खरिपातील पावसाचे प्रमाण, पीक स्थितीचा आढावा

हवामान बदलही एक दीर्घकालीन प्रक्रिया असून सामान्यांनात्याचा फारसा त्रास होणार नाही, असा एक समज होतो. मात्र, हवामान बदलाचे दृश्य परिणाम मोसमी पाऊस आणि हंगामावरही होत असल्याचे अनुभवास येत आहे.
Diagram 1
Diagram 1

हवामान बदलाविषयी माहिती घेत असताना ती एक दीर्घकालीन प्रक्रिया असल्याने सामान्यांना त्याचा फारसा त्रास होणार नाही, असा एक समज होतो. मात्र, हवामान बदलाचे दृश्य परिणाम मोसमी पाऊस आणि हंगामावरही होत असल्याचे अनुभवास येत आहे. त्याकडे लक्षपूर्वक पाहून शेतकरी आणि धोरणकर्त्यांनी व्यवस्थापन आणि नियोजन केले पाहिजे. महाराष्ट्रात या वर्षी मान्सून सर्वत्र वेळेवर पोहोचला. खरीप हंगामही वेळेवर सुरू होऊन, खरिपातील पिकांची उगवण होऊन ते वाढीस लागले. मात्र, जून महिन्यामध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार, जुलै महिन्यात पाऊस सरासरीहून अधिक पडला. जून ते ऑगस्ट महिन्यातील मोसमी पावसाच्या प्रमाणाचा देश पातळीवर विचार केल्यास, काही ठिकाणी दुष्काळी स्थिती, तर काही ठिकाणी अति पाऊस किंवा सरासरीइतका पाऊस अशी स्थिती अनुभवास आली. उदा. जम्मू-काश्मीर, लडाख या भागात ३८ टक्के कमी पाऊस झाला, तर सौराष्ट्र आणि कच्छ; रायलसीमा (कर्नाटक) अशा काही ठिकाणी सरासरीहून अतिशय अधिक (म्हणजेच ओला दुष्काळ) अशी स्थिती राहिली. यात महाराष्ट्राचाही समावेश येतो. महाराष्ट्रामध्ये जून ते ऑगस्ट महिन्यातील एकूण पाऊस पुढील प्रमाणे अनुभवास आला.

  • विदर्भामध्ये एकंदरीत सरासरीहून आठ टक्के कमी पाऊस झाला आहे. याला अपवाद अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मात्र जवळपास २५ टक्के पाऊस आजपर्यंत कमी झालेला आहे.
  • कोकणामध्ये सरासरीहून २५ टक्के अधिक पाऊस झाला.
  • मध्य महाराष्ट्रामध्ये ३१ टक्के अधिक पाऊस झाला.
  • मराठवाड्यामध्ये २८ टक्के अधिक पाऊस झाला.
  • खरीप हंगामामध्ये जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काही ठिकाणी संततधार पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कृष्णा आणि कोयनेच्या खोऱ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. मुंबईलगत कोकणातही अशीच स्थिती निर्माण झाली. मात्र, शेतीसाठी पावसाची मासिक अथवा हंगामी गोळाबेरीज कामास येत नाही. त्याकरिता पावसाचे साप्ताहिक योग्य वितरण हेच उपयोगी ठरते. त्यामुळे या काळातील पावसाच्या वितरणाचा विचार करू.

  • जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात कोकणात जेमतेम सरासरीइतका (५ टक्के अधिक), विदर्भात मात्र दुष्काळी स्थिती (३७% कमी) आणि मराठवाड्यात मुसळधार (५७ टक्के अधिक), तर मध्य महाराष्ट्रात सरासरीइतका (१९ टक्के अधिक) पाऊस झाला.
  • जुलैच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात मात्र दुष्काळी परिस्थिती होती. (५७ टक्के कमी पाऊस). मात्र याच काळात विदर्भात सरासरीइतका किंवा त्याहून थोडासा अधिक (१६ टक्के पाऊस) होता. मराठवाड्यात मात्र याचवेळी अति पाऊस (२७ टक्के अधिक) अशी स्थिती होती. मध्य महाराष्ट्रात सरासरी इतका (९ टक्के अधिक) पाऊस होता.
  • ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कोकणात मुसळधार (४९ टक्के अधिक) पाऊस पडला. विदर्भात मात्र दुष्काळ अनुभवास आला. (४० टक्के कमी). मराठवाड्यात मात्र सरासरीहून १७ टक्के अधिक पाऊस अनुभवास आला. मध्य महाराष्ट्रातही सरासरीहून अधिक १३ टक्के पाऊस पडला.
  • ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसला. (६३ टक्के अधिक) आणि ४१ टक्के अधिक); तर मराठवाड्यात मात्र पावसामध्ये तूट पडली. (२८ टक्के कमी). आणि विदर्भात सरासरीत इतका जेमतेम पाऊस पडला. (५ टक्के अधिक).
  • असमान पर्जन्य वितरणाचे खरीप हंगामावर झालेले परिणाम  या वर्षीच्या खरीप हंगामातील या पर्जन्य स्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली. आधीच ते कोरोना महामारीमुळे त्रस्त झालेला होता. त्यात सोयाबीन पुनर्पेरणीचे संकट माथ्यावर येऊन बसले.

