‘सकाळ’च्या आवाहनाला राज्यभरातून प्रतिसाद

‘सकाळ’च्या आवाहनाला राज्यभरातून प्रतिसाद
‘सकाळ’च्या आवाहनाला राज्यभरातून प्रतिसाद

पुणे : राज्यातील शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी ‘सकाळ’ माध्यम समूहाने कौशल्यविकास, कृषीप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-महिलांच्या उत्थानासाठी समाजातील सेवाभावी व्यक्ती व संस्थांना पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्याला समाजातील सर्वच स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ‘सकाळ’च्या या उपक्रमाशी जोडण्यासाठी अनेक जण पुढे आले आहेत. त्यातील काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे.

संकटाच्या पोटात संधी दडली आहे आज निर्माण झालेल्या प्रश्नाचं मूळ शेतीच्या दुरवस्थेत आहे. आरक्षणामुळे हा प्रश्न शंभर टक्के सुटेल असे नाही. त्यामुळे शेती ज्या कारणांमुळे तोट्यात आली तो गुंता समजून घेऊन त्यावर उपाय शोधणे हीच खरी दिशा असली पाहिजे. आज शेती उत्पादनाच्या बाबतीत आपल्याला काहीच अडचण नाही. उलट अतिरिक्त उत्पादनामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. खरा गुंता आहे तो पिकवलेल्या मालाच्या पुढच्या व्यवस्थेचा. त्यासाठी शेतकऱ्यांची संघटित यंत्रणा उभी करणे यावरच फोकस ठेवला पाहिजे. आजवरच्या अशा स्वरूपाच्या यंत्रणा प्रामुख्याने राजकीय होत्या, पण आता शेतकऱ्यांच्या ताब्यातील आणि व्यावसायिक पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या यंत्रणांची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वप्रथम मानसिकता बदलली पाहिजे. हे काम उभे करण्यासाठी बाहेरून कोणी येण्याची वाट बघण्यापेक्षा किंवा सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा ज्या समाजाला याची झळ बसली आहे, त्या समाजातूनच लोक पुढे आले पाहिजेत. नवीन पिढीने हे आव्हान स्वीकारले पाहिजे. आजची अस्वस्थता आणि संकट भीषण आहे, परंतु प्रत्येक संकटाच्या पोटात संधी दडलेली असते. पूर्ण व्यवस्थेचा पट बदलून नवं काही घडवण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना एकत्र आणणे, समूहशक्ती उभी करणे, मिशन मोडवर काम करण्यासाठी आखणी करणे यासाठी मी आणि सह्याद्री परिवार कायम पुढे असू. - विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.   आत्मविश्वास वाढविण्याची गरज सरकारी नोकऱ्यांची संख्याच तुटपुंजी असल्याने केवळ आरक्षणाने हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे वेगळे मार्ग शोधणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने कौशल्य विकास हा विषय महत्त्वाचाच आहे. तरुणांचा माइंडसेट बदलण्याची आवश्यकता आहे. सध्या ही मुलं दिशाहीन झाली असून त्यांचा आत्मविश्वास खच्ची झाला आहे. शेती हा विषय केंद्रस्थानी ठेवून किफायतशीर शेती, शेतीपूरक व्यवसाय यांचे रोल मॉडेल्स काय आहेत, याची त्यांना जाणीव करून देऊन व्यवस्थित प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी व्यावसायिक व उद्योजकांचे सहकार्य मिळवता येईल. तसेच पदविका, पदवी शिक्षण घेतलेल्या तरुणांना सॉफ्ट स्किल प्रशिक्षणाचा कार्यक्रम आखण्याची गरज आहे. मी व्यक्तिशः या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी योगदान देण्यास इच्छुक आहे. - डॉ. व्यंकट मायंदे, माजी कुलगुरू,  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

