पुण्यात ‘महाराष्ट्र बंद’ला प्रतिसाद

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला सोमवारी (ता. ११) पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला.
पुण्यात ‘महाराष्ट्र बंद’ला प्रतिसाद Response to 'Maharashtra Bandh' in Pune
पुण्यात ‘महाराष्ट्र बंद’ला प्रतिसाद Response to 'Maharashtra Bandh' in Pune

पुणे - उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला सोमवारी (ता. ११) पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला. अत्यावश्‍यक सेवा वगळता पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसह, महात्मा फुले मंडई, शहरातील विविध दुकाने बंद ठेवण्यात आली होती. सार्वजनिक वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आल्याने, शहरातील प्रवाशांचे हाल झाले.   पुणे शहरातील बंदमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, कामगार सेनेचे रघुनाथ कुचिक, गजानन थरकुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर अंकुश काकडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी अध्यक्ष आणि महापौर अभय छाजेड, माजी उपमहापौर दीपक मानकर, माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह महाविकास आघाडीचे आणि विविध कामगार संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.  या वेळी राज्यमंत्री कदम यांनी केंद्र सरकारवर टीका केली. कदम म्हणाले,‘‘गेली दीड वर्ष शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष्य करत आहे. आता तर केंद्रीय मंत्र्याच्या मुलाची शेतकऱ्यांना चिरडून मारण्यापर्यंत मजल गेली आहे.  केंद्र सरकार उद्योजक धार्जिणे असून, शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारे सरकार आहे. शेतकरी आंदोलना दरम्यान मोठ्या संख्येने शेतकरी मृत्यूमुखी पडले असताना देखील सरकारच्या संवदेना जाग्या होत नाहीत, त्यामुळे पुढच्या निवडणुकीत सरकार पाडले पाहिजे.’’  साताऱ्यात घोषणाबाजी करीत काढला मोर्चा सातारा : मोदी हटाओ...देश बचाओ..., मोदी सरकारचा धिक्कार असो..., अशी घोषणाबाजी करत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सोमवारी सातारा शहरातून मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध नोंदविला. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद  देत सातारा शहरासह जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी चांगला प्रतीसाद मिळाला, दुकाने बंद ठेवून बंद पाळण्यात आला.  लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने बंदची हाक दिली होती. त्या हाकेस प्रतिसाद देत सातारा, कराड या प्रमुख शहरासह ग्रामीण व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवत बंदला प्रतिसाद दिला. महाविकास आघाडीने सातारा, कऱ्हाड, वाई, दहीवडी आदी शहरातून मोर्चा काढून मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. साताऱ्यातील मोर्चास राजवाड्यापासून सुरुवात झाली. मोर्चात आघाडीचे नेते सहभागी झाले होते. सातारा शहरातून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. सातारा, कऱ्हाड शहरासह जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामीण भागाताही मोर्चा काढत कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. नगरमध्ये ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद नगर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेचा निषेधार्थ सोमवारी (ता. ११) महाविकास आघाडीकडून पुकारलेल्या बंदला नगर शहरासह जिल्हाभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेनेच्या  कार्यकर्त्यांनी निषेध करत घोषणाबाजी केली. व्यवहार, दुकाने मात्र बहूतांश भागात सुरळीत सुरु होती. किसान सभेच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलनात सहभाग नोंदवला.  उत्तर प्रदेशातील लखीमपुर जिल्ह्यात अंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना वाहनाने चिरडले आणि त्यात चार शेतकऱ्यांसह आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनचा निषेध करत महाविकास आघाडीने राज्यात बंद पुकारला होता. नगर जिल्ह्यात या बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. बहुतांश दुकाने, बाजारपेठ सुरू होती. काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी स्वतः दुकाने बंद ठेवली. नगर व जिल्हाभरातील बाजार समित्यातही सुरळीत व्यवहार सुरू होते. नगर, घोडेगावात कांद्याचे लिलाव सुरळीत पार पडले.    नगर शहरात राष्ट्रवादी व काँग्रेस, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळे अंदोलन केले. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली येथील महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर घोषणाबाजी केली तर शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर घोषणाबाजी करत लखीमपूर घटनेचा निषेध केला. संगमनेर, अकोले, नेवासा, पाथर्डी, पारनेर, श्रीरामपुर, राहाता, राहुरी यासह अन्य ठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्या-त्या भागातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत लखीमरपुर जिल्ह्यातील घटनेचा निषेध करत दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com