रॉकेलच्या पैशांसाठी दुकानदारांचे प्रशासनाकडे हेलपाटे

The Rockell Distributor is in trouble
The Rockell Distributor is in trouble

कऱ्हाड, जि. सातारा ः महापुराच्या काळात पूरग्रस्तांची गरज भागवण्यासाठी गावोगावच्या परवानाधारक रॉकेल विक्रेत्यांनी पदरमोड करून रॉकेलचा पुरवठा केला. त्यांना प्रशासनाकडून पूर ओसरल्यानंतर त्यांनी वाटलेल्या रॉकेलचे पैसे देण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे परवानाधारकांनी सामाजिक बांधीलकीतून पूरग्रस्तांना रॉकेलचे वाटप केले. मात्र, त्याला चार महिन्यांचा कालावधी उलटला तरी परवानाधारक रॉकेल विक्रेत्यांना अद्यापही प्रशासनाकडून पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. 

कऱ्हाड-पाटण तालुक्‍यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर अतिवृष्टी झाली. त्यामुळे ऑगस्ट पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात महापूर आला. त्यामुळे कृष्णा-कोयना या दोन मुख्य नद्यांसह उपनद्यांच्या काठच्या अनेक गावांतील जनजीवन विस्कळित झाले. अनेकांना गावातून बाहेर स्थलांतरित करावे लागले, अनेकांची घरे पाण्यात गेली, काहींच्या घरांची पडझड झाली. तर काहींना घरासही मुकावे लागले. त्यामुळे मोठी गैरसोय झाली होती. महापुराचे पाणी नदीकाठच्या गावागावांत घुसल्याने तेथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

प्रशासनाने महापुराची संभाव्य स्थिती लक्षात घेऊन अशा पूरग्रस्त गावांसाठी रॉकेल व धान्याचे आगाऊ वितरण केले होते. त्यामुळे परवानाधारक दुकानदारांकडे रॉकेल उपलब्ध होते. गावात वीजपुरवठा खंडित असल्याने प्रशासनाने रॉकेल विक्रेत्यांना संबंधित पूरग्रस्तांच्या घरात किमान उजेडासाठी तरी रॉकेल उपलब्ध व्हावे, ज्यांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांना स्वयंपाकासाठी रॉकेल उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचे पैसे महापूर ओसरल्यानंतर देण्यात येतील, असेही दुकानदारांना सांगण्यात आले होते. 

त्यानुसार सामाजिक बांधीलकीतून दुकानदारांनी पदरमोड करून संबंधित पूरग्रस्तांना रॉकेलचे वाटप केले. त्यानंतर त्यांनी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने मागितलेल्या विहित नमुन्यात पूरग्रस्तांना वाटलेल्या रॉकेलची माहिती दिली. त्यानंतर त्यांना लवकरच अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. 

परंतु, त्याला आता चार महिन्यांचा कालावधी उलटला, तरी परवानाधारक रॉकेल विक्रेत्यांना अद्यापही प्रशासनाकडून पैसे मिळाले नाहीत. त्याबाबत त्यांनी तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी यांना भेटून त्यांची व्यथा मांडली. तेथून त्यांना शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी पदरमोड करूनही त्यांच्यावर प्रशासनाकडे पैशासाठी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.

महापुराच्या काळात लोकांच्या सोयीसाठी पूरग्रस्तांना रॉकेल वाटण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार परवानाधारक रॉकेल दुकानदारांनी रॉकेल वाटले आहे. विक्रेत्यांचे पैसे देण्यासाठीचा प्रस्ताव त्याच वेळी शासनाकडे पाठवला आहे. शासनाकडून पैसे आल्यावर तातडीने ते दुकानदारांना देण्यात येतील.- अमरदीप वाकडे, तहसीलदार, कऱ्हाड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com