Agriculture news in marathi Reorganize the milk business | Agrowon

दूध व्यवसायाची नव्याने करा मांडणी

डॉ. पराग घोगळे
गुरुवार, 18 जून 2020

देशी गायीचे दूध, फार्म फ्रेश दूध, निर्जंतुक, मनुष्याचा हात न लागलेले दूध, प्रतिजैविकेविरहित दूध, ओमेगा फॅटयुक्त दूध इ. यामुळे ग्राहकाला विविध प्रकारच्या दुधाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. दूध व दुधापासून बनविलेल्या पदार्थांची आपण कशी विक्री करू शकतो यावर आपल्या व्यवसायाच्या नफ्याचे गणित ठरते.
 

देशी गायीचे दूध, फार्म फ्रेश दूध, निर्जंतुक, मनुष्याचा हात न लागलेले दूध, प्रतिजैविकेविरहित दूध, ओमेगा फॅटयुक्त दूध इ. यामुळे ग्राहकाला विविध प्रकारच्या दुधाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. दूध व दुधापासून बनविलेल्या पदार्थांची आपण कशी विक्री करू शकतो यावर आपल्या व्यवसायाच्या नफ्याचे गणित ठरते.

दूध व्यवसाय करताना त्याच्या अर्थशास्त्राच्या बाबतीत उत्पादकाने साक्षर होणे गरजेचे आहे. दूध हे नाशवंत उत्पादन असल्यामुळे खुल्या बाजारातील विक्री व उत्पादने बनविल्यानंतर उरणाऱ्या दुधाची पावडर केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात स्किम्ड मिल्क पावडर विकली जाते. सुमारे ११ टन दुधापासून १ टन दूध पावडर किंवा स्किम्ड मिल्क पावडर बनते. ही पावडर जास्त काळ टिकत असल्यामुळे डेअरी कंपन्या, सहकारी संस्था इत्यादी अतिरिक्त दुधाचे पावडरमध्ये रूपांतर करून ठेवतात. इतर पदार्थ जसे की, आइस्क्रीम, पनीर, चीज, दही बनवतात. आंतरराष्ट्रीय बाजारात स्किम्ड मिल्क पावडरच्या किमती कमी झाल्यास निर्यात मंदावते. त्याचा परिणाम दुधाच्या पावडरचा देशांतर्गत साठा वाढण्यात होतो. त्यामुळे काही वेळा दुधाच्या किमती कमी होतात.

दुधाचा दर

 • पशुपालक उत्पादित दूध हे खासगी/सहकारी संस्थांना विकतात किंवा थेट जवळच्या शहरात किंवा तालुक्यात जाऊन रतीब घालतात. उत्पादकांना दुधाची किंमत दुधाचे वजन, त्यातील घटक, स्वच्छतेचे निकष व मागणी यावर ठरत असते. सध्यातरी ग्रामीण भागातील उत्पादकांना दुधाची किंमत ही दुधातील फॅट व एस एन एफ यावर मिळत आहे.
 • सध्या दुधाचे दर कमी झाले असले तरी सरासरी २५ ते ३० रुपये दर हा गायीच्या दुधाला मिळत असून पॅकेटबंद दूध ४४ ते ४६ रुपये प्रति लिटर या दराने विकले जाते. तर काही फार्मस त्यांच्या दुधाची विक्री थेट ग्राहकांना करतात. त्यासाठी ५५ ते ७० रुपये प्रति लिटर इतका दर आकारला जातो. यासाठी विविध ब्रॅंड व मार्केटिंगचे तंत्र वापरले जाते. यामध्ये देशी गायीचे दूध, फार्म फ्रेश दूध, निर्जंतुक, मनुष्याचा हात न लागलेले दूध, प्रतिजैविकेविरहित दूध, ओमेगा फॅटयुक्त दूध यामुळे ग्राहकाला विविध प्रकारच्या दुधाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे दूध व दुधापासून बनविलेल्या पदार्थांची आपण कशी विक्री करू शकतो यावर आपल्या व्यवसायाच्या नफ्याचे गणित ठरते. स्वच्छ व निर्जंतुक दुधाला यापुढे मागणी वाढेल.

