बचत गटांच्या उत्पादनांचा ‘रुरल मार्ट’

बचत गटांच्या उत्पादनांचा ‘रुरल मार्ट’
बचत गटांच्या उत्पादनांचा ‘रुरल मार्ट’

परभणी ः महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत परभणी जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या तीनशे महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ‘नाबार्ड’च्या सहकार्याने परभणी शहरात ‘रुरल मार्ट’ सुरू करण्यात आला. यामुळे महिला बचत गटांच्या तेजस्विनी ब्रॅंडची उत्पादने एका छताखाली उपलब्ध झाली आहेत.  महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत परभणी येथील नयी रोशनी लोकसंचलित साधन केंद्रातर्फे सन २०१८ च्या मे महिन्यात महिला बचत गटांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी परभणी शहरात विक्रीचे दालन सुरू करण्यात आले. त्या वेळी या दालनात परभणी शहरातील २० महिला बचत गटांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध ठेवली जात असत. आजवर विविध उत्पादनांच्या विक्रीतून नऊ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. एकूण ५६ हजार ६०० रुपये एवढा नफा मिळाला आहे.  फेब्रुवारी महिन्यात या दालनाचा विस्तार करून त्याचे रूपांतर रुरल मार्टमध्ये करण्यात आले. त्यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंकेकडून (नाबार्ड) दोन वर्षाकरिता ३ लाख २१ हजार रुपये एवढे अर्थसाह्य मिळाले आहे. या अर्थसाह्यामध्ये सेल्सवुमनचे मानधन; तसेच जागेचे भाडे या बाबींचा समावेश आहे. परभणी शहरातील २६० महिला बचत गट; तसेच परभणी, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, मानवत, पूर्णा तालुक्यातील मिळून ४० महिला बचत असे एकूण ३०० महिला बचत गट सहभागी झाले आहेत. उत्पादनांच्या विक्रीतून महिलांना मिळणाऱ्या नफ्यातून दहा टक्के रक्कम साधन केंद्र शुल्क म्हणून घेते; तर ९० टक्के रक्कम संबंधित महिला किंवा गटास दिली जाते. ‘नार्बाड’चे जिल्हा व्यवस्थापक प्रीतम जंगम, महिला आर्थिक  विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक नीता अंभुरे, सहयोगीनी जयश्री टेहरे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षा मोरे, मीरा कऱ्हाळे, तारामती गायकवाड, सत्यशिला गुडे, पल्लवी गडकरी, सुरेखा खाडे आदी या विक्री दालनाचे व्यवस्थापन करतात.  ‘रुरल मार्ट’मध्ये मिळतात या वस्तू रुरल मार्टमध्ये उपलब्ध उत्पादनामध्ये गहू, ज्वारी, सेंद्रिय पद्धतीने पीकविलेल्या हातसडीच्या विविध प्रकारच्या डाळी, विविध प्रकारचे मसाले, पापड, लोणची, महिला, मुलींचे रेडिमेड ड्रेस, नऊवारी साड्या, नक्षीकाम केलेले कपडे, सिमेंट कुंड्या, चुली आदी गृहउपयोगी वस्तू, कार्यालयीन उपयोगात येणाऱ्या कागदी फाइल्स, बॅाक्स फाइल्स, पेपर कव्हर, कागदी; तसेच कापडी पिशव्या, सौंदर्य प्रसाधने आदी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com