हमीभावाने शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या वर्गवारीची नोंद

farmers registration
farmers registration

नांदेड ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने शेतमालाची विक्री करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रांवर ई-समृद्धी पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करतेवेळी यंदापासून शेतकऱ्यांच्या वर्गवारीची नोंद घेतली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण आदी वर्गवारीतील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद करता यावी. यासाठी २०१९-२० च्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांच्या वर्गवारीची नोंद घेतली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची वर्गवारीनिहाय माहिती (डाटा) सरकारला गरज पडेल तेव्हा उपलब्ध होईल, असे सूत्रांनी सांगितले. नाफेडतर्फे राज्य सहकारी पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ, महाएफसीसी यांच्यामार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत हमीभावाने शेतमालाची खरेदी केली जात आहे. त्यासाठी खरेदी केंद्र चालविणाऱ्या एजन्सीकडून शेतकऱ्यांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी यंदाच्या खरीप हंगामापासून ई-समृद्धी पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पोर्टलवर शेतकऱ्यांचे नाव, सात-बारा उतारा, पेरणीपत्रक, बॅंक पासबुक, आधार क्रमांक, चालू मोबाईल क्रमांक, लिंग, गाव, जिल्हा, राज्य आदी माहिती नमूद करण्यासोबतच यंदा तूरसाठी नोंदणी केली जात आहे तेव्हापासून शेतकऱ्यांची वर्गवारी नमूद करावी लागत आहे. परंतु संबंधित एजन्सीकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या ऑफलाइन नोंदणी अर्जावर वर्गवारीचा रकाना नाही. त्यामुळे नोंदणी करताना शेतकऱ्यांची नोंद सर्वसाधारण वर्गवारीत केली जात आहे. याशिवाय सात-बारा उतारा, पेरणीपत्रक, आधारकार्ड, बॅंक पासबुक आदी कागदपत्रे स्कॅन करून पोर्टलवर जोडावी (अॅटॅच) लागत आहेत. त्यामुळे एका शेतकऱ्याची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी १० ते १५ मिनिटांचा वेळ लागत आहे. हरभऱ्याची नोंदणी करताना ऑफलाइन अर्जावर वर्गावारीचा रकाना दिला जाईल, त्यामुळे ऑनलाइन नोंदणी करतेवेळी शेतकऱ्याची योग्य वर्गवारी नमूद करता येईल, असे नोंदणी केंद्रावरील सूत्रांनी सांगितले. ऑनलाइन नोंदणीच्या वेळी वर्गवारी नमूद करावी लागत असल्याबद्दल अनेक शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. माहिती संकलित करण्याचे निर्देश आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण आदी वर्गवारीतील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद करता यावी, तसेच अशा प्रकारे संकलित केलेली माहिती सरकारला गरज पडेल त्या वेळी उपलब्ध व्हावी त्यासाठी हमीभावाने शेतमालाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा वर्गवारीनिहाय डाटा तयार करावा, असे निर्देश केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाअंतर्गत डाळी आणि तेलबिया व्यवस्थापकांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com