नाशिक जिल्ह्यात निर्यातक्षम द्राक्ष बागांच्या नोंदणी घटल्या

सुरुवातीला सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक बागा फुलोऱ्यातील घडकुजीने गेल्या, तर ऑक्टोबरमधील बागा घड जिरणे व डाऊनीमुळे बाधित झाल्या आहेत. त्यामुळे जानेवारी महिन्यात लवकर सुरू होणाऱ्या निर्यातीसाठी माल कमी येणार असल्याने निर्यातीवर परिणाम होणार आहे. - माणिकराव पाटील, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक विभाग
grapes export
grapes export

नाशिक : यंदाच्या हंगामात अतिवृष्टीमुळे मुख्यत्वेकरून कसमादे पट्ट्यातील पूर्वहंगामी द्राक्ष बागांचे नुकसान झाले. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत छाटणी झालेल्या बागांचेही पावसाने मोठे नुकसान झाले आहे. याचा परिणाम निर्यातीसाठी ‘ग्रेपनेट’वर होणाऱ्या नोंदणीवर झाल्याचे दिसून येत आहे. यंदा जिल्ह्यात द्राक्ष बागा नोंदणीचे प्रमाण २८ टक्क्यांनी घटले असून, चार वर्षांतील ही नीचांकी नोंदणी आहे. जिल्ह्यात डिसेंबरअखेर केवळ १७ हजार ७०७ हेक्टरवरील २७ हजार ८३२ बागांची नोंदणी झाली. गतवर्षी ३८ हजार ४७८ द्राक्ष बागांची नोंदणी झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील सूत्रांनी दिली. नाशिक, निफाड, चांदवड, दिंडोरी, देवळा, सटाणा, येवला या तालुक्यांमधील द्राक्ष बागांवर यंदा प्रतिकूल हवामानाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या सततच्या पावसामुळे द्राक्ष बागा मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या आहेत. सप्टेंबर महिन्यातील छाटणी केलेल्या बागांमध्ये फुलोऱ्यातील घडकुज ही समस्या मोठ्या प्रमाणावर झाली, तर ऑक्टोबरमधील छाटणी केलेल्या बागा घड जिरण्यामुळे गेल्या आहेत. त्यात डाऊनीचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक बागांतील द्राक्षे निर्यातक्षम गुणवत्तेची राहिलेली नाहीत. दरवर्षी जानेवारीमध्ये काढणीसाठी येणाऱ्या द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे. त्यामुळे निर्यातीसाठी सुरुवातीला माल कमी होईलच, त्यासह अर्थकारण व रोजगारावर सुरुवातीच्या टप्प्यात फटका बसणार आहे. या सर्व घटकांचा परिणाम निर्यातीसाठीच्या ग्रेपनेट प्रणालीतील नोंदणीवर झाला आहे.  प्रतिक्रिया सप्टेंबर महिन्यात तयार केलेल्या पहिल्या टप्प्यातील द्राक्ष बागा मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या आहेत. त्यामुळे ८० ते ९० टक्के नुकसान आहे. त्यामुळे निर्यातीसाठी आवश्यक गुणवत्तेचा माल कमी येणार असल्याने निर्यात कमी होईल.  - हेमंत पिंगळे, प्रयोगशील द्राक्ष उत्पादक, लखमापूर, ता. दिंडोरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com