तापमानातील वाढीमुळे किडींचा उद्रेक वाढण्याची शक्यता

तापमानातील वाढीमुळे मका पिकावर परिणाम होत आहे.
तापमानातील वाढीमुळे मका पिकावर परिणाम होत आहे.

कृषी क्षेत्रामध्ये विविध किडींचा उद्रेक वेगाने वाढत आहे. तयार होत असलेल्या अन्नाचा बारावा भाग हा किडींकडून फस्त होतो. वातावरणातील बदलांचे किडींवरील परिणामांचे विश्लेषण संशोधकांनी केले आहे. वाढत असलेल्या तापमानामुळे किडींच्या चयापचयाच्या वेगामध्ये वाढ होत असून, त्यांच्या खाण्याचे प्रमाण व वेग वाढत आहे. भविष्यामध्ये किडी पिकांचा अधिक प्रमाणात फडशा पाडण्याचा धोका `सायन्स` या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे.  तापमानातील वाढ किंवा वातावरण बदल यांचा फारसा विचार सामान्य माणूस किंवा शेतकरी करत नाही. मात्र, या घटकांचे परिणाम दैनंदिन जीवनाला व्यापून उरणारे असल्याची संशोधने सातत्याने पुढे येत आहे. या शतकाच्या अखेरपर्यंत जागतिक तापमानामध्ये १.७ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो. या तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पॅरीस कराराद्वारे जागतिक पातळीवर सर्व देश आपापल्यापरीने कार्यरत असले तरी त्यातील राजकारण हा महत्त्वाचा विषय ठरत आहे. बाऊल्डर येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने पिकाच्या उत्पादनाच्या सांख्यिकीचा आधार घेत किडींमुळे होत असलेले नुकसान मोजण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तापमानातील वाढीमुळे किडींच्या चयापचयाच्या दरावर व अन्य जैविक क्रियांवर होणारे परिणाम मोजण्यात आले. 

  •  या निष्कर्षामध्ये प्रदेशनिहाय, तापमानानुसार फरक दिसून आले. युरोपातील काही भागामध्ये तापमानवाढीमुळे मोठा फटका बसणार आहे. या शतकाच्या अखेरीला अकरा युरोपियन देशांमध्ये गहू पिकाचे ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान किडींमुळे होऊ शकते. त्यात ब्रिटन, डेन्मार्क, स्वीडन आणि आयर्लंड यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. 
  •  जागतिक शाश्वतता विषयक संशोधन गट - फ्यूचर अर्थच्या संचालिका व कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्रा. जोशुआ तेवक्सबरी यांनी सांगितले, की काही थंड तापमान असलेल्या देशामध्ये किडींमुळे होणाऱ्या नुकसानीमध्ये वाढत्या तापमानाबरोबर वेगाने वाढ होण्याचा अंदाज आहे. त्याचा मोठा ताण शेतकऱ्यांवर असेल.
  •  प्रति अंश सेल्सिअस तापमानवाढीसाठी सरासरी २.५ टक्के पीक उत्पादन किडींच्या प्रादुर्भावामुळे घटण्याचा धोका आहे. ही घट एकूण तापमान परिणामांच्या घटीच्या तुलनेमध्ये अर्धी राहील. उत्तरेकडील शीत प्रदेशामध्ये तापमानातील वाढीचा यापेक्षाही अधिक फटका बसण्याची शक्यता प्रा. तेवक्सबरी व्यक्त करतात.   
  •  शेतकऱ्यांनी आतापासूनच उष्णता आणि कीड प्रतिकारक जातींच्या लागवडीकडे वळण्याची व त्यांच्याशी जुळवून घेण्याची तयारी केली पाहिजे. पीक फेरपालटामध्ये त्यांचा वापर वाढवला पाहिजे. केवळ किडींच्या नियंत्रणासाठी अधिक कीडनाशकांचा वापर यासाठी उपयोगी ठरणार नाही, अशा कीडनाशक वापरातून आरोग्य आणि पर्यावरणाच्या समस्या उलट वाढू शकतील. 
  • मका,भाताच्या उत्पादनावर परिणाम  उत्तर अमेरिका आणि आशिया देशही किडींच्या प्रादुर्भावातून सुटणार नाहीत. अमेरिका हा जागतिक पातळीवरील सर्वाधिक मोठा मका उत्पादक असून, या पिकात २ अंश सेल्सिअस इतक्या तापमानवाढीच्या अंदाजामुळे किडींचा प्रादुर्भाव ४० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. प्रति वर्ष २० दशलक्ष टन उत्पादन घटेल. याच वेळी जागतिक भात उत्पादनाच्या एक तृतीअंश उत्पादन घेणाऱ्या चीनमधील भात उत्पादनातही किडींच्या उद्रेकामुळे सर्वाधिक २७ दशलक्ष टन प्रति वर्ष इतके नुकसान नोंदवले जाईल.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com