‘कुमरी’ शेतकऱ्यांना वनजमिनी कायमस्वरूपी वहिवाटीचा हक्क

The right of permanent possession of forest land to 'Kumari' farmers
The right of permanent possession of forest land to 'Kumari' farmers

कोल्हापूर : ‘कुमरी’ पद्धतीने शेती करणाऱ्या वन निवासींना कायमस्वरूपी वहिवाटीस देऊन त्यांची नावे सातबारावरील इतर हक्कात घेण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. सुमारे १०० वर्षांपासून असणारी वहिवाटीच्या हक्काची मागणी आता पूर्ण झाली आहे. या निर्णयाने जिल्ह्यातील चंदगड, राधानगरी, पन्हाळा, भुदरगड, आजरा, शाहूवाडी आणि करवीरमधील ४१.२९ हेक्टर शेतजमीन आणि २० हजार चौरस मीटर रहिवासी क्षेत्राचा लाभ १ हजार ७२० लोकसंख्येला मिळणार आहे.

जिल्ह्यात १९२७ व त्यापूर्वीपासून वननिवासी शेतकरी कुमरी पद्धतीने १६ वर्षांच्या फेरपालटाने नागली, वरी ही पिके घेत होती. परंतु, या पद्धतीने जंगलातील छोटा झाड-झाडोरा साफ करुन शेतकरी शेती करीत असत. नवीन क्षेत्र निर्माण करण्याकडे लोकांचा कल होता. त्‍यामुळे जंगलाची हानी होत होती. वन विभाग कुमरी पद्धतीने शेतीसाठी केलेल्या जमिनीचे भाडे दरवर्षी वसूल करून त्याच्या भाडे पावत्याही देत होती. 

असे शेत वहिवाटीचे हक्क कायमस्वरूपी मिळावेत अशी वननिवासी शेतकऱ्यांची १०० वर्षांपासून मागणी होती. केंद्रशासनाने यासाठी अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी, वन हक्काची मान्यता अधिनियम २००६ आणि नियम २००८ हा कायदा पारीत केल्याने वहिवाटीचे हक्क कायमस्वरूपी मिळण्यास कुमरी धारक शेतकरी पात्र झाले. 

या शेतकऱ्यांकडे पुरावे असूनही उपविभागीय अधिकारी स्तरावरील समितीने नाकारला होता. याची सुनावणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर झाली. असे सर्व दावे मान्य करून या शेतकऱ्यांना वनजमिनी कायमस्वरूपी वहिवाटीस देऊन त्यांची नावे सातबाराच्या इतर हक्कांत घेण्याबाबत निर्देश देण्यात आले. या वेळी सदस्य सचिव प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, सहायक उपवनसंरक्षक सुनील निकम आदींसह पक्षकार उपस्थित होते. 

चंदगड तालुक्यातील वाघोत्रे, कोदाळी, जांभरे, उमगाव, नगरगाव कोदाळी, गुळंब, कानोर खुर्द, पिळणी, बुझवडे. आजरा तालुक्यातील आवंडे खानापूर, करवीर तालुक्यातील धोंडेवाडी, पन्हाळा तालुक्यातील वाघवे, गोठे, पोर्ले तर्फ ठाणे, निवडे, उत्रे, शाहूवाडी तालुक्यातील पेरीड पैकी गाडेवाडी, भेडसगाव, राधानगरी तालुक्यातील रामणवाडी, बनाचीवाडी, मांडरेवाडी, भुदरगड तालुक्यातील पेठशिवापूर या गावांचा समावेश आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील एकूण १ हजार ७२० लोकसंख्येला ४१.२९ हेक्टर शेतजमीन आणि २० हजार चौरस मीटर रहिवास क्षेत्राचा लाभ मिळणार आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com