावर मागवली आहे. युरोपियन देशांना आपल्या देशाकडून बासमती व नॉन बासमती तांदूळ खूप मोठ्या प्रमाणावर गेला आहे. चीन उत्पादनात जगात जरी नंबर एक वर असला, तरी त्यांनी यंदा तांदळाची आयात केली आहे. तर भारतात तांदूळ निर्यात होऊनसुद्धा शिल्लक राहत आहे. यंदासुद्धा भारतात २.८१ कोटी टन तांदूळ साठा शिल्लक राहत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
चीन पहिल्या क्रमांकावर
यंदा जागतिक उत्पादनावर नजर टाकल्यास चीन तांदूळ उत्पादनाबाबतीत अग्रक्रमावर आहे. चीनमध्ये १४.८३ कोटी टन तांदळाचे उत्पादन झाले. त्या खालोखाल भारतात १२ कोटी टन तांदळाचे उत्पादन झाले. भारतापाठोपाठ बांगलादेश ३.५३ कोटी टन, इंडोनेशिया ३.४९ कोटी टन, म्यानमार १.२९ कोटी टन फिलीपिन्समध्ये १.२० कोटी टन उत्पादन निघाले.
भारतातील तांदूळ उत्पादन (कोटी टनांत)
वर्ष ः उत्पादन कोटी टन
२०१८-१९ ः ११.६४
२०१९-२० ः ११.८४
२०२०-२१ ः १२
प्रतिक्रिया
निर्यातीत भारत सरकारने मोठे निर्यातदार, ग्राहक शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले आणि निर्यातीच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली, तर जी निर्यात १४५ लाख टन पर्यंत गेली आहे, त्यात पुन्हा वाढ होईल. देशात परकीय चलन मोठ्या प्रमाणात वाढेल. तांदूळ शिल्लक राहण्याचे प्रमाणसुद्धा कमी होऊ शकते
- राजेश शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम)
- 1 of 32
- ››