तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा राष्ट्रीय विक्रम

इंडिया बुक ऑफ रेकार्डसमध्ये नोंद
इंडिया बुक ऑफ रेकार्डसमध्ये नोंद

कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण झालेल्या राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे आॅनलाईन लेखी परीक्षेच्या माध्यमातून एकाच दिवसात मूल्यांकन करण्याचा राष्ट्रीय विक्रम आज नोंदविण्यात आला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकार्डस (आयबीआर) आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌ (एबीआर) मध्ये नोंद झाली. भारत सरकारने पहिल्या जागतिक युवा कौशल्यदिनी घोषित केलेल्या राष्ट्रीय कौशल्य विकास अभियानाच्या (एनएसडीएम) चौथ्या वर्धापन दिनी हा विक्रम झाला.   भारतीय कृषी कौशल्य परिषद (एएससीआय), महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था (एमएसएसडीएस), महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद (एमएससीव्हीटी) आणि सिमॅसिस लर्निंग एलएलपी, पॅलेडियम कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एमएसएसडीएसचे संयुक्त प्रशिक्षण भागीदार) यांच्यामार्फत हे कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले होते.  आजच्या राष्ट्रीय विक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या शेती व्यवस्थापनातील बदलाचा सर्वंकष आढावा घेण्यात आला आणि नवा विक्रम प्रस्थापित झाला. कोल्हापूर, सांगली, लातूर व सातारा या जिल्ह्यातील कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचे मूल्यांकन झाले.  सायंकाळी लाटवडे (ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील ग्रामपंचायत सभागृहात  "बुक ऑफ रेकॉर्डस्‌''चे प्रतिनिधीनी आयोजक संस्थांना या विक्रमाचे सशर्त प्रमाणपत्र प्रदान केले. ॲग्रीकल्चरल स्किलिंग कौन्सिल ऑफ इंडियाचे व्हाईस प्रेसिन्डेन्ट कर्नल गुप्ता (दिल्ली), ए. एस. एल.आय.चे  निरीक्षक तरुणा स्नेही (दिल्ली), आशिया बुक ऑफ रेकॉर्डस व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसचे रेखा सिंग, जिल्हा कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, सरपंच कांचन चोपडे(लाटवडे) उपसरपंच-किरण माळी, तंटामुक्ती माजी अध्यक्ष अमर पाटील उपस्थित होते.  चारही जिल्ह्यांतील ३३ गावांत सकाळपासूनच मूल्यांकनासाठी या संस्थांचे पदाधिकारी दाखल झाले. सकाळी सहा वाजल्यापासून या विविध केंद्रे शेतकऱ्यांनी गजबजून गेली. ऑनलाईन लेखी परीक्षा आणि शेतकऱ्यांच्या वैयक्तिक मुलाखती असे याचे स्वरुप होते. शेतकऱ्यांची गटशेतीबाबतची उत्सुकता, त्यांचा पिकांचा अभ्यास, भविष्यात त्यांच्याकडून अपेक्षित असणाऱ्या आधुनिक शेतीबाबतच्या कल्पनांची माहिती अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून घेतली.  महाराष्ट्र सरकार ऑक्‍टोबर २०१८ पासून महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास (एमएसडीपी) कार्यक्रम राबवत आहे. हा कार्यक्रम प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत (पीएमकेव्हीवाय) राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या (एनएसडीसी) सहयोगाने राबविला जात आहे. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत याची अंमलबजावणी होते. ग्रामीण भागात कौशल्य आणि उद्योजकता विकासाला चालना देणे हा याचा उद्देश आहे. या कार्यक्रमातून दीड वर्षात राज्यभरातील सुमारे तीन लाख शेतकऱ्यांना गटशेती प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या नऊ महिन्यांत राज्यातील ११ जिल्ह्यांतील १.३ लाखांपेक्षा जास्त शेतकरी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. त्यापैकी एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. सुमारे ७५ हजार शेतकऱ्यांची परीक्षा झाली आहे. त्यापैकी साधारण ७० हजार शेतकरी गटशेती प्रवर्तक म्हणून प्रमाणित झाले आहेत. महिला शेतकऱ्यांचा यातील वाढता सहभाग हे मुख्य वैशिष्ट्य आहे. विक्रमामध्ये सहभागी शेतकरी

कोल्हापूर  १०२०
सांगली  १२२३
लातूर  ३५५
सातारा ४०२
एकूण ३०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com