‘सिट्रसनेट’वरील नोंदणी सहाशेंवर

संत्रा निर्यातीला चालना मिळावी याकरिता सिट्रसनेट हे वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहे. परंतु या बाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती नसल्याने विदर्भातील संत्रा उत्पादकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता.
nagpur orange
nagpur orange

नागपूर : संत्रा निर्यातीला चालना मिळावी याकरिता सिट्रसनेट हे वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहे. परंतु या बाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती नसल्याने विदर्भातील संत्रा उत्पादकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. अवघ्या ५० शेतकऱ्यांनीच यावर नोंदणी केली होती. या संदर्भाने `ॲग्रोवन`ने देखील वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर कृषी विभागाने या विषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकतेसाठी विशेष अभियान राबविले. त्याचा परिणाम म्हणून रविवारपर्यंत (ता. २०) `सिट्रसनेट`वरील नोंदणीचा आकडा ६१८च्या पार गेला होता. त्यामध्ये विदर्भातील सर्वाधिक ५६५  बागायतदारांचा समावेश आहे.  शेतमाल निर्यातीला चालना मिळावी याकरिता केंद्र सरकार, अपेडा व राज्य शासनस्तरावर प्रोत्साहन दिले जात आहे. त्या अंतर्गंत `अपेडा`च्या सहकार्याने विविध निर्यातक्षम पिके आणि फळ बागांच्या नोंदणीकरीता त्या ऑनलाइन पर्याय उपलब्ध केला आहे. संत्र्याकरीता `सिट्रसनेट`च्या माध्यमातून बागायतदारांना त्यांच्या बागेची नोंद करता येते. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, या संदर्भाने शेतकऱ्यांमध्ये माहितीचा अभाव असल्याने पहिल्यावर्षी अवघ्या ४५ ते ५० शेतकऱ्यांचीच नोंदणी यावर झाली होती. त्यामुळे `सिट्रसनेट`वरील नोंदणी, सिट्रस क्‍लस्टर यांना भविष्यात मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल साशंकता व्यक्‍त होत होती.  `ॲग्रोवन`ने हा विषय लावून धरल्यानंतर अखेरीस कृषी विभागाने हा प्रकार गांभीर्याने घेत `सिट्रसनेट`वरील नोंदणी संदर्भाने व्यापक अभियान राबविले. त्याच्याच परिपाक म्हणजे आता `सिट्रसनेट`वरील नोंदणीधारकांचा आकडा ६१८ वर पोचला आहे. यातील ६१७ बागा या महाराष्ट्रातील असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यातही दिलासादायक बाब म्हणजे यामध्ये ५६५ बागायतदार विदर्भातील आहे. नागपूर जिल्ह्यातील नरखेड १६५, कळमेश्‍वर १४६, काटोल ६२, सावनेर ६१, हिंगणा पाच याप्रमाणे बागांची नोंदणी आहे. अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्‍यात ३४, वरुड २३, अंजनगावसूर्जी, अचलपूर १२, चांदूरबाजार ८, चांदूररेल्वे सात, तिवसा २ अशी स्थिती आहे. वर्धा जिल्हयात कारंजा १६, आर्वी ८, सेलू २. अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्‍यात १६, अशी नोंद झाली आहे.

प्रतिक्रिया निर्यातक्षम बागांची ओळख, निर्यातदाराला थेट पुरवठा करता येतो, शेतमालाची विश्‍वासार्हता वाढते, कीडनाशक उर्वरित अंश नसल्याची हमी वाढते, भौगोलिक मानांकन मिळालेल्या फळपिकांबद्दल अधिकृत वापरकर्ता नोंदणीसाठी मदत होते, असे अनेक फायदे नेटवरील नोंदणीतून होतात. संत्रा उत्पादकांनी देखील अधिकाधिक नोंदणी करावी. कारण `अपेडा`ने संत्रा क्‍लस्टर जाहीर केले आहे. त्या माध्यमातून अनेक प्रकारचे फायदे होतील.  - गोविंद हांडे, पणन तज्ज्ञ अशी आहे नोंदणी

नागपूर  ४३९ 
अमरावती  १०४ 
वर्धा  २६ 
अकोला  १६ 
पुणे  २७ 
जळगाव  ३ 
जालना    १
अहमदनगर     १ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com