व्हॅलेंटाइन डेसह विविध रंगी गुलाबांना वर्षभर मार्केट

व्हॅलेंटाइन डेसह विविध रंगी गुलाबांना वर्षभर मार्केट
व्हॅलेंटाइन डेसह विविध रंगी गुलाबांना वर्षभर मार्केट

वासाळी (ता. जि. नाशिक) येथील संजीव गजानन रासने यांनी आपला व्यवसाय सांभाळत तीन एकरांतील पॉलिहाऊसमध्ये विविध रंगी गुलाबांची शेती यशस्वी केली आहे. व्हॅलेंटाइन डेसह नाताळ, लग्न सराईच्या दिवसांत दर्जेदार, आकर्षक गुलाबांचे मार्केट काबीज करण्यात ते यशस्वी झाले आहेत. व्हॅलेंटइन दिवसासाठी तीन ते साडेतीन लाख फुलांच्या विक्रीचे नियोजन रासने दरवर्षी करतात.

वासाळी (ता. जि. नाशिक) येथे पाच एकर जमीन घेतलेले संजीव रासने सिव्हील इंजिनिअर आहेत. त्यांचा बांधकाम व्यवसाय आहे. त्यांचे वडील शेतकरीच असल्याने शेती, निसर्ग आणि पर्यावरणाची आवडही रासने यांना पहिल्यापासूनच आहे. फूलशेतीचे अर्थकारण भावलेल्या रासने यांनी २०१४ मध्ये पॉलिहाऊस शेती व त्यात गुलाब घ्यायचे ठरवले. त्यासाठी बँकेचे अर्थसाह्य घेऊन स्वप्नाला आकार दिला. नोंदणी करून २५ टक्के अनुदानही मिळवले. भांडवल उपलब्ध झाल्यानंतर लागवडीचे निकष, लागवडीपूर्व नियोजन, वाणांची लागवड, खत व पाणी व्यवस्थापन या बाबींचा सखोल अभ्यास केला. तळेगाव दाभाडे (जि. पुणे) येथून रोपे खरेदी केली.

रासने यांची गुलाबशेती

  • पहिल्या टप्प्यात एक एकर व नंतरच्या टप्प्यात दोन एकर असे तीन एकरांत पॉलिहाऊस
  • गुलाब वाण- टॉप सिक्रेट- २.५ एकर, गोल्ड स्ट्राईक, रिवायव्हल, अव्हेलांचे (एकत्रित)- २० गुंठे
  • रंग- लाल, गुलाबी, पांढरा, पिवळा,
  • गुलाब पीक नवे असल्याने कामाच्या पद्धती व व्यवस्थापन याबाबत संबंधित तज्ज्ञांकडून माहिती घेतली. दैनंदिन कामाचे वेळापत्रक तयार केले.
  • २८ गुंठे क्षेत्रात सव्वा कोटी लिटर क्षमतेच्या शेततळे
  • एक विहीर व एक बोअरवेल
  • संपूर्ण क्षेत्रावर ठिबक, पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा कार्यान्वित
  • शेणखत, गांडूळ खत, निंबोळी पेंड, जीवामृत यांचा अधिक वापर
  • रासायनिक खतांचा गरजेनुसारच वापर. विद्राव्य खतांचा संतुलित पुरवठा.
  • रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झाडावर पानांची संख्या मर्यादित.
  • गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी नियोजन

  • फुलाचा रंग, आकार, दांडीची लांबी व निरोगी मोठी हिरवी पाने या बाबींवर गुलाबाची गुणवत्ता व मागणी अवलंबून असते. त्या अनुषंगाने नियोजन केले जाते.
  • नियमित माती व पाणी परीक्षण. -
  • उन्हाळ्यात तापमान नियंत्रित करण्यासाठी पॉलिहाऊसवरील पेपरला चुन्याचा लेप दिला जातो.
  • उष्णता वाढल्यानंतर पाण्याची फवारणी. तसेच आतील वरच्या भागात शेडनेट कागद टाकला जातो.
  • फुलांची वाढ व गुणवत्तेसाठी ताक, गोमूत्र व संजीवकांचा वापर
  • कळीअवस्थेत आकार, रंग व गुणवत्ता वाढण्यासाठी ‘बडकॅप’ लावून फुलांची काळजी घेतली जाते.
  • एकाच काडीवरील अधिक कळ्या कमी (डीस बडिंग) केल्या जातात.
  • रासायनिकसोबत जैविक कीडनाशकांचाही वापर
  • झाडांवरील भागात अन्नद्रव्य निर्मितीसाठी अनावश्यक फांद्या वाकवल्या जातात.
  • गरजेनुसार छाटणी करून अनावश्यक काड्या काढल्या जातात.
  • पिंचींग- फुललेली गुलाबांची फुले काढून टाकली जातात.
  • कामांची जबाबदारी संजीव आपला व्यवसाय सांभाळून गुलाबशेतीला वेळ देतात. एमटेकचे शिक्षण घेतलेली कन्या काश्मीरादेखील कामकाज पाहते. सर्व कामे वेळेत व नियोजनपूर्वक होण्यासाठी दोन पर्यवेक्षक नेमले आहेत. पैकी शीतल वाघमारे यांच्याकडे उत्पादन, पीकसंरक्षण, सिंचन व खत व्यवस्थापन तर सुमित अक्कर यांच्याकडे काढणी, हाताळणी, प्रतवारी, पॅकिंग व विक्री या जबाबदाऱ्या आहेत. छत्तीसगड व मध्य प्रदेश येथील २५ कुशल मनुष्यबळ वर्षभर कामासाठी असते. त्यांची राहण्याची सोयही केली आहे.

