कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या थकीत कर्जाची वसुली व्हावी, यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, अशी सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती For the recovery of crores of rupees A committee of experts will be formed
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती For the recovery of crores of rupees A committee of experts will be formed

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या थकीत कर्जाची वसुली व्हावी, यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, अशी सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. या सोबतच त्यांनी बँकेच्या आर्थिक बाबींचा  आढावा घेतला.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने एकहाती सत्ता मिळविली आहे. त्यानंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार वसंत चव्हाण तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर यांची शुक्रवारी (ता.१६) निवड करण्यात आली. त्यानंतर शनिवारी (ता. १७) चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृहात संचालक मंडळाची बैठक घेतली.

जिल्हा बँकेचे ६५८ कोटी रुपयांचे कर्ज येणे बाकी आहे. त्यातील शेतीकर्ज फक्त १६.६७ कोटी आहे. जिल्ह्यातील २० मोठ्या संस्थांकडे इतर कर्ज वसुलीअभावी बाकी आहेत. बँकेचा एनपीए तब्बल २९.४८ टक्क्यांवर पोहोंचला आहे. त्यामध्ये १९४ कोटीचे कर्ज एनपीएमध्ये गेले आहे. जिल्ह्यातील संस्थांकडे असलेल्या या कर्जवसुलीसाठी चार तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, अशी सूचना अशोक चव्हाण यांनी केली. 

या समितीमध्ये बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक, सनदी लेखापाल व उच्च न्यायालयातील एका ज्येष्ठ विधीतज्ज्ञाचा समावेश करावा, असे सांगतानाच या समितीने सर्व कायदेशीर बाबी तपासून एक महिन्याच्या आत अहवाल द्यावा, असेही पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या वेळी सांगितले. शासनस्तरावर साखर कारखान्याची घेतलेली थकहमी रक्कम वसूल करणे, कलंबर सहकारी साखर कारखाना विक्री प्रक्रियेचा पाठपुरावा करणे या बाबींकडे आपण लक्ष घालून हा प्रश्न निकाली लावण्याचे आश्वासन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.

राज्यातील इतर चांगल्या बँकांचे अनुकरण करीत जिल्हा बँकेला गतवैभव मिळवून देण्यासाठी संचालकांनी प्रयत्न करावेत, असे सांगतानाच शासनाकडून विविध योजनांतर्गत बँकेस प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या अनुदानाचे वाटप जलद गतीने करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी या वेळी केल्या. बँकेच्या जिल्ह्यात एकूण ६४ शाखा असून, या सर्व शाखांमधील कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार योग्य त्या ठिकाणी नेमणुका करण्यात याव्यात, अशा सूचना करतानाच जिल्हा बँकेच्या गतवैभवासाठी सर्वांनी समर्पित भावनेने काम करावे, असेही पालकमंत्री म्हणाले. 

या बैठकीस विधान परिषदेचे आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंत चव्हाण, उपाध्यक्ष हरिहर भोसीकर, संचालक माजी आमदार हनमंत पाटील बेटमोगरेकर, मोहन पाटील टाकळीकर, गोविंद नागेलीकर, बाबूराव कोंढेकर, विजयसिंह देशमुख, शिवराम लूटे, व्यंकटराव जाळणे, विजया शिंदे, सभापती संजय बेळगे, रामचंद्र मुसळे, बँकेचे सरव्यवस्थापक अरविंद शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम आदींची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com