नाशिक जिल्ह्यात मका विक्रीत प्रतिक्विंटल ७०० रुपयांचा भुर्दंड

येवला, जि. नाशिक : सध्या बाजार समित्यांसह खासगी बाजारात मक्याला शासकीय हमीभावापेक्षा तब्बल ७०० ते ८०० रुपये कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
 Rs 700 per quintal loss for sale of maize in Nashik district
Rs 700 per quintal loss for sale of maize in Nashik district

येवला, जि. नाशिक : सध्या बाजार समित्यांसह खासगी बाजारात मक्याला शासकीय हमीभावापेक्षा तब्बल ७०० ते ८०० रुपये कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा भुर्दंड सहन करावा लागत आहे. मात्र, आनंदाची बाब म्हणजे ज्या शासकीय खरेदीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे, ती हमीभावाने (१८५० रुपये) खरेदी जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून आठ केंद्रांवर सुरू होणार आहे.

जिल्ह्यातील पीक पॅटर्न गेल्या दोन-तीन वर्षांपासून बदलत असून बाजरी, डाळी व तेलबियांचे क्षेत्र निम्म्याने घटले आहे. मक्यासह कांदा व भाजीपाला पिकाने जागा घेतली आहे. विशेषतः सर्वाधिक क्षेत्र मक्याखाली गुंतवले जात आहे.  जिल्ह्यात या वर्षी तब्बल सर्वाधिक २ लाख ३७ हजार हेक्‍टरवर मका पीक घेतले आहे. त्यास सध्या बाजार समित्यांसह खासगी बाजारात १००० ते १२५०, तर सरासरी ११०० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे भुर्दंड सहन करण्याची वेळ येत आहे. 

सध्या मोठ्या मक्याची सर्वत्र काढणी झाली असून अनेक ठिकाणी पावसाचा फटका बसला. बिट्या ओल्या होऊन कोंब फुटले. असे असले तरी मोठ्या प्रमाणात दर्जेदार उत्पादन यंदा जिल्ह्यात घेतले गेले. यावर्षी हमीभावात वाढ करून १८५० रुपये दराने खरेदीचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्याने मोठा आधार शेतकऱ्यांना मिळणार आहे.

मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनुसार आठ खरेदी केंद्रांना यावर्षी मका,ज्वारी बाजरी व रागी खरेदीचे आदेश पारित केले आहेत. शेतकऱ्यांना ऑनलाइन नाव नोंदणी करायची आहे. सिन्नर, येवला, चांदवड, देवळा, लासलगाव येथे तालुका सहकारी खरेदी विक्री संघांना, तर नांदगाव येथे शनेश्वर तालुका संघ, मालेगाव येथे शेतकरी सहकारी संघ, सटाणा येथे दक्षिण भाग विकास सोसायटी या आठ संस्थांना या भरडधान्य खरेदीची परवानगी मिळाली आहे.

जिल्ह्यात ८ केंद्रांत १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत हमीभावाने भरड धान्य खरेदी होणार आहे. ज्वारीसाठी २६४०, बाजरीसाठी २१५०, मक्यासाठी १८५०, तर रागीसाठी ३२९५ रुपये हमीभाव निश्‍चित केला आहे. त्यानुसार खरेदी होईल. ऑनलाइन नोंदणी बाबतच्या सूचना लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येतील.

-विवेक इंगळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, नाशिक.

खासगी बाजारात सद्या मक्याला अल्प भाव मिळत आहे. आता हमीभाव खरेदी सुरु करण्यास परवानगी मिळाली. १ नोव्हेंबरला खरेदी सुरू होणार आहे. मका,बाजरी पिकाची सातबारा उता-यावर ऑनलाइन नोंद, ८ अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स बॅक पासबुक झेरॉक्सची पूर्तता शेतकऱ्यांनी करावी. -बाबा जाधव, व्यवस्थापक, खरेदी विक्री संघ, येवला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com