व्यवसायाची योग्य आखणी महत्त्वाची
चांगली व जास्त दूध देणारी जनावरे

 • जितक्या जास्त दूध देणाऱ्या, स्थानिक वातावरणाशी जुळवून घेणाऱ्या गाई, म्हशी गोठ्यामध्ये असतील तेवढा त्यांच्या देखभालीवर होणारा खर्च कमी असतो.
 • दुभत्या गायी, गाभण गायी, कालवडी वासरांची तुलनात्मक संख्या असणे, त्यांचा विमा काढणे, ओळखीसाठी टॅगिंग करून घेणे महत्त्वाचे आहे.
 • निरोगी गाई, म्हशी जास्त काळ दूध देऊ शकतात. त्यासाठी वेळेवर लसीकरण व जंतुनाशक औषधाची फवारणी गोठ्यात करावी.
 • अर्थशास्त्राचा अभ्यास करून जमा-खर्च नोंदणी वही, संगणक किंवा मोबाईल अॅपवर करून ठेवल्यास नेमका जमा-खर्च लक्षात येऊन भविष्यात फायदाच होईल.
 • चाऱ्यावर असणारी आत्मनिर्भरता जितकी जास्त असेल, तेवढा कोरडा व हिरव्या चाऱ्यावर होणारा खर्च कमी होतो. जनावरांसाठी हिरवा चारा १२ महिने उपलब्ध असेल तर दूध उत्पादन वाढण्याबरोबरच त्यांना त्यातून जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणावर मिळतात. प्रजननक्षमता चांगली राहाते. जनावरे लवकर आजारी पडत नाहीत.
 • गोठ्याची चाऱ्याची वर्षभराची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे चारा पिकाचे नियोजन केल्यास कमी किमतीत हिरवा चारा जनावरांना उपलब्ध होतो. हिरव्या चाऱ्यात ८० ते ८५ टक्के पाणी असते, तर मूरघासामध्ये ६५ ते ७० टक्के पाणी असते. म्हणून मूरघास त्या प्रमाणात कमी लागते.
 • भविष्यात संकट येणार असे गृहीत धरून दुधापासून उपपदार्थ बनविण्याची तयारी ठेवावी.

दुग्ध व्यवसाय करताना महत्त्वाच्या गोष्टी 
जमीन

 • जनावरांचा गोठा, चारा यासाठी प्रति १० जनावरांसाठी १.५ एकर जमीन लागते. नवीन गायी विकत आणताना ५० ते ७० हजार प्रति जनावर खर्च येतो.
 • गोठा उभारणी, चांगली शेड उभी करणे, जनावरांचे ऊन, पावसापासून संरक्षण करण्यासाठी येणारा प्रत्यक्ष खर्च.
 • गोठ्यावर लागणारी उपकरणे, जसे की दूध काढणी यंत्र, चाफ कटर, फॉगर यंत्रणा, थंडावा देणारी यंत्रणा.

दहा गायींच्या गोठ्यासाठी येणारा खर्च
दहा जनावरांसाठी सुमारे १० ते १२ लाख रुपये भांडवल लागते, यातील निम्मा खर्च हा जनावरांच्या खरेदीसाठी गृहीत धरला जातो.

एकदाच होणारा खर्च (फिक्स कॉस्ट)

 • गायींची किंमत- उदा. ५०,००० x १० गायी, यातील ८ दुधामध्ये तर २ गाभण, भाकड गाई.
 • गायींचा घसारा- समजा आता ५० हजार रुपयांना घेतलेली गाय ५ वर्षांनी २५ हजार रुपयांना विकली तर दरवर्षी ५ हजार रुपये गायीची घसारा किंमत, म्हणजेच गायीची दर वर्षी कमी होत जाणारी किंमत.

लागणारी जागा 
एका जनावराला ५० ते ७० फूट जागा बंदिस्त गोठ्यात तर सुमारे १०० फूट जागा मुक्त गोठ्यामध्ये लागते. यासाठी लागणाऱ्या जमिनीचा खर्च स्वतःची जमीन किंवा भाडेतत्त्वावर.

बांधकामाचा खर्च

 • गोठ्यातील बांधकामासाठी सुमारे २५० ते ३०० रु. प्रति चौरस फूट. तर खुल्या जागेतील बांधकामासाठी १०० रुपये प्रति चौरस फूट इतका खर्च येतो.
 • बांधकामाचे आयुष्यमान २५ ते ३० वर्षे व त्याप्रमाणे येणारा घसारा १० टक्के दर वर्षी.

यंत्रणा आणि रोज लागणाऱ्या वस्तूंचा खर्च
दुधाचे कॅन, चाफ कटर, वेसण, दूध काढणी यंत्र, शेणाची ट्रॉली इत्यादी उपकरणांचे आयुष्यमान ८ ते १० वर्षे असते. त्यामुळे येणारा घसारा २० टक्के दरवर्षी याप्रमाणे गृहीत धरावा.

रोजचा येणारा खर्च (व्हेरिएबल कॉस्ट)

 • खाद्य व चाऱ्यावरील खर्च (हिरवा चारा व कोरडा चारा या दोन्हींचे समतोल प्रमाण), मजुरांवर येणारा खर्च, घरचे लोक काम करीत असतील तरीही खर्च नोंदवावा.
 • वीज, पाणी इत्यादींवर होणारा खर्च.
 • औषध उपचार, कृत्रिम रेतन व डॉक्टरांच्या गोठा भेटीवर होणारा खर्च.
 • जनावरांचा विमा काढण्याचा खर्च (जनावराच्या किमतीच्या ६ टक्के)
 • ५०० किलो वजन आणि १५ ते २० लिटर दूध देणाऱ्या गायीला ३ टक्के प्रमाणे १५ किलो एकूण ड्राय मॅटरप्रमाणे १५ किलो कोरडा चारा आवश्यक. यामध्ये पशुखाद्य ६.५ किलो, कोरडा चारा ५.५ किलो. हिरवा चारा २० किलो, यातून ४ किलो ड्रायमॅटर मिळेल. 

