सोलापुरात कृषी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर कृषी महोत्सव
सोलापूर कृषी महोत्सव
सोलापूर ः राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने आयोजित कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांसह ग्राहकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेती व तंत्रज्ञानाची सांगड घालणारे नवनवे प्रयोग महोत्सवात पाहायला मिळत आहेत. महिला बचत गटाच्या विविध उत्पादनासह सेंद्रिय शेतीमालाची थेट विक्री हे या महोत्सवातील सर्वाधिक आकर्षण ठरले आहे. 
 
कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या वतीने होम मैदानावर हा महोत्सव भरविण्यात आला आहे. गुरुवारपर्यंत (ता. १५) हा महोत्सव सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय संस्था, शेतकरी गट, शेतकरी कंपन्या, महिला बचत गटांसह शेती क्षेत्रातील विविध खासगी कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. त्याशिवाय वस्त्रोद्योगविषयक स्टॉल्सचाही समावेश आहे. सुमारे ३०० पर्यंत विविध स्टॉल्स याठिकाणी आहेत.
 
त्यामध्ये व्यावसायिक, महिला बचत गट, शेती उपयुक्त साहित्य आणि साधने अशी स्वतंत्र दालनांचा समावेश इथे आहे. गेल्या दोन दिवसांत शेतकऱ्यांची रिघ या महोत्सवाला लागली आहे. जिल्ह्यासह नजीकच्या जिल्ह्यातूनही शेतकरी येथे दाखल होत आहेत. शेतीपंप, पाइप्स, ठिबक संच साहित्य, शेततळ्याचा कागद, मल्चिंग पेपर्स आदी साहित्याच्या स्टॉल्सवर शेतकरी आवर्जून थांबून माहिती आहेत.
 
त्याशिवाय शासनाच्या विविध योजनांची माहिती शासकीय विभागाच्या स्टॉल्सवर मिळत आहे. त्यामध्ये पाणीपुरवठा विभागाच्या विविध विभागांपासून ते बायोगॅसपर्यंतच्या योजनांचा समावेश आहे. कृषी विभागाच्या स्टॉल्सवर शेतकऱ्यांसाठीच्या वैयक्तिक आणि शेतकरी गटाच्या योजनांची माहिती दिली जात आहे. महोत्सवाचे शेवटचे दोन दिवस राहिले आहेत, शेतकऱ्यांनी अधिकाधिक संख्येने येऊन प्रदर्शन पहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार आणि आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे यांनी केले आहे.
 

केक असो किंवा कुकीज्‌, हे तसे विदेशी पदार्थ. भारतीयांना या पदार्थांची ओळख इंग्रजांमार्फतच झाली. मात्र तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीयांनी यामध्ये विविध प्रकारचे संशोधन केले आहे. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे ज्वारीचा केक अन्‌ डाळिंबाचे कुकीज, सोलापूरला महाराष्ट्राचे ज्वारीचे कोठार असे म्हणतात मालदांडी ज्वारीला जीआय मानांकन प्राप्त आहे. ज्वारीपासून भाकरी आणि फक्त हुरडा मिळतो, असाच आपला समज होता.

मात्र सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, विषय विशेषज्ञ सौ. अनिता शेळके यांच्या संकल्पनेतून इथे ज्वारीचा केक बनविण्याची आगळी संकल्पना मांडली आहे. केंद्राच्या या प्रशिक्षणातून एका लघुउद्योजकाने इथे त्याचा स्टॉल ठेवला आहे. त्याशिवाय काही तरुणांनी डाळिंबाच्या ‘रेडी टु सर्व्ह’चा प्रयोग करून त्याचेही ब्रॅण्डिंग केल्याचे दिसते. या स्टॉल्सवरही चांगली गर्दी होते आहे. 

जिल्ह्यातील मळेगावचा जलयुक्त शिवार अभियानात राज्यात पहिला क्रमांक आला आहे. जलयुक्त शिवारच्या कामामुळे या गावाची पूर्वीची परिस्थिती आणि आताची बदललेली परिस्थिती याबाबतचे प्रतिकात्मक सादरीकरण याठिकाणी करण्यात आले आहे. पाणलोट विभागाचे अधिकारी रवींद्र माने यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प इथे साकारण्यात आला आहे. या महोत्सवातील हे एक आकर्षण ठरले आहे. प्रत्येकजण याठिकाणी काही वेळासाठी थांबतो आणि माहिती घेतो, असे चित्र आहे. 
 
कृषी महोत्सवात केवळ स्टॉल्सवरील माहिती शेतकऱ्यांनी घ्यायची नाही, त्यासोबत चर्चासत्रांचाही आस्वाद घ्यायला मिळतो आहे. ऊस, डाळिंब, द्राक्ष यांसारख्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांवर येथे विविध चर्चासत्रे आयोजिण्यात आली आहेत. त्यालाही शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. त्याशिवाय संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानीही ठेवलेली आहे. एकूणच माहिती, मनोरंजनातून शेतीचे ज्ञान वाढण्यिाची संकल्पना हा महोत्सव करून देतो आहे. 

महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू या ठिकाणी आहेत. त्यात शेंगा चटणी, विविध मसाले पदार्थांपासून ते विविध उत्पादनांचा समावेश आहे. महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) अंतर्गत बार्शीच्या सासुरे, मानेगाव येथील वैशाली आवारे आणि जयश्री सोलंकर यांनी शेती पिकासाठी उपयुक्त अशा दशपर्णी अर्क, जीवामृत यांच्या बॉटल तयार करून विक्री सुरू केली आहे.

शेतीतले छोटेछोटे, पण महत्त्वाचे तंत्रज्ञान त्यातून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ‘उमेद’चे गोरक्षनाथ भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली या महिला मशिनवर तेल कशा पद्धतीने काढता येऊ शकते आणि आरोग्यासाठी ते कसे उपयुक्त आहे, यासंबंधीचे प्रात्याक्षिकही इथे दाखवितात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com