परभणी, हिंगोली जिल्ह्यात खरेदी केंद्रांवर ५२४ शेतकऱ्यांची नोंदणी

परभणी, हिंगोली : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत यंदा परभणी, हिंगोली जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीनची शेतमालाची खरेदी सुरू आहे.
 Registration of 524 farmers at shopping centers in Parbhani, Hingoli district
Registration of 524 farmers at shopping centers in Parbhani, Hingoli district

परभणी, हिंगोली  : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत यंदा परभणी, हिंगोली जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीनची शेतमालाची खरेदी सुरू आहे. राज्य सहकारी पणन महासंघाच्या खरेदी केंद्रांवर मंगळवार (ता.६) पर्यंत ५२४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. सात-बारा उताऱ्यावरील गटातील शेतकऱ्यांच्या एकत्रित पीक पेरा नोंदीमुळे ऑनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.

मूग, उडीद खरेदीसाठी १५ सप्टेंबरपासून, तर सोयाबीन खरेदीसाठी गुरुवार (ता.१) पासून  ऑनलाइन नोंदणी सुरु झाली आहे. परभणी जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघातर्फे बोरी, जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ, पू्र्णा या ठिकाणी, तर विदर्भ सहकारी पणन महासंघातर्फे मानवत आणि गंगाखेड येथे नोंदणी केली जात आहे.

मंगळवारपर्यंत मूगासाठी सेलू येथे १३२ शेतकऱ्यांनी, पाथरी ३२७ शेतकऱ्यांनी, सोनपेठ येथे १० शेतकऱ्यांनी असे एकूण ४६९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. 

उडदासाठी सोनपेठ येथे ५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मूग खरेदीसाठी परभणी येथे सक्षम संस्था न भेटल्यामुळे परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांना बोरी (ता.जिंतूर) येथील केंद्रावर नोंदणी करावी लागेल. मानवत आणि गंगाखेड येथे एकत्रित पीक पेरा प्रमाणामुळे नोंदणीसाठी अडचणी येत आहेत. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली येथील जुन्या जिल्हा रुग्णालयासमोर, तोफखाना येथे प्रगती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेतर्फे खरेदी केंद्र सुरू आहे. केंद्र चालक अमोल काकडे (मोक्र.८७८८४८७५८८) आहेत.

कळमनुरी येथे कयाधू शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादीत तोंडापूर संस्थेचे खरेदी केंद्र आहे. केंद्र चालक महेंद्र माने (मोक्र.७३६४४९३८३) हे आहेत. जवळा बाजार येथे औंढा नागनाथ तालुका खरेदी विक्री संघ मर्यादित यांच्यातर्फे खरेदी केली जाईल. केंद्र चालक कृष्णा हरणे (मोक्र.९१७५५८६७५८ ) आहेत. 

वसमत येथील बाजार समितीत वसमत तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित यांचे खरेदी केंद्र आहे. केंद्र चालक सागर इंगोले (मोक्र. ८३९०९९५२९४) आहेत. सेनगाव येथील हिंगोली रस्त्यावरील साई जिनिंग कारखाना येथे श्री संत भगवानबाबा स्वंयरोगार सेवा संस्थेचे केंद्र सुरु आहे. केंद्र चालक संदीप काकडे (मोक्र.७७५८०४००५०) आहेत. साखरा (ता.सेनगाव) येथे विजयालक्ष्मी बेरोजगार सहकारी संस्थेचे केंद्र आहे. केंद्र चालक माधव गाडे (मोक्र. ९४२३७३७६७२ ) आहेत. मुगासाठी हिंगोली येथे ४ शेतकऱ्यांनी, कळमनुरी येथे २, तर वसमत येथे १८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. सोयाबीनसाठी हिंगोली येथे २६ शेतकऱ्यांनी अशी एकूण ५० शेतकऱ्यांनी नोंदणी केली.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

नोंदणीसाठी खरीप हंगाम २०२०-२१ मधील पीक पेरा नोंद असलेला तलाठ्याच्या सही शिक्यानिशीचा ऑनलाइन सातबारा, आधारकार्ड, बँक पासबुकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड स्पष्ट असावा (जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये) यांच्या सत्य प्रती, चालू स्थितीतील मोबाईल क्रमांक. शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन परभणी, हिंगोलीचे जिल्हा पणन अधिकारी के. जे. शेवाळे, विदर्भ सहकारी पणन महासंघाचे जिल्हा व्यवस्थापक भागवत सोळंके यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com