भारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर निर्यात

लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर निर्यातीचा वेग कायम राहिल्याने यंदा देशातून उच्चांकी साखर निर्यात झाली आहे. गेल्या दहा वर्षात यंदा होणारी साखर निर्यात ही सर्वांत जास्त असेल.
record sugar export from country
record sugar export from country

कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर निर्यातीचा वेग कायम राहिल्याने यंदा देशातून उच्चांकी साखर निर्यात झाली आहे. गेल्या दहा वर्षात यंदा होणारी साखर निर्यात ही सर्वांत जास्त असेल. जून अखेर इराण, इंडोनेशिया, मलेशिया आदींसह अन्य देशांना भारतातून ४९ लाख टन साखरेची निर्यात झाली. पुढील काही महिन्यात चार ते पाच लाख टन साखरेची निर्यात होऊ शकते. असे झाल्यास ही दशकातील सर्वोच्च निर्यात ठरेल, असे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.  यंदा केंद्राने साखर कारखान्यांना ६० लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट दिले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता कमी असली तरी उद्दिष्टाजवळ तरी कारखाने नक्कीच जातील असा विश्वास साखर उद्योगाला आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा साखरेच्या उत्पादनात वीस टक्के घट झाली. प्रतिकूल परिस्थितीमुळे महाराष्ट्र, कर्नाटक ही ऊस उत्पादनातील आघाडीची राज्ये यंदा उत्तर प्रदेशच्या बरीच मागे पडली. उत्तर प्रदेशात बंपर साखर उत्पादन झाले. यातच केंद्राने निर्यात साखरेला टनास १० हजार ४४८ रुपये अनुदान जाहीर केले. याचा लाभ महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशातील कारखान्यांनी उचलला. उत्तर प्रदेशात खासगी कारखाने असल्याने तेथील कारखान्यांनी तत्काळ निर्यातीला पसंती दिली. यामुळे निर्यात वाढीचा आलेख चढता राहिला.  गेल्या दहा वर्षातील स्थितीवर नजर टाकल्यास  फक्त गेल्या वर्षीचा अपवाद वगळल्यास २००९-१० ते २०१७-१८ पर्यंत फारशी निर्यात नव्हती. २०११-१२ व १३-१४ या वर्षात वीस लाख टनाहून निर्यात होती. यानंतर मात्र गेल्या वर्षीपर्यंत निर्यातीला कारखान्यांनी पसंती दिली नाही. गेल्या वर्षी मात्र केंद्राकडून अनुदानाबाबत सकारात्मक निर्णय झाल्याने निर्यातीत वाढ झाली.

कोविडपूर्वी तेजी कोविडचे संकट मार्चच्या उत्तरार्धात आले. जानेवारी, फेब्रुवारीत साखरेची चणचण होती. ब्राझीलचा हंगाम सुरु झाला नव्हता. यामुळे जगभरात साखरेच्या किमती वाढल्या. याचा फायदा साहजिकच निर्यात होणाऱ्या साखरेला झाला. या दोन महिन्यात तेजीचे वातावरण राहिल्याने कारखान्यांनी निर्यातीला प्राधान्य दिले. परिणामी निर्यात वाढली. जानेवारी अखेरपर्यंत ९ लाख टन साखर निर्यात केली होती. दर वाढल्याने फेब्रुवारी अखेरपर्यंत एकूण निर्यात २३ लाख टनापर्यंत गेली. त्यानंतरच्या पाच महिन्यांत आणखी २५ लाख टनांची भर पडत आता ती ४९ लाख टनांपर्यंत गेली आहे. 

पुढील वर्षी निर्यात कोट्यात वाढ शक्य यंदा समाधानकारक निर्यात होत असल्याने हाच किंवा याहून जास्त म्हणजे ७० लाख टनांपर्यंत निर्यात कोटा मिळण्याची साखर उद्योगाची अपेक्षा आहे. पुढील वर्षात थायलंड मध्ये साखर उत्पादन निम्यापर्यंत घटण्याची शक्यता असल्याने या देशातील निर्यातीला वाव मिळू शकेल, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचा आहे. याचा फायदा साखर कारखान्यांना निर्यातीसाठी होऊ शकतो, असे ‘इस्मा’च्या सूत्रांनी सांगितले.

दहा वर्षातील साखर निर्यात (लाख टनांत)

वर्ष  साखर निर्यात
२००९-१० २.३५
२०१०-११ २६
२०११-१२ २९.९२
२०१२-१३ ३.४८
२०१३-१४  २१.२७
२०१४-१५ १०.९४
२०१५-१६ १६.५६
२०१६-१७   ०.४६
२०१७-१८ ४.४६
२०१८-१९   ३८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com