कापूस विक्रीसाठी करा परभणी बाजार समितीत नोंदणी

 Register for Parbhani Market Committee for sale of cotton
Register for Parbhani Market Committee for sale of cotton

परभणी : पणन महासंघामार्फत केली जात असलेली कापूस खरेदी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तात्पुरती बंद केली आहे. परंतु, कापूस खरेदी परत सुरू होईल, त्या वेळी आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन महासंघाकडे कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात प्राथमिक नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी क्रमानुसार शेतकऱ्यांना टोकन देण्यात येईल. त्यानंतर कापूस खरेदी केला जाईल. कार्यक्षेत्रातील कापूस विक्री न केलेल्या शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन परभणी बाजार समितीतर्फे करण्यात आले.

कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात गुरुवार (ता. १९) ते शुक्रवार (ता. २७) या कालावधीत इच्छुक शेतकऱ्यांची प्राथमिक नोंदणी केली जाणार आहे. त्यासाठी सन २०१९-२० मधील कापूस पीक पेऱ्याची नोंद असलेला ७-१२ उताऱ्याची अद्ययावत प्रत, आधारकार्ड, आधार संलग्न बॅंक पासबुकची छायांकित प्रतसोबत आणावी. शेतकऱ्यांनी चालू मोबाईल क्रमांक द्यावा.

नोंदणीनंतर संबंधित शेतकऱ्यास यादीतील क्रमानुसार कापूस विक्रीसाठी आणण्याबाबत एसएमएसव्दारे कळविण्यात येईल. त्यामुळे कापसाचे मोजमाप त्याच दिवशी होईल. मार्केट यार्ड किंवा खरेदी केंद्रावर थांबण्याची गरज पडणार नाही. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात पणन महासंघातर्फे केली जाणारी कापूस खरेदी कापूस साठवण क्षमता, ढगाळ वातावरण, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पणन महासंघातर्फे पुन्हा कापूस खरेदी सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना एसएमएसव्दारे कळविण्यात येईल.

प्राथमिक नोंदणी केलेल्या यादीतील क्रमानुसार कापसाची खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांनी बाजार समितीत कापूस विक्रीसाठी आणतेवेळी आरटीओने पासिंग दिलेल्या चारचाकी वाहनातूनच आणावा. ट्रक, सहाचाकी वाहनांतील कापूस स्वीकारला जाणार नाही. 

नोंदणीविना खरेदी नाही

कापसाच्या आर्द्रतेचे प्रमाण ८ टक्के पेक्षा जास्त असल्यास नियमाप्रमाणे कपात करण्यात येईल. १२ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता असलेला कापूस स्वीकारला जाणार नाही. प्राथमिक नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांसह नोंदणी करावी, असे आवाहन बाजार समितीचे सचिव विलास मस्के यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com