परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कृषी तसेच पशुसंवर्धन
ताज्या घडामोडी
वाढत्या कोरोनामुळे बाजारांवर मर्यादा
संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांची कडक अंमलबजावणी केली जात असतानाच याचा परिणाम बाजार समित्यांच्या व्यवहारांवर होण्याची शक्यता वाढली आहे.
अकोला ः दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये अमरावती विभागात वाढ होत असल्याने प्रशासन खळबळून जागे झाले आहे. संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांची कडक अंमलबजावणी केली जात असतानाच याचा परिणाम बाजार समित्यांच्या व्यवहारांवर होण्याची शक्यता वाढली आहे. या भागातील गुरांचे बाजार बंद ठेवण्यात येत आहेत. काही ठिकाणी फक्त त्या तालुक्यातीलच शेतमाल घेण्याची मुभा दिल्याने ऐन हंगामात शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.
सध्या तूर, हरभऱ्याचा हंगाम जोरात सुरु आहे. प्रत्येक बाजार समितीत हा शेतमाल हजारो क्विंटल येत होता. गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोरोना संसर्ग वाढल्याने उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गर्दी होणारे आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहेत. सोबतच बाजार समित्यांमध्येही व्यवहारांवर निर्बंध करण्यात आले.
अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याने या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांची सुरक्षितता पाहता परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले आहे.
बुलडाण्यातील सर्वांत मोठी बाजार समिती असलेल्या खामगाव बाजारात आता केवळ त्या तालुक्यातील शेतकऱ्यांचाच शेतमाल खरेदी केला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या बाजार समितीत जिल्हाभरातून शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी येत असतो. परंतु या नव्या नियमामुळे आता याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. बाजार समित्यांतील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे याला प्राधान्य दिले जात आहे.
आठवडाबाजार, गुरांचे बाजार पुन्हा बंदच्या चक्रात
कोरोना रुग्ण वाढीचा फटका गावोगावी असलेल्या आठवडी बाजारांना प्रामुख्याने बसला आहे. याशिवाय बाजार समित्यांच्या अखत्यारीत असलेले गुरांचे बाजार बंद ठेवण्याचे निर्देश दिल्याने या बाजारांमधील उलाढाल पुन्हा एकदा ठप्प पडू लागली. गेल्या काही दिवसांत गुरांचे बाजार सुरळीत सुरु झाल्याने जनावरांची खरेदी-विक्री व्यवस्थित होऊ लागली असतानाच आता पुन्हा एकदा ती बंद झाली आहे.
प्रतिक्रिया
कोरोना रुग्णांचा प्रसार वाढत असल्याने काही ठिकाणी साखळी तोडण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. काही काळासाठी व्यवहार कदाचित बंद ठेवून नंतर पुर्ववत केले जातील. बाजार समिती बंद ठेवण्याबाबत मात्र कुठलेही निर्देश नाहीत. याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत घेतला जाऊ शकतो.
- विनायक कहाळेकर, जिल्हा उपनिबंधक, अकोला
जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानंतर बाजारातील आवक थोडी कमी झाली आहे. आम्ही व्यवहार सुरु ठेवलेले असून कोरोनाच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना, काळजी घेत शेतकऱ्यांना सुविधा दिल्या जात आहेत.
- सुनील मालोकार, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला
- 1 of 1064
- ››