हातचं सारं गेलं, आता जगावं कसं?

दिवाळी गोड होईल, असं वाटत असताना परतीच्या पावसानं हातच सार गेलं, पीकविमा काढला आहे, मात्र कुणीही लक्ष देईना. आता तुम्हीच सांगा, आम्ही कसं करावं अन कसं जगावं.
rice crop damage
rice crop damage

नाशिक : यंदा वेळेवर पाऊस नसल्याने भाताची रोपे तयार होऊनही लागवडी उशिरा झाल्या. मजुरांची टंचाई असताना पोटाला चिमटा घेत ३०० रुपये रोज देऊन लागवडी केल्या. त्यात पावसाने दडी मारली, रोग-किडींचा प्रादुर्भाव तर विचारूच नका, थोडं फार हाती येऊन दिवाळी गोड होईल, असं वाटत असताना परतीच्या पावसानं हातच सार गेलं, पीकविमा काढला आहे, मात्र कुणीही लक्ष देईना. आता तुम्हीच सांगा, आम्ही कसं करावं अन कसं जगावं, असे सांगत बारी शिंगवे (ता. इगतपुरी) येथील सुरेखा विठ्ठल लहामगे यांच्या भावनांचा बांध फुटला. जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणासह अनेक भागांत परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोंगणीसाठी आलेली उभी भात पिके आडवी झाली, तर कापणी केलेली पिके पाण्याखाली गेली. नुकसानाची पातळी इतकी भयंकर ही पाहताच मन हेलावून जातं. पाण्यावर तरंगणाऱ्या भाताच्या लोंब्या जणू स्वप्नच पाण्यावर तरंगत असल्याची वेदनादायी वास्तव मांडत होत्या. इगतपुरी व पेठ तालुक्यात भात लागवडीखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. पाऊस वेळेवर नसल्याने वाढीच्या अवस्थेत पिकाला ताण बसला. त्यात मोठ्या प्रमाणावर बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांसह तपकिरी तुडतुडे यांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन घटण्याची स्थिती होतीच. हाती जास्त नाही, पण थोडं फार येईल, अशी अपेक्षा असताना सुरुवातीला पाऊसच नव्हता. मात्र सोंगणी अवस्थेत जोरदार पाऊस झाल्याने सर्व पीक नेस्तनाबूत झाले. त्यामुळे परतीच्या पावसाने हातच सार काही हिरावून नेल्याची भावना शेतकऱ्यांनी बोलावून दाखवली.वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने इगतपुरी व पेठ तालुक्याच्या अनेक भागांमध्ये भात पिके  सोंगणीसाठी असताना खराब झाली आहेत. हे नुकसान ८० टक्क्यापर्यंत आहे. यासह डोंगर उताराला असलेली वरई, नागलीसह सोयाबीन व भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले. भात खाण्यालायक राहिला नाही तर त्याला कोण घेईल? असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे आहे. शासनाने १०० टक्के पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनी केली.  विमा भरताना विमा प्रतिनिधी निकष सांगत नाही, खोटी आश्वासने देऊन विमे भरून घेतात, असे बारी शिंगवेचे उपसरपंच पोपट लहामगे यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणा अद्याप पोचलीच नाही इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची पंचनामे करण्याची मागणी आहे. त्यासाठी कृषी सहाय्यक, तलाठी यांच्याकडे वारंवार संपर्क करत असताना लेखी आदेश नसल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. इगतपुरी तालुक्याचे विभाजन दोन विधानसभा मतदार संघात आहे. त्यामुळे पश्चिम भागात पालकमंत्री, आमदार यांनी भेटी दिल्या, मात्र पूर्व भागात लोकप्रतिनिधी फिरकलेच नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

या मंडळामध्ये नुकसान अधिक इगतपुरी: घोटी, टाकेद, वाडी वऱ्हे, धारगाव, इगतपुरी, नांदगाव पेठ: करंजाळी, कोहोर, पेठ,    जोगमोडी त्र्यंबकेश्वर: हरसूल

प्रतिक्रिया कष्टाने भात शेती पिकवली, पण अस्मानी अन् सुलतानी संकटांनी त्रस्त झालो आहोत. जुलै महिन्यात पैसे नसताना उसनवारी करून पीक विमा घेतला. मात्र आज विमा कंपनीला संपर्क साधला तर संपर्क होत नाही. उभं पीक नाहीस होत असताना कुणीही लक्ष देत नाही.  - शंकर चोथवे,  शेतकरी, बारी शिंगवे, ता. इगतपुरी

ऐन भात कापणीला आला अन् पावसामुळे आडवा झाला. हाताशी  थोडफार पीक येईल. मात्र नुकसान वाढल्याने वर्ष कसं काढायचं? हाती १० ते १५ पोते उत्पादन येत, पण यंदा एक पोतही भात उत्पादन हाती येणार नाही. - मुक्ताबाई भगवंता बेंडकोळी, महिला शेतकरी, अडसरे खुर्द,  ता. इगतपुरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com