  • अस्मानी संकटामुळे उडीद, मुगाचे, तीळ, कारळा आदी पिकांचे ५० ते ७० टक्के नुकसान झाले आहे.
  • सोयाबीनला फुले लागण्याच्या अवस्थेत पाऊस आणि त्याच्या जोडीला ढगाळ वातावरण अनुभवास आले. यामुळे सोयाबीनची वाढीची अवस्था म्हणजेच शाकीय अवस्था संपून फुले लागणे, शेंगा लागणे किंवा दाणे भरणे अशा अवस्थेला सुरुवात होण्यात अडचणी आल्या. यावर्षी अनेक ठिकाणी सोयाबीन पिकातील शाकीय वाढीचा काळ लांबल्याने शेंगा लागण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. परिणामी उत्पादकता २५ ते ३० टक्के कमी होऊ शकते. तसेच पुढील काळातील पावसाचा अंदाज पाहता, सप्टेंबरमध्ये दुसऱ्या आठवड्यापासून शेवटपर्यंत पुन्हा अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच सोयाबीन काढणीच्या वेळी पाऊस लागून त्याचे नुकसान आणखी वाढू शकते. याचा अर्थ असा की या वर्षीही सोयाबीन उत्पादन धोक्यात येऊ शकते. मागील वर्षाप्रमाणेच पुढील वर्षीही सोयाबीनच्या बियाणाची उपलब्धता होण्यात अडचणी येण्याची शक्यता अधिक वाटत आहे.
  • कापूस पिकाला ही या पावसाचा फटका बसला आहे. हलक्‍या जमिनीतील कापूस मर रोगाने किंवा मूळकूज या विकृतीने वाया गेला आहे. कापसाची शाकीय वाढ अधिक झाली आहे. पुढील पावसाचा अंदाज पाहता, कापसाला बोंडे कमी लागणार, परिपक्व उमललेली बोंडे पावसाच्या पाण्यामुळे खराब होण्याची शक्यता असून, उत्पादनात घट होऊ शकते.
  • ढगाळ वातावरण, जमिनीतील अधिक ओलावा, नदीकाठच्या शेतांमध्ये पुरामुळे साचलेला गाळ, पाणी ही स्थिती ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अनुभवास येत आहे. सप्टेंबरमधील पहिल्या आठवड्यातही तशीच राहण्याची शक्यता आहे. हीच हवामान स्थिती ऑक्टोबरमध्ये अनुभवास येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात मध्ये मध्ये कडक सूर्यप्रकाशाची भर पडून जमिनीचा बाष्पीभवनाचा दर आणि वनस्पतीचा बाष्पोत्सर्जनाचा दर वाढेल. तापमानात वाढ होईल. वाऱ्याचा वेग मंदावेल. परिणामी पिकांमधील सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण वाढेल. या सर्व हवामान स्थितीचा परिणाम म्हणून अळी वर्गीय आणि रस शोषक किडींना पोषक वातावरण तयार तयार होईल. ( आकृती-१).
  • खरीप पिकाचे नुकसानीबरोबरच भाजीपाला, फळबागा व उसासारख्या वार्षिक पिकांमध्येही शंखी गोगलगाय, पाने कुरतडणाऱ्या अळ्या यांचा प्रादुर्भाव आणि नाकतोडे या सारख्या नुकसानकारक किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
  • या सर्व घटकांचा साकल्याने विचार करून धोरणकर्ते आणि शेतकऱ्यांनी नियोजन आणि व्यवस्थापनाला प्राधान्य दिले पाहिजे.
  • डॉ. प्रल्हाद जायभाये, ७९८०६८४१८९ (कृषी हवामानशास्त्रज्ञ आणि प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, जालना अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com