फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू ः सदाभाऊ खोत

फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू ः सदाभाऊ खोत
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू ः सदाभाऊ खोत

रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत कोकणातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचन अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या अडचणींविषयी चर्चा करून ती अट शिथिल करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन कृषी, फलोत्पादन पणन आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले .

नाणीज (ता. रत्नागिरी, जि. रत्नागिरी) येथील दौऱ्याप्रसंगी रत्नागिरी तालुका कृषी आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी कृषी व ग्रामीण पाणीपुरवठा विभागांचा आढावा घेतला. 

या आढावा बैठकीत भात लागवड व फळबाग लागवडीच्या प्रगतीसंदर्भात सूचना केल्या. भात बियाण्यांच्या उपलब्धतेविषयी आढावा घेऊन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यात फळबाग लागवड योजना महत्त्वाची असून, या संदर्भात ग्राम स्तरापर्यंत बैठका घेऊन जास्तीत-जास्त क्षेत्र फळबाग लागवडीखाली आणण्याविषयी मार्गदर्शन केले. कोकणातील शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत ठिबक सिंचन अनिवार्य केल्यामुळे येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा करून सदरील अट शिथिल करणेबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

फळबागेत पाण्याचे नियोजन होण्याच्या दृष्टीने डोंगराळ परिस्थिती पाहून शेततळ्याचा आकार कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच आंबा पुनरुज्जीवनाबाबत वाढती मागणी लक्षात घेऊन अनुदान वाढविण्यात येईल. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात कमी खर्चाचे शेडनेट अंतर्भूत करण्याचा विचार सुरू आहे. कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन तंत्रज्ञान प्रचार अणि प्रसाराचे काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

कोकणातील मजूर टंचाई लक्षात घेता कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत जेवढे प्रस्ताव येतील तेवढ्या सर्व प्रस्तावांना अनुदान देण्याची तरतूद करू, असेही आश्‍वासन या वेळी दिले. यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत फळबागेच्या फवारणीकरिता पॉवरस्प्रेअर या अवजाराचा समावेश करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.  या बैठकीला विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग विकास पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्या अन्य अधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com