कोल्हापुरात नद्यांच्या पाण्याची वाढ कायम

पुरस्थिती
पुरस्थिती

कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर कायम असल्याने शनिवारी (ता.७) नद्यांच्या पातळीत वाढ कायम होती. शनिवारी सकाळी नऊ वाजता संपलेल्या चोवीस तासांत पंचगगेच्या पातळीत दोन ते तीन फुटांनी वाढ झाली. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट इतकी आहे. शनिवारी ही पातळी ३६ फूट इतकी होती. राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद झाला. तीन खुल्या दरवाजांतून ५६८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. कोयना धरणाचे दरवाजे साडेचार फुटांवर करण्यात आले असून ४१५१४ क्युसेकने विसर्ग सुरु आहे. तर अलमट्टी धरणामधून १४४३१३ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून ११ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  जिल्ह्यात पाऊस कायम आहे; तर कोयना भागात पाऊस कमी झाल्याने कोयना व पर्यायाने कृष्णेच्या पाण्यात मंद वाढ होती. पंचगंगा वारणा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ राहिली. कृष्णेचे पाणी स्थिर राहिले. या सगळ्या नद्यांचे पाणी शिरोळ भागात येत असल्याने नद्यांच्या पाण्याची पातळी वाढलेलीच राहिली. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने ४ राज्यमार्ग व १५ प्रमुख जिल्हा मार्गांवरील वाहतूक बंद झाली. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सर्वाधिक १२२ मि.मी. पाऊस गगनबावडा तालुक्‍यात झाला. गेल्या चोवीस तासांत पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांत पंधरा बंधाऱ्याची वाढ झाली. बंधाऱ्यांची संख्या ६५ वर गेली आहे. बंधाऱ्यांवरून होणारी गावांतर्गत वाहतूक प्रशानसाने बंद केली आहे; तर अनेक ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.  अद्यापही कोणत्याही गावाचा संपर्क पूर्ण तुटलेला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या दोन तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. सध्यातरी पूर धोकादायक स्वरूपात नसला तरी काही गावांचा संपर्क रस्ते पाण्याखाली गेल्याने तुटू शकतो. यामुळे जवानांची कुमक मागविल्याचे आपत्ती निवारण कक्षाच्या वतीने सांगण्यात आले. जिल्ह्यातील दहा टक्क्यांहून अधिक शिवारे पुन्हा पाण्याखाली गेल्याने नव्याने शेतकाम करण्याच्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नाला धक्का बसला आहे. दिवसभर पावसाची रिमझिम व पूरग्रस्त स्थितीमुळे नव्या लागवडीचे प्रयत्न आता आणखी लांबणीवर पडतील, अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी गेल्या आठ दिवसांत पुन्हा लागवडी केल्या आहेत, त्यांना मात्र दुहेरी फटका बसून बिकट स्थिती निर्माण होणार आहे.  दृष्टिक्षेपात पूरस्थिती

  •  गगनबावडा तालुक्‍यात सर्वाधिक १२२ मि.मी. पाऊस
  •  बहुतांशी तालुक्‍यांत मार्ग पाण्याखाली जाण्यास सुरवात
  •  पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू
  •  एका महिन्यात दुसऱ्यांदा शेती पाण्याखाली
  •  पुन्हा लागवडीची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना धक्का  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com