बंदरात अडकलेल्या आयात वस्तू सोडा 

चीनमधून आयात होत असलेल्या सुट्या भागांचे कंटेनर अडविले जात असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय वाणिज्य तसेच अर्थ मंत्रालयाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
nitin gadkari
nitin gadkari

पुणे : चीनमधून आयात होत असलेल्या सुट्या भागांचे कंटेनर अडविले जात असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय वाणिज्य तसेच अर्थ मंत्रालयाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘‘बंदरात कंटेनर अडविल्याने चीनऐवजी भारतीय उद्योगांचे नुकसान होईल,’’ अशी भूमिका गडकरी यांनी मांडली आहे. 

देशाच्या विविध क्षेत्रासाठी लागणारा पक्का व कच्चा माल मोठ्या प्रमाणात चीनमधून येतो. तसेच, विविध अवजारे, यंत्रे, कीडनाशके, द्रवरूप खते मोठ्या प्रमाणात चीनमधून आयात होतात. सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर भारताने चीनची व्यापारी कोंडी करण्यासाठी चिनी कंटेनरची तपासणी करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे बंदरात कंटेनरची कोंडी झाली आहे. भारतीय कृषी उद्योगाचा शेकडो कोटींचा माल अडकून पडला आहे. यामुळे हैराण झालेल्या उद्योजकांनी मंत्री गडकरी यांच्याकडे कैफियत मांडली. 

चीनची कोंडी करण्याच्या नादात देशाच्या विविध बंदरांमध्ये होत असलेल्या घडामोडी व त्यातून देशी उद्योगांसमोर उद्भवलेल्या समस्यांविषयी मंत्री गडकरी यांनी रविवारी (ता.२८) अर्थ मंत्रालय व वाणिज्य मंत्रालयाला पत्र लिहिले. ही समस्या सोडविण्याची सूचना त्यांनी केली आहे. 

भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एकट्या चीनमधून नव्हे, तर इतर सर्वच देशांमधून होणारी आयात कमी केली पाहिजे. अर्थात, हे करताना निर्यात वाढविण्यासाठी विविध उपाय करावे लागतील. त्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील, अशी भूमिका श्री. गडकरी यांनी घेतली आहे. कृषी क्षेत्रातील अभ्यासकांनी श्री. गडकरी यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. 

दरम्यान, भारत-चीन वाद भविष्यात चिघळल्यास देशाच्या कृषी व्यवस्थेवर मोठे परिणाम होतील, असे मत कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत. चीनशी भारताने कृषी व संलग्न व्यापार अलीकडच्या काही वर्षांत वाढवला आहे. २०१८-१९ मध्ये भारताने चीनला एक हजार ९९९ दशलक्ष डॉलर्सची कृषी उत्पादने विकली आहेत. विशेष म्हणजे २०१७-१८ च्या तुलनेत ११७ टक्क्यांनी व्यापार वाढला आहे. 

कापूस, एरंड तेल, मत्स्य उत्पादने चीनला जातात. याशिवाय आता गहू, भाजीपाला बियाणे, विविध फळे निर्यात होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चीनदेखील २८० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची कृषी उत्पादन भारताला आयात करतो. 

‘‘भारत नव्हे, तर अमेरिकेतील कृषी उत्पादनालादेखील ही समस्या येईल. कारण, दोन वर्षांपूर्वीपर्यंत २३ अब्ज डॉलर्स इतकी अफाट कृषी निर्यात अमेरिकेतून चीनमध्ये झाली आहे. अमेरिकेत पिकणाऱ्या सोयाबीनपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त सोयाबीन चीन विकत घेतो,’’ अशी माहिती विदर्भातील एका सोयाबीन प्रक्रिया प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली.  इतर पर्यायांचा विचार करावा  भारतीय कंपन्यांच्या विविध उत्पादने आयात करण्यासाठी चीनमध्ये आगाऊ पैसे भरून ऑर्डर नोंदवतात. त्यामुळे आयात झालेली चिनी उत्पादने अडवून ठेवली तर आपलेच नुकसान होईल. चीनमधून बंदरात आलेल्या वस्तू अडकून ठेवल्यास त्याचा फटका आपल्याला बसू शकतो. यापेक्षा चिनी वस्तूंची आयात घटविण्यासाठी इतर पर्यायांचा विचार करायला हवा. आयात कर वाढविण्याचा पर्यायदेखील वापरता येईल, असे स्पष्ट मत मंत्री गडकरी यांनी या दोन्ही मंत्रालयांना कळविले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com