शेतीमधील प्रत्येक गोष्टीचा पुनर्वापर करा ः विद्या रुद्राक्ष

Reuse everything in agriculture: Vidya Rudraksh
Reuse everything in agriculture: Vidya Rudraksh

अंबाजोगाई, जि. बीड : प्रत्येक महिलेने आपल्या शेतीचा सर्व प्रकारचा खर्च लिहून ठेवला पाहिजे. त्यामुळे आपल्या शेतीचा खर्च कमी करण्यास मदत होईल. शेतीमध्ये तयार झालेल्या प्रत्येक गोष्टीचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत जिजामाता कृषिभूषण पुरस्कारप्राप्त महिला शेतकरी विद्या रुद्राक्ष यांनी व्यक्त केले.

दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम रविवारी (ता. ८) साजरा करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. सौरभ शर्मा, डॉ. स्वाती अर्धापूरकर व पुरस्कारप्राप्त महिला शेतकरी विद्या रुद्राक्ष यांची मंचावर उपस्थिती होती. राष्ट्रऋषि नानाजी देशमुख व पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून व दीपप्रज्वलन करून जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. प्रास्ताविक रोहिणी भराड यांनी केले. 

नागापूर तालुका परळी येथील प्रक्रिया उद्योजक महिला शेतकरी अपर्णा एस्के यांच्या बाजरी खारवडी बॉक्स पॅकेजिंगचे मान्यवरांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी प्रक्रिया उद्योगात यशस्वी महिला शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महिलांची पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये महिलांनी विविध पौष्टिक पाककृतींचे प्रदर्शन केले.

पाककला स्पर्धेत सहभागी महिलांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. डिघोळअंबा तालुका अंबाजोगाई येथील महिला बचत गटाला कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून डाळ मिल हस्तांतरण करण्यात आले. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून निर्मित वेस्ट डी-कंपोजर कल्चरचे सर्व महिलांना वितरण करण्यात आले. कृषी उत्पादन प्रक्रिया उत्पादनांचे प्रदर्शन या वेळी आयोजित करण्यात आले होते.

डॉ. अर्धापूरकर म्हणाल्या, ‘‘महिलांच्या आयुष्यातील पौगंडावस्था, मातृवस्था व रजोनिवृत्ती अवस्था या महत्त्वाच्या अवस्था असून याकाळात महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक आईने स्वतःच्या मुलीसाठी लोहयुक्त व प्रथिने युक्त पदार्थांचा समावेश आहारात करावा.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा कर्डिले व रोहिणी भरड यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com