कुटुंब, शेतीच्या प्रगतीसाठी ग्रामीण महिलांचा पुढाकार

केव्हीकेच्या माध्यमातून महिलांनी लघू, प्रक्रिया उद्योगासह पूरक उद्योगाची कास धरली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला अर्थार्जनाचे साधन मिळाले. शिवाय शेतीतील नावीन्यपूर्ण प्रयोगामुळे पोषणमूल्याची जाण त्यांना झाली. - संगीता कऱ्हाळे (गायकवाड), विषय विशेषज्ञ, केव्हीके, खरपुडी, जि. जालना.
प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

जालना: जिल्ह्यातील विविध गावांमध्ये कुटुंब आणि शेतीच्या उन्नतीसाठी महिलांनी पुढाकार घेतल्याचे चित्र आहे. त्यासाठी खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाते. या सर्व प्रक्रियेतून जाणाऱ्या अनेक महिलांनी पूरक उद्योग, लघू उद्योग, प्रक्रिया उद्योग, शेतीसाठी उपयुक्‍त गांडूळ खत उत्पादन आदी कामे हाती घेतली आहेत.  खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून दत्तक गाव वानडगाव येथे २० महिलांच्या गटाला प्रत्येकी दहा कुक्‍कुटपक्षी देऊन त्यांना कुक्‍कुटपालनाच्या पूरक उद्योगाकडे वळविले. त्याचा परिणाम म्हणून आजघडीला या २० महिलांच्या कुटुंबाकडे दररोज साधारणतः ७ ते ८ अंडीचे उत्पादन सुरू झाले. यामधून त्यांच्या कुटुंबाला दररोज किमान ८० रुपये मिळण्याची सोय झाली. वानडगाव व कचरेवाडी येथील पाच महिलांना गांडूळखतनिर्मितीची किट देण्यात आली. त्यांनी त्या किटचा वापर करून त्यांच्याशेतातील भाजीपाला व इतर फळपिकांसाठी त्यांचा वापर सुरू केला आहे.  वर्षभरात कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून महिलांना किमान ४ ते ५ दिवस दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात जवळपास १५० महिलांनी सहभाग नोंदविला. या प्रशिक्षणातून भरडधान्य प्रक्रिया, शेवगा प्रक्रिया, होळीचे नैसर्गिक रंग बनविणे, मसाला उद्योग, पेपर बॅग बनविणे, आवळा प्रक्रिया तसेच रेशीम कोषापासून विविध शोभेच्या वस्तू तयार करणे आदी प्रशिक्षणे देण्यात आली. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जवळपास १० ते १५ महिलांनी विविध लघू उद्योग सुरू करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचे काम सुरू केले आहे.  भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली नारी उपक्रमांतर्गत युनिसेफच्या साहाय्याने आयसीएआर अटारी पुणे, एमसीएईआर पुणे तसेच डॉ. एस. एस स्वामीनाथन चेन्नई पुरस्कृत यांच्या संयुक्‍त विद्यमाने पोषणमूल्य आधारित शेती पद्‌धती प्रकल्प राबविण्यात येत आहे. घरच्या घरी पौष्टिक व सेंद्रिय भाजीपाला उत्पादित करून कुटुंबाचे पोषण व आरोग्य सुरक्षित राखणे हा यामागील उद्देश होता.  महिलांना बियाणे किट वानडगाव, कचरेवाडी व हडप सावरगाव येथील जवळपास दोनशे कुटुंबांतील महिलांना बियाणे किट देण्यात आले. त्यामध्ये २७ भाजीपाल्याचे प्रकार, कंदभाज्या व फळरोपांमध्ये आंबा, डाळिंब, पेरू, सीताफळ, पपई, कडीपत्ता, लिंबू, शेवगा, भरडधान्यात बाजरी, ज्वारी, भगर, राजगिरा, राळा, नाचणी, तेलबियांमध्ये जवस, तीळ कारळाचे कीट देण्यात आले. सर्व कुटुंबांनी घरच्या घरीच भाजीपाला उत्पादित केल्याने प्रत्येक कुटुंबाच्या जवळपास २५० रुपये प्रत्येक आठवड्याला बचत झाली. निक्रा प्रकल्पांतर्गत कडेगाव येथील महिलांनी शेतामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करण्याला प्राधान्य दिल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राकडून देण्यात आली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com