नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील चार प्रकल्पांतून मिळणार आवर्तने

Rotations will be received from four projects in Nanded, Hingoli district
Rotations will be received from four projects in Nanded, Hingoli district

नांदेड : इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प, हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील सिद्धेश्‍वर प्रकल्प, नांदेड जिल्ह्यातील मानार प्रकल्प, गोदावरी नदीवरील शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी या चार प्रकल्पांद्वारे यंदा रब्बी आणि उन्हाळी हंगामात सुमारे १ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी आवर्तने मिळणार आहेत. एकूण २३२.०६ दलघमी पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. २) जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. यंदा प्रथमच या चारही प्रकल्पांतील पाणीवापर नियोजनाची बैठक मुंबईऐवजी लाभक्षेत्र असलेल्या नांदेड येथे घेण्यात आली. नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातील संबंधित लोकप्रतिनिधी, अधिकारी, लाभधारक उपस्थित होते. 

ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पामध्ये या वर्षी ७५८.१७ दलघमी (७९.३ टक्के) पाणीसाठा उपलब्ध झाला. येथून ६३०.५७ दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होईल. उमरखेड, अर्धापूर, कळमनुरी तसेच नांदेड, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यासाठी ८२.५ दलघमी पाणी आरक्षित केले आहे. सिंचनासाठी ५४८ दलघमी पाणी उपलब्ध आहे. त्याद्वारे ८० हजार हेक्टरच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात २ आणि उन्हाळी हंगामात ४ आवर्तनाचे नियोजन आहे. त्यांच्या तारखा २३ डिसेंबर (पूर्ण), २२ जानेवारी, १ मार्च, १ एप्रिल, ५ मे, १० जून अशा आहेत.

पूर्णा नदीवरील येलदरी आणि सिद्धेश्‍वर या धरणामध्ये या वर्षी ८८४.४३ दलघमी (९९.५ टक्के) पाणीसाठा उपलब्ध झाला. प्रकल्पांतील गाळ आणि बाष्पीभवन यामुळे होणारी २२६.७ दलघमीची तूट वजा करता ६५७.६६ दलघमी पाणीवापरासाठी उपलब्ध होईल. परभणी, हिंगोली, जिंतूर, वसमत, औंढा नागनाथ या शहरांच्या, ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यासाठी ९६.०६ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले. सिंचनासाठी ५६१ दलघमी पाणी उपलब्ध आहे. सुमारे ५५ हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात २, तर उन्हाळी हंगामात ३ आवर्तने मिळतील. त्यांच्या तारखा २३ डिसेंबर, २७ जानेवारी, ३ मार्च, ३ एप्रिल, ३ मे अशा आहेत.

`निम्न मानार`मध्ये १०० टक्के पाणी

निम्न मानार प्रकल्पात तीन वर्षांनंतर प्रथमच १०० टक्के (१२३.४९ दलघमी) पाणी आहे. यातून ९८.६१ दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. नायगाव, कंधार या तालुक्यांतील ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी ८.५० दलघमी पाणी आरक्षित केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी ९०.११ दलघमी पाणी आहे. त्यातून सुमारे २३ हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन, तर उन्हाळी हंगामात एक आवर्तन दिले जाईल. त्यांच्या तारखा १५ डिसेंबर (पूर्ण), २० जानेवारी, २० फेब्रुवारी, २० मार्च आहेत.

`विष्णुपुरी`तून तीन आवर्तने

विष्णुपुरीत १०० टक्के (८०.७९ दलघमी) पाणी आहे. अंतेश्‍वर बॅरेज भरले असून, त्यातून २१.० दलघमी, दिग्रस बंधाऱ्यातून २५.० दलघमी पाणी असे एकूण १२६.७९ दलघमी पाणी मिळेल. नांदेड महानगरपालिका, एमआयडीसी, ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी ४५ दलघमी पाणी आरक्षित केले आहे. सिंचनासाठी ६१.२९ दलघमी पाणी मिळेल. सुमारे १२ हजार हेक्टरसाठी रब्बीत तीन आवर्तने दिली जातील. आवर्तनाच्या तारखा २५ डिसेंबर(पूर्ण), २५ जानेवारी, २० फेब्रुवारी या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com