केंद्रीय पथकाकडून कांदास्थितीचा आढावा समाप्त

कांदा
कांदा

नाशिक : कांदा दरस्थिती, मागणी आणि पुरवठा व नवीन खरीप कांदा लागवडीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने नाशिक व नगर जिल्ह्यांत विविध ठिकाणी भेटी देत माहिती जाणून घेतली. यामध्ये केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्य जाहीर करून व कांदा आयातीचा निर्णय घेतल्यानंतर किती परिणाम झाला याचा आढावा पथकाने घेतला.  नाशिक व नगर जिल्ह्यात केंद्रीय पथकाने बाजार समित्या, व्यापारी व कांदा उत्पादक यांच्या भेटी घेतल्या. शुक्रवार (ता.२०) ते सोमवार (ता.२३) पर्यंत एकूण चार दिवसांचा आढावा दौरा झाला.  या दौऱ्यात प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, मालेगाव, चांदवड, उमराणे, सटाणा, तर नगर जिल्ह्यातील राहाता, राहुरी व संगमनेर बाजार समितीमध्ये भेटी दिल्या. 

बाजारसमिती प्रशासन, पदाधिकारी व व्यापारी यांना भेटून कांद्याची होणारी आवक, दरवाढ व कांद्याचा पुरवठा याबद्दल माहिती जाणून घेतली. यासह नाफेडच्या विभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चौकशी केली. यानंतर नाशिक जिल्ह्यातील वडाळीभोई (चांदवड), उमराणे (देवळा), टेहरे (मालेगांव), दाभाडी (मालेगांव), लखमापूर (बागलाण) या ठिकाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कांद्याची साठवणूक, उपलब्धता व नवीन खरीप कांद्याची लागवड याबाबत शेतकऱ्यांकडून सविस्तर जाऊन माहिती घेतली. 

आढावा दौऱ्यात पथकाने केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय, ग्राहक व्यवहार विभागाचे संचालक अभय कुमार, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहाय्यक संचालक पंकज कुमार, एमआईडीएच चे मुख्य सल्लागार आर. पी. गुप्ता, राज्य पणन महामंडळाचे प्रभारी उपसरव्यवस्थापक बहाद्दूर देशमुख, जिल्हा पणन अधिकारी श्री. जगताप, निफाड उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, मालेगांव उपविभागीय अधिकारी दिलीप देवरे हे होते. 

सोमवारी (ता.२३) केंद्रीय पथकाची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यात चार दिवसांच्या दौऱ्यात कांद्याची उपलब्धता व नवीन लागवड स्थिती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिक व नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे अवघा २० टक्के उन्हाळ कांदा शिल्लक आहे. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांनी कांदा साठवला आहे. अशा शेतकऱ्यांनी बाजारात टप्प्याटप्प्याने विक्री सुरू ठेवल्याचे या शिष्टमंडळाच्या पाहणी दरम्यान दिसून आले आहे. आढावा दौऱ्यातील सर्व नोंदीच्या व पहाणीच्या आधारे अहवाल केंद्राकडे सादर करण्यात येणार असल्याचे पथकाकडून सांगण्यात आले. देशभरातील कांद्याच्या मागणीनुसार पुरवठा व्हावा व ग्राहकांना तो रास्त भावाने मिळावा, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

दौऱ्यातील प्रमुख घडामोडी

  •   लासलगाव बाजार समितीत उच्चांकी दराबाबत चर्चा
  •   नाशिक व नगर जिल्ह्यांतील प्रमुख बाजार समित्यांना भेटी
  •   खरेदीच्या पद्धती व कांदा पुरवठा याबद्दल विचारणा
  •   थेट शेतकऱ्यांना भेटून साठवणूक व विक्री यांची घेतली माहिती
  •   नवीन कांदा लागवडीची स्थिती व काढणी कधी सुरू होईल याचा आढावा
  •   नाफेडच्या कार्यालयाकडे विचारपूस
  •   आढावा दौऱ्याबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com