‘रिलायन्स’ पीकविमा भरपाई देण्यास तयार

दहा जिल्ह्यांचे विमा कंत्राट घेत ४३० कोटी रुपये गोळा करणाऱ्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने आता नरमाईची भूमिका घेतली आहे. कंपनीने चालू हंगामातील भरपाई वाटण्याचे बिनशर्त कबुल केले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
Reliance ready to pay crop insurance
Reliance ready to pay crop insurance

पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी दहा जिल्ह्यांचे विमा कंत्राट घेत ४३० कोटी रुपये गोळा करणाऱ्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने आता नरमाईची भूमिका घेतली आहे. कंपनीने चालू हंगामातील भरपाई वाटण्याचे बिनशर्त कबुल केले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी  दिली. 

 ‘रिलायन्स’ने सरकार व शेतकऱ्यांकडून विमाहप्त्यापोटी आतापर्यंत सव्वादोन हजार कोटी रुपयांचा नफा मिळवलेला आहे. चालू खरीप २०२१ मध्येदेखील ‘रिलायन्स’ने ४३० कोटी ५९ लाख रुपये गोळा केले. मात्र, नफ्याच्या हव्यासापोटी केलेले आहेत. नुकसान भरपाई वाटण्यास साफ नकार दिला होता. कंपनीने ३० दिवसांत मध्य हंगामातील आणि १५ दिवसांच्या आत स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधील दावे निकालात काढणे आवश्यक होते. मात्र, कंपनीने, ‘‘आधी आम्हाला गेल्या खरीप २०२० हंगामातील प्रलंबित रक्कम द्यावी; अन्यथा चालू खरिपातील भरपाई देणार नाही,’’ असा उफराटा पवित्रा घेतला. त्यामुळे राज्य शासनाने कंपनीच्या विरोधात केंद्राकडे गंभीर तक्रार केली होती.  

वाटपाचे वेळापत्रक जाहीर नाही सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ‘रिलायन्स’ने आता आपली ताठर भूमिका मागे घेतली आहे. भरपाईवाटपदेखील चालू केले आहे. राज्य शासनासोबत झालेल्या बैठकीतही ‘रिलायन्स’ने नमते घेतले. कंपनीने एका जिल्ह्यात २३ कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकतेच वाटले आहेत. इतर जिल्ह्यांमधील रकमादेखील आठ दिवसांच्या आत वाटण्याचे ‘रिलायन्स’ने मान्य केले आहे. त्यामुळे या कंपनीकडून ३७७ कोटी रुपये नैसर्गिक आपत्ती नुकसानीपोटी; तर २२ कोटी रुपये मध्य हंगामातील नुकसानीपोटी वाटले जाण्याची शक्यता आहे. रिलायन्स कंपनीच्या प्रतिनिधींनी भरपाई वाटण्याऐवजी शेतकऱ्यांकडून लाच घेतल्याचेही प्रकार उघडकीस आले आहेत. कंपनीवर दोन जिल्ह्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला. भरपाई देणार असल्याचे आश्वासन आता कंपनी देत असली तरी वेळापत्रक जाहीर केलेले नाही. कोणत्या जिल्ह्यात, किती शेतकऱ्यांना भरपाई मिळेल, वाटपाची अंतिम मुदत काय असेल, याबाबत कंपनीने पारदर्शकपणे माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधील संभ्रम कायम आहे. 

इफ्कोनेदेखील हेका सोडला दरम्यान, इफ्को कंपनीनेदेखील ५७० कोटी रुपयांचे वाटप करणे अपेक्षित असताना केवळ ४३० कोटी रुपयांपर्यंत वाटप करून पुढील रकमा अदा करणे थांबविले होते. ‘‘आम्हाला मागचे अनुदान दिले तरच सध्याचे वाटप करता येईल,’’ अशी हेकेखोर भूमिका ‘इफ्को’नेही घेतली होती.

पूर्वसूचना दाखल करा राज्यात अवकाळी पावसामुळे तूर, कापसाचे उभ्या पिकांचे नुकसान झाले. पूर्वसूचनेनंतर पंचनामा झाला तरच नुकसान भरपाई मिळू शकेल. मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांनी पूर्वसूचनेसाठी मोबाईल अॅपचा वापर करावा. नुकसानग्रस्त पिकाची चित्रफीत काढावी. अंक्षाश-रेखांश संलग्न छायाचित्रेदेखील काढून ठेवावी. सदर पुरावे प्रत्यक्ष सर्व्हेक्षण व नुकसानभरपाई प्रमाण ठरविताना उपयुक्त ठरतात.”  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com