रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क

रोहित पवार
रोहित पवार

 नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’ मिळत आहे. पवार यांच्या तिसऱ्या पिढीतील चर्चेत असलेले पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी या मतदारसंघासह नगर जिल्ह्यात संपर्क वाढवला आहे. ते येथून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेने कार्यकर्ते, नेत्यांना उत्साह आला आहे. तसे झाले तर पालकमंत्री राम शिंदे यांच्याशी रोहित पवार यांची लढत होईल. 

सध्या रोहित पवार यांच्या संपर्क मोहिमेची जिल्ह्यात चर्चा आहे. जिल्ह्यामधील कर्जत-जामखेड तालुक्‍याचा मतदारसंघ कायम चर्चेत राहिलेला आहे. प्रारंभी माजी पाटबंधारे मंत्री आबासाहेब निंबाळकर यांनी अनेक वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर हा मतदारसंघ ३५ वर्षे आरक्षित होता. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ खुला झाल्यावर येथे इच्छुकांची गर्दी वाढली आणि मातब्बरांच्या लढाईत सामान्य असलेले राम शिंदे निवडून आले.

सध्या शिंदे यांची ताकद पाहता दोन्ही तालुक्‍यात सध्या तरी त्यांना पराभूत करणारा तगडा उमेदवार नसल्याची चर्चा आहे. मात्र दोन्ही तालुक्‍यात इच्छुकांची संख्या अधिक आहे. जास्त उमेदवारांमुळे दोन वेळा काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला होता. हा मतदारसंघ बारामतीला लागून आहे. त्यातच ‘बारामती ॲग्रो’चे रोहित पवार यांनी मतदारसंघात संपर्क वाढविला आहे. 

काही दिवसांपूर्वी रोहित पवार स्वतःच या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे बोलले, कर्जत-जामखेड तालुक्‍यात वेगवेगळ्या कार्यक्रमाला ते हजेरी लावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखा उद्‌घाटनावरही त्यांनी भर दिला आहे. शिवाय जिल्ह्यामधील अकोले, पाथर्डी तालुक्‍यातही त्यांनी कार्यक्रम घेतले. त्यामुळे कर्जत-जामखेडमधील रोहित पवार यांचा वाढता संपर्क जिल्ह्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.    इच्छुक शांत होतील राखीव मतदारसंघ खुला झाल्यावर कर्जत-जामखेडमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीत इच्छुकांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत एकापेक्षा जास्त उमेदवार असल्याने मतविभागणीचा राम शिंदे यांना फायदा झाला होता. त्यामुळे आता या वेळी दोन्ही तालुक्‍यांतील नेत्यांनी सावध भूमिका घेतली असून पवार कुटुंबातील व्यक्तीने निवडणूक लढवली तर वादावर पडदा पडेल, असे कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत. त्यातूनच सुरवातीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आता रोहित पवार यांच्या नावाची जिल्हाभर चर्चा होत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com