रत्नागिरी जिल्ह्यात भात पिकाचे ३० टक्के नुकसान

भात पिक नुकसान
भात पिक नुकसान

रत्नागिरी ः क्यार वादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर प्रशासनाकडून नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करण्यासाठी सुरवात झाली आहे. जिल्ह्यात सुमारे तीस टक्क्यांहून अधिक भातशेतीला फटका बसल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम रत्नागिरी, राजापूर, मंडणगड तालुक्यांत सुरू झाले आहे. संगमेश्‍वरमध्ये काही गावांमध्ये अद्यापही संबंधितांनी संपर्क साधलेला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये क्यार वादळामुळे जिल्ह्यात सलग आठ दिवस मुसळधार पाऊस सुरू होता. ऐन भात कापणीच्या हंगामातच पावसाचे आगमन झाल्याने बळिराजा धास्तावला होता. काहींनी पावसाची विश्रांती मिळाल्यानंतर लगेचच कापणीला सुरवात केली. मात्र ज्यांनी भात कापले, ते पावसात सापडले. कापलेले भात मळ्यांमध्ये पावसाच्या साचलेल्या पाण्यात तरंगत होते. निमगरव्या प्रकारची शेती या तडाख्यात पोळली गेली. मुसळधार पावसामुळे तयार झालेले भात आडवे झाले. लोंबीचे दाणे जमिनीवर पडून ते पुन्हा रुजून येऊ लागले आहेत. कोकण पट्ट्यात अशी परिस्थिती प्रथमच उद्भवल्याचे शेतकरी सांगत आहेत. निवडणूक आटोपल्यानंतर तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक तसेच कृषी सहायकांनी संयुक्त पाहणी करून नुकसान झालेल्या भातशेती व इतर शेतीचे सातबारा तलाठ्यांनी तत्काळ उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच दिले आहेत. त्यानुसार नुकसान झालेल्या भागात संयुक्त पाहणी सुरू झाली आहे. २ नोव्हेंबरपूर्वी ती माहिती सादर करण्याचे निर्देश दिल्याने ऐन दिवाळीत काही तालुक्यांमध्ये महसूल, कृषी विभाग कार्यरत झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी आडवे झालेले भात कापून ते सुरक्षित ठिकाणी नेले आहे. रुजून आलेल्या भाताचा पंचनामा करता येईल, मात्र जे भात आडवे झालेले होते त्याचे काय, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. सामान्य शेतकरी वाढीव उत्पादन मिळवण्यापेक्षा हाती येईल, त्याला महत्त्व देतो. निर्माण झालेली परिस्थिती पाहता त्यावर प्रशासन कोणता निर्णय घेणार याबाबत बळिराजा आशेने बघणार आहे. ओले झालेले भात सुकवून ते झोडले तरीही आतील तांदळाच्या एकतर कण्या होतील; अन्यथा ते काजळी पडल्यासारखे काळे दिसतील, अशी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे. रत्नागिरी तालुक्यात पंचनामे करण्यासाठी नियोजन झाले आहे. तालुक्यात २०६ पैकी १९० गावांतील साडेसहा हजार हेक्टरवर भात लागवड झाली आहे. त्यातील सुमारे साडेबाराशे हेक्टर भातशेती पावसामुळे बाधित झाली असावी, असा अंदाज आहे. नदी व खाडीकिनारी भागातील गावांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यात गावखडी, मावळंगे, नातुंडे, गावडेआंबेरे, नेवरे, मालगुंड, नांदीवडे मळा, राई भोंडे, पावस, गोळप, हरचिरी, उमरे यासह अन्य गावांचा समावेश आहे. पंचनामा करताना लागवड झालेल्या क्षेत्रात पाणी साचून राहिलेले भातक्षेत्र, आडवी झालेले भात पुन्हा रुजून आलेले क्षेत्र किंवा पावसात भिजून कुजून गेलेले भात याची पाहणी करण्यात येणार आहे. त्या क्षेत्राचे पंचमाने करण्यात येत आहेत. शक्य तिथे फोटोही घेतले जात आहेत. रत्नागिरीतील कृषी पर्यवेक्षक एम. व्ही. बापट म्हणाले, की प्रत्येक गावातील सरपंचांची मदत घेऊन शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या भागांची पाहणी सुरू आहे. दोन ते तीन दिवसांत अहवाल तयार पूर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान संगमेश्‍वरमधील शेतकऱ्यांकडून पंचनाम्यासाठी अधिकारी पोचले नसल्याच्या प्रतिक्रिया मिळत आहेत. देव धामापूरचे शेतकरी राजाराम शिगवण म्हणाले, आमच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सगळीकडे पंचनामा सुरू आहे असे ऐकले; मात्र आजपर्यंत आमच्याकडे कोणीही पंचनाम्याला आलेले नाही. बळिराजा शेतकरी संघटनेचे अशोक जाधव म्हणाले, वेळीच पंचनामे झाले तरच शेतकऱ्यांना काहीतरी हातात पडेल. आता शेतात काहीही शिल्लक राहिलेले नाही. जे शिल्लक आहे, ते सडून गेले आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार मिळावेत अशी आमची मागणी आहे. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांनी पंचनामे करण्याचे आदेश तालुकापातळी दिली असल्याचे सांगितले. प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. त्याचा अहवाल शासनाकडे सुपूर्त करण्यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com