`जायकवाडी’तून रब्बीसाठी सुटले आवर्तन

परभणी : मराठवाड्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प असलेल्या पैठण येथील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याव्दारे तुर्त रब्बी हंगामासाठी एक आवर्तन सोडण्यात आले आहे.
A recurring rotation for rabbis from `Jayakwadi '
A recurring rotation for rabbis from `Jayakwadi '

परभणी : मराठवाड्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प असलेल्या पैठण येथील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याव्दारे लाभत्रक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, परभणी या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुर्त रब्बी हंगामासाठी एक आवर्तन सोडण्यात आले आहे.

टेल टू हेड सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामातील उर्वरित आवर्तने तसेच उन्हाळी हंगामातील आवर्तनाचे नियोजन राज्य कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत  केले जाईल, अशी माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी जायकवाडी धरणात सिंचन आवर्तनासाठी पुरेशा प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु, विधान परिषद निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे राज्य कालवा सल्लागार समितीची बैठक होऊ शकलेली नाही. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन सोमवारी (ता.२३) या धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच जायकवाडी पाटबंधारे विभागाचे अभियंता यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे बैठक झाली.

यावेळी तूर्त रब्बी हंगांमातील सिंचनासाठी एक पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  डाव्या कालव्याचे एकूण लाभक्षेत्रात औरंगाबाद जिल्ह्यातील ७ हजार  ६२० हेक्टर, जालना जिल्ह्यातील ३६ हजार ५८० हेक्टर,  परभणी जिल्ह्यातील ९७ हजार ४०० हेक्टर मिळून एकूण १ लाख ४१ हजार ६४० हेक्टरचा समावेश आहे. तर, एकूण वितरण प्रणालीची लांबी १ हजार ३५० किलोमीटर आहे. उजव्या कालव्याव्दारे बीड आणि नगर जिल्ह्यातील ४१ हजार ६८२ हेक्टर क्षेत्र भिजू शकते. दोन्ही कालव्यांचे मिळून १ लाख ८३ हजार ३३२ हेक्टर एवढे लाभक्षेत्र आहे.

परभणीत १७५ गावांना लाभ 

परभणी जिल्ह्यात डाव्या मुख्य कालव्याची एकूण ८६ किलोमीटर (१२२ ते २०८ किलोमीटर) आहे. पाच शाखा कालवे तसेच ३२ सरळ वितरिकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील १७५ गावांतील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ होतो. लाभक्षेत्रात सेलू तालुक्यातील ९६ हेक्टर, मानवत तालुक्यातील ११ हजार ३९ हेक्टर, पाथरी तालुक्यातील २८ हजार ८३७ हेक्टर, गंगाखेड तालुक्यातील ६ हजार ४७१ हेक्टर, परभणी तालुक्यातील ३३ हजार ५२९ हेक्टर, पूर्णा तालुक्यातील १७ हजार ४२८ हेक्टरचा समावेश आहे.

पहिले पाणी आवर्तन सोडण्यात आले. सध्या प्रवाहाचा वेग कमी आहे. सोमवार (ता.३०) पर्यंत परभणी जिल्ह्यात पाणी पोहचू शकेल. जास्तीजास्त शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ व्हावा, यासाठी टेल टू हेड सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या आवर्तनाव्दारे २७ हजार हेक्टर सिंचनाखाली येऊ शकेल. - नितिन अंभुरे, कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे, विभाग क्रमांक २, परभणी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com