माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... 

हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होताना पाहायला मिळते. प्रामुख्याने जीर्ण झाडे तोडून रस्त्यापासून बाजूला केली जातात.
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... 
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... 

नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होताना पाहायला मिळते. प्रामुख्याने जीर्ण झाडे तोडून रस्त्यापासून बाजूला केली जातात. मात्र त्यावर पुन्हा वृक्षारोपण किंवा त्यांची पुनर्लागवड करून झाडे जिवंत करण्याचे कुठेही दिसून येत नाही. मात्र एक सकारात्मक उपक्रम पर्यावरण प्रेमींनी राबविला आणि एका आयुष्यभर माया लावणाऱ्या आणि छाया देणाऱ्या महाकाय वटवृक्षाला जीवनदान मिळाले.  नाशिक-नामपूर या राज्य मार्गाचे रुंदीकरण प्रक्रियेत तोडून रस्त्याच्या कडेला महाकाय वटवृक्ष पडला होता. तो पुनर्लागवड हेतूने अगदी अवघड घाट रस्त्याने समुद्रसपाटीपासून तब्बल 4500 फूट उंचावर नेत त्याला पुनर्जीवित करून अनोखा उपक्रम साकारत एक आदर्श घडविला आहे. विशेष म्हणजे कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गडावर लावल्यानंतर तो अल्प कालावधीत पल्लवित देखील झाला.  नांदुरी-सप्तशृंगगड या घाट रस्त्यावर रस्त्याच्या विकासकामात हा वटवृक्ष काढून टाकण्यात आला होता. त्याची पुन्हा लागवड करण्याची कल्पना सप्तश्रृंग निवासिनी देवी संस्थांचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी निसर्गप्रेमी मित्रमंडळ, नांदुरी या समूहाच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यात असलेले कळवण येथील पोलीस कॉन्स्टेबल योगेश गवळी यांना प्रत्यक्ष नेवून कल्पना मांडली. हे वटवृक्ष सप्तशृंगगड या घाट रस्त्याच्या मध्यावर असलेल्या रतनगड (माकडं पॉईंट)या ठिकाणी लावण्याचे ठरले. येथे अनेक माकडांचा वावर असतो, त्यांना निवारा व्हावा, तसेच तेथे सुशोभीकरण व येणाऱ्या जाणाऱ्यांच्या सावलीसाठी 1 जून रोजी त्याची लागवड केली. वटपौर्णिमेला गडावर श्री भगवतीच्या दर्शनार्थी महिला भाविकांची तसेच स्थानिक महिला वर्गाला पूजेची संभाव्य सुविधा विचारात घेता निसर्गप्रेमींनी ही संकल्पना साकारली.  दरेंगाव-नांदुरी या सीमेवर मागील 5 महिन्यापासून कापून पडलेले 80-90 वर्ष जुने महाकाय वृक्षाचे खोड 2 पोकलँड,1 क्रेन,2 जेसीबी,1 कंटेनरच्या साहाय्याने रतनगड(माकडं पॉईंट)येथे आणण्यात आला. अन् नियोजनानुसार त्याचे पुनर्रोपण करण्यात आले. अन् आश्चर्य म्हणजे पुढील 48 तासात त्यास पालवी फुटली सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.  निसर्गप्रेमींनी केलेले इतरांचे प्रबोधन महत्त्वाचे ठरले. यांत्रिकीकरणाच्या साहाय्याने अपेक्षित खर्च हा लाखाच्या घरात असताना समविचारी माणसं जोडून अल्प खर्चात योग्य व सर्वतोपरी सुरक्षित उपयोजना राबवून हा उपक्रम पूर्ण झाला.विकासकामांच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास केला जात असताना असे उपक्रम नवी उमेद व प्रेरणा देवून जातात. 

यांचे लाभली मोलाची मदत:  उपक्रमासाठी एच.पी.एन.इन्फ्रा.लि.मार्फत पोकलँड, दौलत देवरे यांनी क्रेन सुविधा,औतूर यांकडून ट्रेलर सुविधा,सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टमार्फत पाणी टँकर,पिकअप वाहन व आवश्यक मनुष्यबळ व तांत्रिक मदत संदीप बेनके व विवेक बेनके तर ज्ञानेश्वर सदगीर यांकडून जेसीबी उपलब्ध झाले. वैभव पाटील, गिरीश गवळी, शांताराम गवळी यांमार्फत शेणखत उपलब्ध करून दिले.तर विश्वस्त मंडळ,तहसीलदार व स्थानिक ग्रामस्थ यांचेही सहकार्य लाभले. 

या वडाच्या झाडाला आहे ऐतिहासिक संदर्भ:  1955 साली संत गाडगेबाबा यांचे चैत्र यात्रेदरम्यान या वृक्षाखाली कीर्तन करून जनमाणसांचे प्रबोधन केल्याचे आठवणीतील काही संदर्भ वयोवृद्ध स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com