प्रभावी कृषी निर्यात धोरण आखावे शेती व्यापारातील धोरणात्मक आव्हाने-अडथळे, जसे निर्यातीवरील निर्बंध, बॉर्डरबंदी, स्वस्त आयात, शेतीविरोधी नियम-अटी आदींबाबतीत 'सकाळ' आणि 'अॅग्रोवन' नेहमी शेतकऱ्यांची बाजू मांडते. यापुढे केवळ बातमी देऊन न थांबता असे प्रश्न सुटण्यासाठी एखादा कृतिगट जर ‘सकाळ’ने स्थापन केला, तर त्यात सहभागी व्हायला नक्कीच आवडेल. वरील आव्हानांचा संबंध थेट शेतीचा पेचप्रसंग आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी आहे. आज भारताची कृषी निर्यात सुमारे ३० अब्ज डॉलर्सच्या आसपास असून, खरे तर ती १०० अब्ज डॉलर्सच्या घरात जायला हवी. उत्पादनवाढ, पुरवठावाढ हीच शेतीची आजची डोकेदुखी आहे. शेजारचा चीन देश १२ अब्ज बिलियन डॉलर्सच्या सोयाबीनची आयात अमेरिका खंडातून करतो. भारत-चीनमधील व्यापारी तूट ६० अब्ज डॉलर्सच्या वर गेली आहे. थोडक्यात, आपल्या शेजारी देशांतच व्यापाऱ्याच्या मोठ्या संधी आहेत. त्या साधण्यासाठीच शेती उत्पादन- उद्योग-व्यापार-निर्यात आदी क्षेत्रांतील लोकांच्या कृतिगट- दबावगटाची आज आवश्यकता आहे. ‘सकाळ''सारख्या माध्यमाकडून ही अपेक्षा आहे.   - दीपक चव्हाण, शेती अभ्यासक, पुणे.

शेतमालाच्या योग्य दरासाठी पुढाकार आवश्यक शेतमालाला भाव, दूध दरप्रश्न आरोग्य सेवा, असे अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्रामध्ये तोंड वासून उभे आहेत. प्रत्येक वेळी सरकार आंदोलन चिंघळेपर्यंत बघ्याची भूमिका घेत आलेय. आंदोलन घडू नये, अशी कुठलीही भूमिका सरकारने गेल्या ४ वर्षांत घेतली नाही. ‘सकाळ’ने अतिशय चांगला उपक्रम हाती घेतला आहे. मी जनतेला एक सामान्य नागरिक म्हणून आवाहन करतो, की त्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपले योगदान द्यावेत. - सुहास गाडेकर, फार्मा उद्योजक, मुंबई

शाश्वत मार्ग काढणे आवश्यक महाराष्ट्राचे आजचे वातावरण बघता शेतकरी खूप अस्वस्थ आहे. शेती योग्य पद्धतीने न केल्याने व शेतीमालची बाजारपेठ योग्य न मिळाल्याने या शेती व्यवसायावर अवलंबून असलेला मोठा वर्ग अस्वस्थ आहे. त्याच्या नाराजीचा फायदा घेऊन राजकारणी लोक वेगवेगळ्या कारणांनी भडकवत आहेत. वास्तविक जर शेती हा व्यवसाय फायद्याचा झाला, तर खूप मोठी नाराजी दूर होऊ शकते. हे करण्यासाठी खेडोपाडी अपुऱ्या असलेल्या पायाभूत सुविधा उदा. रस्ते, वीज, पाणी व इंटरनेट व्यवस्थित झाल्या पाहिजेत. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजवणी होणे खूप गरजेचे आहे. एकत्र येऊन मार्ग काढतानासुद्धा ग्रामीण भागातील शेतीची जाण असलेल्या नेतृत्वाचा नेहमीच अभाव जाणवतो. शासन, शहरवासीय व स्थिरस्थावर झालेला नोकरवर्ग यांनी जाणीवपूर्वक शेतीकडे  केलेले दुर्लक्ष देशवासीयांच्या आरोग्यास घातक ठरणार आहे. म्हणूनच शेवटी एवढच सांगता येईल, की यातून मार्ग काढताना तो आरोग्यदाई शाश्वत असावा, यावर भर दिला पाहिजे. - कृषिभूषण अनिल नारायण पाटील,  सांगे, तालुका वाडा, जिल्हा पालघर.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com