उन्हाळ्यातील जनावरांच्या प्रजनन समस्या

provide the balanced diet to Animals for maintaining their reproductive system
provide the balanced diet to Animals for maintaining their reproductive system

उन्हाळ्यात जनावरे चारा कमी व पाणी जास्त पितात. त्यामुळे रवंथ क्रिया कमी होऊन अपचन होऊन आम्लाचे प्रमाण वाढते. तसेच घामावाटे सोडियम व पोटॅशियम यांसारख्या क्षारांचे प्रमाण कमी होते. परिणामी जनावर गाभण न राहणे, गर्भपात होणे यांसारखे प्रश्‍न निर्माण होतात. यासाठी उन्हाळ्यामध्ये जनावरांना योग्य निवारा, पोषण आणि शुद्ध पाणी देणे महत्त्वाचे आहे. जनावरांची प्रजनन क्षमता पशुपालकांच्या आर्थिक उत्पादनाचा मुख्य आधार असते. प्रजननासंबंधित निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे वेतामधील अंतर वाढते. एका वर्षात एका जनावरापासून ८ ते ९ महिन्यांपर्यंत दूध आणि एक निरोगी वासरू मिळत राहावे, यासाठी त्यांच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे असते. वाढत्या उन्हामुळे जनावरांमधील गाभण राहण्याचे प्रमाण कमी होत जाते. साधारणतः जनावर व्यायल्यानंतर ९० ते १२० दिवसांत पुन्हा गाभण राहायला हवे. मात्र जनावर गाभण न राहिल्यास तीनपेक्षा अधिक वेळा २० ते २२ दिवसांच्या अंतराने पुन्हा माजाची लक्षणे दाखवते. परंतु, प्रत्येक वेळी वळू किंवा कृत्रिम रेतन करूनदेखील गाभण राहत नाही, अशा जनावरास पुनःगर्भाधान करण्याची आवश्‍यकता असते. हा प्रकार उन्हाळ्याच्या सुरवातीपासून ते संपेपर्यंत राहतो. ही जनावरे कोणतीही स्पष्ट किंवा विशेष लक्षणे दाखवत नाहीत. अशी जनावरे २० ते २२ दिवसांच्या अंतराने पुन्हा माजावर येतात, पण रेतन करूनदेखील गाभण राहत नाहीत. याव्यतिरिक्त इतर कोणतेही लक्षण दिसून येत नाहीत. अशा जनावरांचे योग्य प्रजनन व्यवस्थापन केल्यास या काळातदेखील त्यांचे गाभण राहण्याचे प्रमाण वाढते. गाभण न राहण्याची कारणे

  • जनावरांच्या गर्भाशयाचे मुख माजाच्या काळात व विल्यानंतर उघडे असते. या काळात जनावरांचा गोठा घाण असेल तर जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो. हा जंतूसंसर्ग घाणीतून योनीमार्गाने गर्भाशयात जाऊन गर्भाशयाचा दाह होतो. योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे जननेंद्रियांमध्ये जिवाणू संक्रमण होते. (उदा. ब्रुसेला, ट्राईकोमोनास, लिस्टीरिया, कॅम्पिलोबॅक्टर) यामुळे जनावरांमध्ये गर्भ राहत नाही.  
  • योग्य व संतुलित आहार न मिळाल्याने खनिजे व जीवनसत्त्वांच्या व काही विशिष्ट संप्रेरकाच्या कमतरता निर्माण होतात. त्यामुळे गर्भाशय व योनीमार्गाची अपूर्ण वाढ होते व गाभण राहण्यात अडचण येते.  
  • अंडाशय वा अंडकोशाची झालेली अपूर्ण वाढ, नराच्या वीर्यातील शुक्राणूंची कमतरता, मादीमध्ये गर्भाशयाचा दाह व जनावरांमध्ये गर्भाशयासंबंधी असलेली आनुवंशिकता.  
  • वाढत्या तापमानामुळे जनावरांची भूक मंदावते. उन्हाळ्यात उपलब्ध होणारा चारा कमी पौष्टिक आणि प्रथिनयुक्त असतो. याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होतो. प्रथिनांच्या कमतरतेमुळे जनावरांची वाढ मंदावते, उत्पादन व प्रजनन क्षमता कमी होते.
  • उपाययोजना

  • जनावरांना योग्य मात्रेत खनिजद्रव्ये दिल्यास उलटण्याचे प्रमाण कमी होऊन प्रजनन संस्थेचे आरोग्य टिकून राहते. त्यासाठी दुधाळ जनावरांच्या आहारात दररोज ५० ग्रॅम खनिज मिश्रणांचा समावेश करावा.  
  • उष्णतेमुळे किंवा उन्हाळ्यात म्हशींमध्ये माजाची सौम्य लक्षणे दिसून येतात. या काळात योग्य वेळी म्हशींचा माज ओळखून रेतन न केल्यास वारंवार उलटण्याच्या समस्या उद्भवतात. सकाळी लवकर जनावरांचे निरीक्षण करून माजाची लक्षणे ओळखून रेतन करावे.  
  • जनावर भरवले नाही तर गायी, म्हशी वारंवार उलटण्याची समस्या उद्भवत राहते. सकाळी जनावरांचे बारकाईने निरीक्षण करून माजाची लक्षणे ओळखून किंवा खच्चीकरण केलेला वळू जनावरामागे फिरवून माजावरील जनावरे ओळखून जनावरांना योग्य वेळी फळवता येईल.  
  • उन्हाळ्यात जनावरे चारा कमी व पाणी जास्त पितात. त्यामुळे रवंथ क्रिया कमी होऊन अपचन होऊन आम्लाचे प्रमाण वाढते. तसेच घामावाटे सोडिअम व पोटॅशिअम यासारख्या क्षारांचे प्रमाण कमी होते. परिणामी जनावर गाभण न राहणे, गर्भपात होणे यासारखे प्रश्‍न निर्माण होतात. यासाठी उन्हाळ्यामध्ये जनावरांना योग्य निवारा, पोषण आणि शुद्ध पाणी देणे महत्त्वाचे आहे.  
  • प्रजनन व गाभण काळाच्या दृष्टीने जनावरांना संतुलित आहार दिल्यास गाभण राहण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते. यासाठी जनावरांना वर्षभर हिरवा व सुका चारा खाऊ घालावा. विशेषतः प्रथिनयुक्त खुराक किंवा चारा द्यावा. रेतन सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर करावे. यामुळे गर्भधारणेचे प्रमाण वाढून जनावरे उन्हाळ्यातही गाभण राहतात.  
  • जनावरांच्या प्रजनन संस्थेचे आरोग्य राखण्यासाठी दरवर्षी सांसर्गिक गर्भपाताची चाचणी करून घ्यावी.  
  • विलेल्या जनावराचा वार अडकल्यास स्वतः काढण्याचा प्रयत्न करू नये. तांत्रिक ज्ञान नसलेल्या व्यक्तीकडून वार काढल्यास गर्भाशयास इजा होण्याची शक्यता असते.  
  • गर्भाशयाचे गंभीर आजार झालेल्या जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे करावे. गर्भपात झालेले गर्भ आणि वार गोठ्यापासून लांब पुरून टाकावेत.  
  • कृत्रिम रेतन करावे. योग्य ते उपचार पशुवैद्यकामार्फत करणे फायदेशीर आहे.
  • संपर्क - डॉ. गोपाल मंजूळकर, ९८२२२३१९२३ (पशुविज्ञान विभाग, कृषी विज्ञान केंद्र, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com