    काढणीपश्चात कामकाज

  • सकाळी ८ ते १० दरम्यान थंड वातावरणात काढणी होते.
  • त्यानंतर पुढील पंधरा मिनिटांत ती पॅकहाऊसमध्ये आणली जातात.
  • फुले साखर व सायट्रिक अॅसिड मिसळून तयार केलेल्या द्रावणात ठेवली जातात.
  • हाताळणी- गुलाबाच्या दांडीसोबत असलेले काटे व अधिक पाने काढून टाकली जातात.
  • प्रतवारी फुलांची प्रतवारी करण्यासाठी दांडे एकसारख्या प्रमाणात कापून घेतले जातात. ४० सेंमी, ५० सेंमी, ६० सेंमी व ७० सेंमी लांबीनुसार त्यांचे चार आकारात वर्गीकरण होते.

    पॅकिंग

  • प्रति २० फुलांचे बंडल तयार केले जाते.
  • बंडल पेपरमध्ये गुंडाळून कोरूगेटेड बॉक्समध्ये भरण्यात येतात.
  • शीतगृहात गरजेनुसार एक किंवा दोन दिवस ठेवण्यात येतात.
  • फुलांचे मार्केट

  • ‘खुशी फ्लोरा’ नावाने ब्रॅण्ड तयार केला आहे.
  • मिळवलेल्या बाजारपेठा- दिल्ली, इंदूर, मुंबई व स्थानिक नाशिक.
  • येथे फूल व्यापारी व विक्रेते यांना माल पाठविण्यात येतो.
  • इंदूर व मुंबईसाठी ट्रान्सपोर्ट तर दिल्लीसाठी रेल्वेने माल पाठवण्यात येतो.
  • तीन एकरांतून दररोज विक्रीसाठी उपलब्ध होणारी फुले- ५ ते ६ हजार
  • वर्षभर विक्री होणारी फुले - १७ लाख
  • पैकी व्हॅलेंटाईन डे मार्केटसाठी - ३ ते ३.५ लाख फुले.
  • या काळात मिळणारा दर - ९ ते १० रुपये प्रति फूल
  • वर्षात मिळणारा सरासरी दर- चार रुपये प्रति फूल
  • फुललेल्या गुलाबांची हारांसाठी विक्री. त्यास वर्षभर मिळणारा दर - ३० ते ५० रुपये प्रति किलो
  • सणउत्सव काळात मिळणारा दर- १०० रुपयांपर्यंत
  • फुलांच्या रंगानुसार गुलाबाचे मार्केट

  • लाल रंग : व्हॅलेंटाइन डे
  • पांढरा रंग : नाताळ
  • पिवळी, गुलाबी फुले- लग्न सराई, पुष्पगुच्छ
  • व्हॅलेंटाइन डेसाठी नियोजन

  • या दिवसासाठी फुलांना चांगला दर मिळत असल्याने उत्पादनासाठी विशेष पूर्वतयारी करावी लागते.
  • एक डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान बहार छाटणी केली जाते.
  • पुढील ५० दिवसांनंतर फुले काढणीयोग्य होतात.
  • २६ जानेवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान दिवसभरात १५ हजार फुलांची काढणी होते. त्यानंतर सायंकाळी पॅकिंग होते.
  • व्यापारी व ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा होतो.
  • शीतकरण प्रक्रियेसह अन्य सुविधा स्वमालकीचे कोल्ड स्टोरेज बांधले आहे. त्यासोबत फुलांची हाताळणी, प्रतवारी व पॅकिंग यासाठी पॅकहाऊस उभारले आहे. अन्य अत्यावश्यक सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शिवाराच्या सुरक्षेसाठी देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. मजुरांच्या हिताचे निर्णयही राबविण्यात येतात.

    व्यावसायिक वृद्धीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर संजीव यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला आहे. व्हॉटस ॲप ग्रूपद्वारे कामगारांची सेल्फीद्वारे हजेरी घेतली जाते. कामांचे नियोजन, पीकस्थिती यांचा दररोज आढावा घेण्यात येतो. त्यामुळे कामात पारदर्शकता आली असून आगामी नियोजन करणे सोपे झाले आहे. यासह फेसबूक, इन्स्टाग्राम यावर ‘ख़ुशी फ्लोरा’ नावाने अकाउंट सुरू करून मार्केटिंग करण्यात येते.

    संपर्क - संजीव रासने - ९८२२४९७४५५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com