आगामी हंगामासाठी सोयाबीनचे बियाणे राखून ठेवा : नागरे

आगामी हंगामासाठी सोयाबीनचे बियाणे राखून ठेवा : नागरे
आगामी हंगामासाठी सोयाबीनचे बियाणे राखून ठेवा : नागरे

अकोला  : सोयाबीन पिकाखालील पेरणी क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे वाढणाऱ्या क्षेत्रासाठी जास्तीच्या बियाण्याची गरज भासणार आहे. ही परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी मागील दोन हंगामामध्ये प्रमाणित बियाण्यांची पेरणी करून उत्पादित केलेले बियाणे हे पुढील या वर्षीच्या हंगामासाठी व्यवस्थितपणे राखून ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी केले आहे.  श्री. नागरे यांनी म्हटले की, सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक असल्याने राज्यात पेरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाणाचे असल्याने दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यापासून उत्पादित होणारे सोयाबीन हे बियाणे म्हणून शेतकऱ्यांनी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. सोयाबीन बियाण्यांची बाह्यवळण कवच नाजूक व पातळ असल्याने त्याची हाताळणी काळजीपूर्वक करावी. साठवण करण्यापूर्वी बियाणे हे दोन ते तीन दिवस उन्हामध्ये ताडपत्री, सिमेंटच्या खळ्यावर पातळ पसरून चांगले वाळवावे व बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण नऊ ते १२ टक्क्यांपर्यंत आणावे. सोयाबीन बियाणे साठवणूक करण्यासाठी बियाण्याची घरगुती पद्धतीने उगवणशक्ती तपासावी आणि किमान ७० टक्के उगवणीशक्ती असलेले बियाणे योग्य पद्धतीने साठवणूक करावे. स्वच्छ केलेले बियाणे चांगल्या, नवीन पोत्यात साठवून ठेवावे. साठवणुकीसाठी प्लॅस्टिक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवताना पोत्यांची रास सात फुटांपेक्षा जास्त असणार नाही, याची काळजी घ्यावी. बियाणे १०० किलोच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास साठवणूक करताना चार पोत्यांपेक्षा जास्त व ४० किलोच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास आठ पोत्यांपेक्षा जास्त मोठी रास लावू नये. पोत्यांची रास जमिनीपासून १० ते १५ सेंटिमीटर उंचीवर लाकडी फळ्यावर लावावी. पोत्याची रचना उभ्या आडव्या पद्धतीने करावी, आवश्यकतेनुसार बियाणे साठवण केलेल्या खोलीमध्ये कीटकनाशक व बुरशीनाशकाचा वापर करावा. पोती उंचावरून आदळली जाणार नाही याची काळजी घ्यावी. खरीप हंगामामध्ये सोयाबीन उपलब्धतेची व्याप्ती वाढवी व सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी उपरोक्तप्रमाणे काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असेही श्री. नागरे यांनी म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com