कृषी पदव्युत्तर प्रवेशासाठी १३ नोव्हेंबरपासून फेऱ्या

राज्यातील कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशाच्या चार फेऱ्या होत असून, १३ नोव्हेंबरला पहिली फेरी होईल.
Rounds for postgraduate admission in agriculture from 13th November
Rounds for postgraduate admission in agriculture from 13th November

पुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशाच्या चार फेऱ्या होत असून, १३ नोव्हेंबरला पहिली फेरी होईल. 

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांच्या म्हणण्यानुसार, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विविध विद्याशाखांसाठी होत असलेल्या या प्रवाशांकरिता दुसरी फेरी २० नोव्हेंबरला तर तिसरी फेरी २७ नोव्हेंबरला होईल. शेवटची चौथी फेरी मात्र सहा ते आठ डिसेंबरला होईल. https://maha.agriadmissions.in या संकेतस्थळावर २८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरावे लागतील. राज्यात सध्या दोन वर्षं कालावधीचा पदव्युत्तर पदवी (मास्टर डिग्री) अभ्यासक्रम शिकवणारी ३८ महाविद्यालये आहेत.

यात राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अखत्यारित ११, अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे ९, परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ११ तर दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अखत्यारित सात महाविद्यालये आहेत. 

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी संबंधित विद्याशाखेची पदवी किमान ५.० एकत्रित श्रेयांक सरासरीने (सीजीपीए) उत्तीर्ण होणे आवश्यक असते. अशा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळाकडून सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाते. सीईटीचे ७० टक्के गुण आणि पदवीचे ३० टक्के गुण विचारात घेतले जातात. यातून पदव्युत्तर प्रवेशासाठी सीजीपीए काढला जातो. खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना किमान ५.५ तर आरक्षित विद्यार्थ्यांना ५.०० सीजीपीए आवश्यक ठरतो.

दहा विद्याशाखांसाठी होणार प्रवेश फेऱ्या कृषी (एमएससी अॅग्रिकल्चर), उद्यानविद्या (एमएससी हॉर्टिकल्चर), वनशास्त्र (एमएससी फॉरेस्ट्री), मत्सविज्ञान (एमएफएससी फिशरी), अन्नतंत्रज्ञान (एमटेक फुडटेक्नॉलॉजी), कृषी जैवतंत्रज्ञान (एमएससी बायोटेक्लॉलॉजी), कृषी अभियांत्रिकी (एमटेक अॅग्री इंजिनिअरिंग), गृहविज्ञान (एमएससी होमसायन्स), कृषी व्यवसाय व्यवस्थापन (एमबीए अॅग्री), काढणीपश्‍चात तंत्रज्ञान (एमएससी पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी) अशा दहा विद्याशाखांचा समावेश होतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com