गोठ्यावर होणारी विक्री आणि मिळणारा नफा 

 • दुधाची होणारी विक्री (प्रति प्रमाणे दुधाला चांगला दर मिळवण्याचा प्रयत्न करावा)
 • सध्या मिळत असलेल्या फॅट व एसएनएफसोबतच दुधामधील जिवाणू (बॅक्टेरिया), टॉक्सिन्स (विषारी पदार्थ), दुधामधील अल्कोहोल (अॅसीडीटी), दुधामधील खनिजे, दूध जास्त काळ टिकण्याची क्षमता, दुधापासून विविध उपपदार्थ बनविण्यासाठी लागणारी गुणवत्ता इत्यादी पातळ्यांवर आपण दुधाची प्रत नियंत्रित करू शकलो तरच येणारा काळ चांगला असणार आहे.
 • पॅकेट दुधासोबतच दुधापासून विविध मिठाई व इतर पदार्थ जसे की, लोणी, दही, श्रीखंड, चीज, पनीर, चॉकलेट, लहान मुलांसाठीचे दुग्धजन्य पदार्थांची मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. परंतू लागणारे दूध हे गुणवत्तेचे हवे. चांगल्या गुणवत्तेच्या दुधाला काही संकलन संस्था अधिक दर देण्यासही तयार असतात, त्यामुळे येणाऱ्या काळात असे गुणवत्तापूर्ण दूध मिळवण्यासाठी दूध उत्पादकांनी आत्तापासून तयारी करायला हवी. कारण कच्च्या दुधापेक्षा दुधाचे पदार्थ करून विकल्यास नक्कीच जास्त नफा कमविता येऊ शकतो.
 • शेणाची विक्री, गोवऱ्या किंवा धूप बनवून जास्त किंमत मिळवता येईल.
 • वासरांची, कालवडी, गाय विक्रीमधूनही चांगला नफा मिळतो. बंगळूर परिसरातील पशुपालक कालवडी सांभाळून गाभण करून विकतात. हा मोठा व्यवसाय झाला आहे.
 • वेबिनार, ऑनलाइन मीटिंगमुळे दूध उत्पादक थेट तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करू शकत आहेत. याचा पुरेपूर फायदा घेऊन तसेच उत्तम गुणवत्ता असलेले दूध उत्पादन आणि मार्केटिंगचे तंत्र अवलंबावे.

संपर्क- डॉ. पराग घोगळे, ९८९२०९९९६९
(लेखक पशुआहार व व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत.)


इतर कृषिपूरक
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज कमतरतेचा परिणाम जनावरांची वाढ तसेच प्रजनन...
सामूहिक प्रयत्नातूनच प्राणिजन्य आजारावर...जगातील सुमारे ७० टक्के आजार हे प्राणिजन्य आहेत,...
जनावरांमध्ये दिसतोय स्नोअरिंग आजारमराठवाड्यातील काही भागांमध्ये (विशेषतः औंढा...
कोंबड्यांतील रोगप्रसार टाळाआजारी कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारी भांडी...
विक्रमी दुग्धोत्पादन देणारी ‘जोगन'गायहरियानातील गालीब खेरी (कर्नाल) येथील पशूपालक...
जनावरांच्या आरोग्याकडे नको दुर्लक्षपावसाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अधिक...
शाश्‍वत दूध उत्पादनासाठी ‘टीएमआर'गायीला शरीर वजन तसेच दूध उत्पादनासाठी आवश्यक...
जातिवंत वंशवृद्धीसाठी भ्रूण प्रत्यारोपण...साधारणपणे जातिवंत दुधाळू गाय एका वर्षात एकाच...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज मिश्रणाच्या अभावामुळे होणारे...
स्वच्छ दूध उत्पादनाची तत्त्वेदूध उत्पादनामध्ये भारताने आघाडी घेतली असली तरी...
संकरित गाईंची दूध उत्पादन वाढीची सूत्रेसद्यःस्थितीतील संकरित गाईंची दुसऱ्या-तिसऱ्या...
रेशीम कीटकांवर होणारा हवामानाचा परिणामरेशीम उत्पादनासाठी आवश्यक खर्चाचे प्रमाण अत्यल्प...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वशेती न करता नैसर्गिक स्थितीमध्ये उगवलेल्या...
दुधाळ जनावरांसाठी सॉर्डेड सीमेन...अलीकडच्या काळात पशुपालनामध्ये सेक्‍स ...
जनावरे, गोठ्याची ठेवा स्वच्छतापावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याला असलेला धोका...
रेबीज’ची लक्षणे तपासा, उपाययोजना करामनुष्यामध्ये रेबीज विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेला...
जनावरांमध्ये होणारा शिंगाचा कर्करोगशिंगाचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील...
गवळाऊ संगोपनाचे पाऊल पडते पुढेविदर्भामध्ये गवळाऊ दुधाळ गाय आणि शेतीकामासाठी...
जनावरांच्या आहारात मूरघासाचा वापरमूरघासामुळे वर्षभर हिरव्या चाऱ्याचा पुरवठा करता...