जोखीम व्यवस्थापन तंत्रज्ञानाची गरज ः कुलगुरू डाॅ. ढवण
जोखीम व्यवस्थापन तंत्रज्ञानाची गरज ः कुलगुरू डाॅ. ढवण

जोखीम व्यवस्थापन तंत्रज्ञानाची गरज ः कुलगुरू डाॅ. ढवण

परभणी ः अनियमित, अवेळी पडणा-या पावसाचे शेती व्यवसायावर परिणाम झाले आहेत. बाजारपेठेचा प्रश्न गंभीर आहे. यामुळे शेतकरी हवालदिल होऊन शेती व्यवसायापासून दूर होऊ पाहत आहेत. या परिस्थितीत जोखीम कमी करणारे नवीन तंत्रज्ञान देऊन शेतकऱ्यांना शेतीमध्ये टिकवून ठेवण्याची जबाबदारी कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विभाग यांच्यावर आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. अशोक ढवण यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यातर्फे गुरुवारी (ता. २४) आयोजित जिल्हा कृषी मेळाव्यामध्ये डाॅ. ढवण बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला राठोड अध्यक्षस्थानी होत्या. जीवनज्योती चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक बाळासाहेब शिंदे, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. नितीन मार्कंडेय, आत्माचे प्रकल्प उपसंचालक के. आर. सराफ, तालुका कृषी अधिकारी पी. बी. बनसावडे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. प्रशांत भोसले आदी उपस्थित होते.

डाॅ. ढवण पुढे म्हणाले, की वेळोवेळी विकसित करण्यात आलेले तंत्रज्ञान कुचकामी ठरत आहे. त्यामुळे शेतकरी शेतीमध्ये टिकून राहतील की नाही, याबाबत चिंता वाटत आहे. एकीकडे २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे सततच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत, ही विसंगती आहे. शेतीमधील जोखीम व्यवस्थापनाला महत्त्व देणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीपुरक उद्योगाचा अवलंब करावा लागेल. गटशेती, शेतकरी उत्पादक कंपन्या, प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन द्यावे लागेल. दुष्काळी परिस्थितीत फळबागा वाचविण्यासाठी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. पाणी कमी असल्यास फळे तोडून टाकत फळबागांना यंदा विश्रांती द्यावी. प्रास्ताविक शिंदे यांनी केले.

श्रीमती राठोड म्हणाल्या की, जिल्हा परिषद दुष्काळी स्थितीत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. या वेळी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तांत्रिक सत्रामध्ये दुष्काळी स्थितीत पशुधन संगोपन, फळबाग व्यवस्थापन आदी विषयांवर माहिती देण्यात आली. शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com