गुजरातच्या दूध संघाला महाराष्ट्र सरकारच्या पायघड्या; १२७ कोटींचे अनुदान?

पंचमहाल दूध संघाचा प्रस्ताव शासनाकडे आहे. ‘अमूल'ला राज्यात विस्तार हवा आहे, पण त्या संघाने मल्टिस्टेट म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे. गुजरात राज्याच्या सहकारी कायद्यात ते त्यांना शक्य नाही. ‘अमूल'ने महाराष्ट्रात त्यांच्या वितरण व्यवस्थेचा विस्तार नक्कीच करावा, पण राज्यातील दूध उत्पादकांचे हितसंरक्षण करणे माझे पहिले कर्तव्य आहे. तसे दुग्धविकास विभागाचे मत आम्ही केंद्र सरकारला सादर केले होते. तरीही केंद्र सरकारने पंचमहाल संघाला अनुदान देण्यासाठीची शिफारस पाठवली आहे. - अनुप कुमार, प्रधान सचिव, दुग्धविकास विभाग.
दूध संघ
दूध संघ

मुंबई ः अनुदानाअभावी दर पडल्याने महाराष्ट्रातील दूध उत्पादकांची फरपट होत असतानाच राज्य सरकार गुजरातमधील ‘अमूल' या बलाढ्य राज्य संघाच्या अाधिपत्याखालील पंचमहाल जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (मर्यादित गोध्रा, जि. पंचमहाल) (पंचामृत डेअरी) तब्बल १२७ कोटी रुपयांच्या अनुदानाची खैरात करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे दुग्धविकास आयुक्तालय तसेच मंत्रालयातील उच्चपदस्थांचे नकारात्मक शेरे डावलून भाजपप्रणीत राज्य सरकारने हे ‘धाडसी’ पाऊल उचलले आहे. कृषी खात्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत (आरकेव्हीवाय) महाराष्ट्रासाठी मंजूर हिश्श्यातून हे अनुदान मल्टी स्टेट (बहुराज्य) दर्जा नसलेल्या दूध संघाला दिले जाणार आहे. केंद्र शासनाने नुकतीच पंचमहालच्या या प्रस्तावाची शिफारस राज्याकडे पाठवली आहे. त्यानुसार लवकरच राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास कार्यक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय समितीत प्रकल्प मान्यतेची औपचारिकता पूर्ण होईल, असे विश्वसनीयरीत्या समजते. या संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे ‘सकाळ-अॅग्रोवन'च्या हाती लागली आहेत.   राज्यात भाजप सरकार सत्तेत आल्यापासून सहकार शुद्धीकरणाच्या नावाखाली काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यातील संस्थांची नाकाबंदी सुरू आहे. राज्य सहकारी बँक, सहकारी साखर कारखाने, जिल्हा सहकारी बँका, सहकारी दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समित्या आदी ठिकाणी आघाडीच्या नेत्यांची मक्तेदारी मोडीत काढण्याचा प्रयत्न होत आहे. त्याच वेळी गुजरातमधल्या सहकारी संस्थांना मात्र पायघड्या टाकल्या जात आहेत. राज्य शासनाने याआधीच गुजरातच्या अमूल डेअरीला राज्यातील दूध धंद्याचे दरवाजे खुले केले आहेत. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यातील तब्बल वीसहून अधिक दूध संघांचे अनुदानाचे प्रस्ताव गेली सव्वाचार वर्षे शासन दरबारी धूळ खात पडून आहेत. 

पंचमहाल संघाने नवी मुंबईतील तळोजा औद्योगिक वसाहतीत (ता. पनवेल, जि. रायगड) नवीन अद्ययावत दुग्धशाळा उभारणीचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे. दैनंदिन साडेसात लाख लिटर क्षमतेचा हा प्रकल्प आहे. नगर, नाशिक, पुणे, रायगड या जिल्ह्यांतून दूध संकलन करणार असल्याचे संघाने प्रस्तावात म्हटले आहे. त्यासाठी संघाने तळोजा औद्योगिक वसाहतीत जागा खरेदी केली आहे. या ठिकाणी नव्या डेअरीचे बांधकाम आणि यंत्रसामग्रीचा सुमारे २५४ कोटी रुपयांचा हा प्रस्ताव आहे. त्यासाठी आरकेव्हीवायमधून पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे. आरकेव्हीवाय ही योजना कृषी खात्यामार्फत राबविली जाते. या योजनेतून सुमारे १२७ कोटी रुपये अनुदानाच्या रूपाने पंचमहाल दूध संघाला मिळणार आहेत. यातले साठ टक्के म्हणजेच ७६ कोटी रुपये इतकी रक्कम केंद्र शासनाकडून आणि चाळीस टक्के म्हणजेच ५१ कोटी रुपये इतकी रक्कम राज्य शासन म्हणजेच राज्यातील जनतेच्या तिजोरीतून देणार आहे.   गुजरात प्रेमामागचे गौडबंगाल काय?  पंचमहाल दूध संघाने २०१६ मध्ये हा प्रस्ताव राज्याला सादर केला होता. मात्र, एवढ्या मोठ्या रकमेचा प्रस्ताव मंजूर करण्यास विभागाचे मंत्री महादेव जानकर यांनी असमर्थता दर्शवली होती. दुग्धविकास विभागातून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने संघाचा प्रस्ताव काही काळ पडून होता. राज्याच्या दुग्धविकास आयुक्तांनी सातत्याने अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या सर्व पत्रव्यवहारात या प्रस्तावावर प्रतिकूल शेरा मारला आहे. शिवाय कोणत्याच शासकीय योजनेअंतर्गत शासनाने आजपर्यंत राज्यातील कोणत्याही दूध संघाला एका वेळी २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे अनुदान दिलेले नाही.  (क्रमशः)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com