क्षारप्रतिकारक ऊस वाणावर होणार संशोधन

बीआरसी आणि व्हीएसआय दरम्यान ऊसाबाबत करार
बीआरसी आणि व्हीएसआय दरम्यान ऊसाबाबत करार

पुणे  : भाभा अणुशक्ती केंद्र (बीआरसी) आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय, पुणे) या दोन संस्थांमध्ये तंत्रज्ञानविषयक सामंजस्य करार नुकताच मुंबई येथे झाला. त्या अंतर्गत क्षारप्रतिकारक उसाचे वाण विकसित करणे व उसाची वाढ आणि उत्पादन वाढवण्यासाठी विकीरण केलेले कायटोसॅन या तंत्रज्ञानांचा समावेश आहे. 

भाभा अणुशक्ती केंद्राने अर्थात ‘बीएआरसी’ने अणू कृषी क्षेत्रात आतापर्यंत म्युटेशन तंत्राचा वापर करून विविध पिकांच्या ४० जाती विकसित केल्या आहेत. देशाच्या विविध भागांत व्यावसायिक लागवडीसाठी या जातींचा प्रसार करण्यात आला आहे. हेच म्युटेशन तंत्र वापरून उसाचे क्षारप्रतिकारक क्लोन तयार करण्यातही ‘बीआरसी’ला यश आले आहे. त्याचाच आधार घेऊन या उसाच्या विविध ठिकाणी चाचण्या व त्याद्वारे उसाची जात विकसित करण्याच्या कामात ‘व्हीएसआय’ ही संस्था ‘बीआरसी’ संस्थेला मदत करणार आहे.  

विकीरण केलेले कायटोसॅन तंत्र गॅमा किरणांची मदत घेऊन विकिरण प्रक्रियेद्वारे कायटोसॅन उत्पादनाचा विकास करण्यासाठीही दोन्ही संस्था एकमेकांसोबत काम करणार आहेत. विकिरणाची ही क्रिया ‘बीआरसी’ संस्थेत होणार आहे.

सध्या ‘व्हीएसआय’ संस्था विकिरण न केलेल्या कायटोसॅनचा वापर करीत आहे. मात्र विकिरण केल्या, त्याची कार्यक्षमता वाढून उसाची वाढ व उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. दुष्काळाच्या काळात पीक तगून राहण्यासही त्याची मदत होणार आहे. कायटोसॅन हे वाढीस चालना देणारे संजीवक आहे. या शिवाय साखर कारखान्यांमधील मळी तसेच जस्त नॅनो कण व स्फुरद विरघळणारे जिवाणू यांच्यापासून दर्जेदार जैवखत तयार करण्यास चालना देण्यात येणार आहे. याद्वारे स्फुरद उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे.

राज्याच्या विविध साखर कारखान्यांवर त्याच्या चाचण्या घेणे असा कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. उतिसंवर्धित रोपे व एकडोळा रोपे यांच्या माध्यमातून ऊस उत्पादकता वाढीसाठी संशोधन व तंत्राचा वापर होईल. तसेच दोन्ही संस्था एकत्र येऊन राज्यासाठी क्षारप्रतिकारक ऊस वाणदेखील तयार करतील, असे ‘व्हीएसआय’चे प्रभारी महासंचालक विकास देशमुख यांनी स्पष्ट केले.

‘बीएआरसी’समवेत करारप्रसंगी केंद्राचे सहसंचालक डॉ. वेणुगोपालन, ‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख, कृषिशास्त्र संचालक विकास देशमुख, संशोधन अधिकारी डॉ. सु. गो. दळवी उपस्थित होते. संशोधन प्रकल्पात मुख्य समन्वयक विकास देशमुख तर सहसमन्वयक म्हणून डॉ. दळवी यांच्यासह डॉ. पी. एन. तवर, भरत पवार, डॉ. ए. ए. निकम, एस. एस. कटके, पी. व्ही. घोटके काम सांभाळणार आहेत.   म्युटेशन केलेल्या पायाभूत बियाण्यांचा होणार पुरवठा ‘बीएआरसी’ आता ‘व्हीएसआय’ला म्युटेशन केलेल्या मूग, उडीद आणि भुईमुगाचे पायाभूत बियाणे पुरविले जाणार आहे.  ऊस शेतीत या पिकांचा आंतरपीक किंवा फेरपालट पीक म्हणून किती उपयोग होतो यावर ‘व्हीएसआय’कडून बीजोत्पादन किंवा त्याचा अभ्यास केला जाणार आहे. भारतीय कृषी संशोधन केंद्राकडून ‘व्हीएसआय’ला यासाठी तसेच अन्य संशोधनासाठी ४० लाखांची मदत मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com